गुवाहाटी कसोटीत भारताची अवस्था बिकट! ५४९ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना दोन गडी बाद

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा भारताची अवस्था २ बाद २७ अशी झाली असून, टीम इंडियावर पराभवाचे संकट गडद झाले आहे. दक्षिण आफ्रिकेने ठेवलेल्या ५४९ धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना भारताला अजूनही विजयासाठी ५२२ धावांची गरज आहे.

दक्षिण आफ्रिकेने आपला दुसरा डाव ५ बाद २६० धावांवर घोषित केला आणि भारतासमोर विजयासाठी ५४९ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि आणखी एक फलंदाज स्वस्तात माघारी परतले. दिवसअखेर कुलदीप यादव आणि साई सुदर्शन खेळपट्टीवर टिकून आहेत.

आफ्रिकेचा वरचष्मा

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी या सामन्यात पूर्ण वर्चस्व गाजवले. दुसऱ्या डावात त्रिस्टन स्टब्जने ९४ धावांची आक्रमक खेळी करत संघाची धावसंख्या वाढवली. त्याआधी, पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलेच दमवले होते. अष्टपैलू सेनुरान मुथुस्वामीने आपले पहिलेवहिले कसोटी शतक (१०९) झळकावले, तर वेगवान गोलंदाज मार्को येन्सनने ९३ धावांची तडाखेबाज खेळी केली. यामुळे दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४८९ धावांचा डोंगर उभारला होता.

भारताची फलंदाजी गडगडली

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवरील पराभवानंतर गुवाहाटीत फलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज चमकतील, अशी अपेक्षा होती. मात्र, पहिल्या डावात भारताचा डाव अवघ्या २०१ धावांत आटोपला. कुलदीप यादवने गोलंदाजीत चमक दाखवत ११५ धावांत ४ बळी घेतले, पण त्याला इतर गोलंदाजांची म्हणावी तशी साथ मिळाली नाही.

आता मालिकेतील १-० अशी पिछाडी भरून काढण्यासाठी आणि मालिका वाचवण्यासाठी भारताला पाचव्या दिवशी चमत्कारच करावा लागेल.