नवी दिल्ली
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मोठी कारवाई केली आहे. इंडिगो एअरलाईन्सच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही दिवसांत जो प्रचंड गोंधळ उडाला, त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी डीजीसीएने कारवाईचा बडगा उगारत आपल्या चार 'फ्लाइट ऑपरेशन्स इन्स्पेक्टर्स'ना नोकरीवरून काढून टाकले आहे.
नेमके काय घडले?
या अधिकाऱ्यांना तडकाफडकी काढण्यामागचे नक्की कारण अद्याप अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही. मात्र, या निर्णयामुळे खुद्द डीजीसीएच्या कारभारावरच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हिवाळी वेळापत्रकात इंडिगोला १० टक्के जास्त उड्डाणे भरण्याची परवानगी देण्यात आली होती. ही परवानगी देण्याआधी डीजीसीएने इंडिगोकडे पुरेसे पायलट आहेत की नाही, याची खातरजमा केली होती का? असा सवाल आता विचारला जात आहे.
तसेच, पायलट्सच्या कामाच्या वेळा आणि विश्रांतीचे नवीन नियम पाळण्याची तयारी कंपनीने केली होती का, याचे मूल्यांकन या अधिकाऱ्यांनी केले होते का, यावरही आता संशय व्यक्त केला जात आहे.
सीईओंना बोलावले
डीजीसीएने केवळ अधिकाऱ्यांवर कारवाई करून थांबले नाही, तर इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पीटर एल्बर्स यांनाही समन्स बजावले आहे. त्यांना आज, शुक्रवारी (१२ डिसेंबर २०२५) चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
या भेटीत डीजीसीएचे अधिकारी एल्बर्स यांची कसून चौकशी करणार आहेत. विमानांचे उड्डाण पुन्हा सुरळीत करण्यासाठी कंपनी काय प्रयत्न करत आहे? नवीन पायलट्सची भरती करण्यासाठी काय पावले उचलली आहेत? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या प्रवाशांची गैरसोय झाली त्यांना तिकिटाचे पैसे (Refund) आणि नुकसानभरपाई कधी मिळणार? याबद्दल त्यांना जाब विचारला जाणार आहे.