शिख मातेने मस्जिदसाठी दिली स्वत:ची जमीन दान

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 2 Months ago
शाही इमाम पंजाब यांचा सत्कार करताना गावकरी
शाही इमाम पंजाब यांचा सत्कार करताना गावकरी

 

फतेहगड साहिब

सध्या जगात आणि देशात अनेक ठिकाणी धर्माच्या नावावर भिंती उभारल्या जात असताना, पंजाबमधून मात्र माणुसकीचा आणि प्रेमाचा एक अखंड झरा वाहत आहे. नववे शिख गुरु, श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या जखवाली गावात एकतेचे हे सुंदर चित्र पहायला मिळाले.

येथील मुस्लिम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी जागेची मोठी अडचण भासत होती. त्यांची ही गैरसोय गावातील एका शिख कुटुंबाला बघवली नाही. स्वर्गीय जर्नेल सिंग यांच्या पत्नी माता राजिंदर कौर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेत आपल्या कष्टाच्या जमिनीपैकी ५ मर्ला (गुंठे) जागा मस्जिद उभारण्यासाठी दान केली.

कष्टाच्या कमाईचे दान

विशेष म्हणजे, ही जमीन या कुटुंबाने स्वतःच्या कष्टाने आणि मेहनतीने कमावली होती. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याने भावना व्यक्त करताना सांगितले, "माझ्या आजीने तिच्या मेहनतीचा आणि कष्टाचा एक तुकडा आम्हाला मस्जिदसाठी दिला. गावातील मुस्लिम बांधवांना नमाजसाठी त्रास होत होता, हे पाहून आम्हाला खूप वाईट वाटत होते. आता मस्जिदसाठी जागा दिल्याने आम्हाला खूप आनंद आणि समाधान मिळत आहे."

शाही इमामांच्या हस्ते पायाभरणी या जागेवर उभारल्या जाणाऱ्या मस्जिदचा कोनशीला समारंभ (पायाभरणी) पंजाबचे शाही इमाम मौलाना मुहम्मद उस्मान रहमानी लुधियानवी यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी बोलताना शाही इमाम भावूक झाले. ते म्हणाले, "पंजाबची भूमी आजही जगाला परस्पर बंधुभावाचा संदेश देत आहे. येथील सर्व धर्माचे लोक स्वतःच्या धर्माचे पालन करत असतानाच दुसऱ्यांच्या धर्माचा मनापासून आदर करतात. पंजाबने नेहमीच द्वेषाच्या तुलनेत प्रेमाची ज्योत तेवत ठेवली आहे."

गावाची एकच ओळख

या प्रसंगी गावचे माजी सरपंच अजैब सिंग जगवाली यांनी गावातील सलोख्याचे वर्णन केले. ते म्हणाले, "आमच्या गावात हिंदू आणि शिख कुटुंबांच्या प्रत्येक सणात मुस्लिम बांधव उत्साहाने सहभागी होतात आणि सर्वतोपरी मदत करतात. आम्ही एकाच कुटुंबासारखे राहतो. आता माता राजिंदर कौर यांनी मस्जिदसाठी जमीन दिल्याने आमचे हे नाते अधिक घट्ट झाले आहे."

शिख समाजाने दाखवलेल्या या औदार्यामुळे जखवाली गावात आनंदाचे वातावरण आहे. धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणाऱ्या या कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.