आयुष्यात यशस्वी व्हायला फक्त पुस्तकी ज्ञान असून चालत नाही, तर माणसाच्या अंगात एखादी कला किंवा कौशल्य असावे लागते. हरियाणाच्या मेवात भागातील परवेज खान याने हेच सिद्ध केले आहे. आपल्या खेळातील कौशल्याच्या जोरावर तो मेवातसारख्या मागास समजल्या जाणाऱ्या भागातील एका छोट्या गावातून थेट अमेरिकेत पोहोचला आहे.
हलाखीची परिस्थिती आणि जिद्द
परवेज खानचा जन्म २६ डिसेंबर २००४ रोजी हरियाणाच्या नूह जिल्ह्यातील 'चहलका' गावात झाला. वडील नफीस अहमद हे शेतकरी आहेत, तर आई हमसीरा गृहिणी आहे. वडिलांकडे खूप कमी शेतजमीन असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणेही कठीण होते. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमजोर आणि आई-वडील निरक्षर. अशा वातावरणात शिक्षणाची सोय नसतानाही परवेजने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्याने आपल्या कुटुंबाचे आणि हरियाणा राज्याचे नाव देश-विदेशात रोशन केले आहे. खेळाच्या जगात त्याने खूप कमी वयात यश मिळवले असून तो तरुणांसाठी प्रेरणास्थान बनला आहे.
अमेरिकेतील शिक्षणाची संधी
ऑगस्ट २०२३ मध्ये अमेरिकेच्या 'युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडा'ने परवेज खानची स्पोर्ट्स स्कॉलरशिपसाठी निवड केली. विद्यापीठाच्या पत्रानुसार, त्याच्या उत्कृष्ट एथलेटिक्स रेकॉर्डमुळे त्याला ही शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. पुढील चार वर्षे त्याला ही स्कॉलरशिप मिळेल आणि अमेरिकेतील त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च विद्यापीठ करेल. ही बातमी ऐकताच त्याच्या कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याच महिन्यात तो फ्लोरिडाला रवाना झाला.
परवेजने नूहच्या यासीन मेव शाळेतून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. सध्या तो फ्लोरिडा विद्यापीठात 'बॅचलर ऑफ आर्ट्स'चे शिक्षण घेत आहे.
या यशाबद्दल बोलताना परवेज म्हणाला, "ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. एका आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिकण्याची संधी मिळेल, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. आता मी माझे कौशल्य अधिक चांगल्या प्रकारे विकसित करू शकेन."
त्याच्या गावातील लोकांसाठी एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाला अमेरिकेची स्कॉलरशिप मिळणे हे एखाद्या स्वप्नासारखे आहे. परवेजकडे ना पैसा होता, ना कोणता वशिला. त्याने केवळ आपली मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
क्रीडा क्षेत्रातील सुवर्ण कामगिरी
मे २०२४ मध्ये अमेरिकेच्या लुईझियाना येथे झालेल्या 'एसईसी आऊटडोअर ट्रॅक अँड फील्ड चॅम्पियनशिप २०२४' मध्ये परवेजने धमाकेदार कामगिरी केली. त्याने १५०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. ही शर्यत त्याने ३ मिनिटे ४२.७३ सेकंदात पूर्ण केली. सुरुवातीला त्याची धाव संथ होती, पण नंतर त्याने वेग पकडला आणि प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत विजेतेपद पटकावले. त्याचा वैयक्तिक सर्वोत्तम रेकॉर्ड ३ मिनिटे ३८.७६ सेकंदाचा आहे, जो त्याने कॅलिफोर्नियात नोंदवला होता. तसेच ८०० मीटर शर्यतीत त्याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
आनंद महिंद्रांकडून कौतुक
त्याच्या या शर्यतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मागे असूनही त्याने ज्या वेगाने मुसंडी मारली, ते पाहून लोक थक्क झाले. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ 'एक्स'वर शेअर करत त्याचे कौतुक केले. ते म्हणाले, "शुद्ध जोश आणि उत्साह! इतरांना सहज मागे टाकले. ही क्लिप पाहण्यापूर्वी मी त्याच्याबद्दल ऐकले नव्हते, पण मला आशा आहे की त्याची क्षमता आणि आत्मविश्वास भविष्यात भारतीय ट्रॅक अँड फील्डला नक्कीच यश मिळवून देईल."
भारतातील यश
जून २०२४: एथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहयोगाने पंचकुला येथे झालेल्या स्पर्धेत १५०० मीटर शर्यतीत (३ मिनिटे ४२.९५ सेकंद) सुवर्णपदक.
जानेवारी २०२२: मंगलोर येथे झालेल्या ८१ व्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ स्पर्धेत ८०० मीटरमध्ये सुवर्णपदक आणि १५०० मीटरमध्ये कांस्यपदक.
२०२१: वारंगल येथील ओपन नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये १५०० मीटरमध्ये सुवर्णपदक.
याआधी एथलेटिक्स फेडरेशनने त्याला दोन महिन्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी अमेरिकेच्या कोलोरॅडो येथे पाठवले होते.
_(1).jpeg)
लष्कराचे स्वप्न ते नौदलाची नोकरी
सुरुवातीला परवेजने लष्करात भरती होण्यासाठी धावण्याचा सराव सुरू केला होता. तिथूनच त्याला धावपटू होण्याची प्रेरणा मिळाली. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने दिवसरात्र मेहनत घेतली. त्याच्या कष्टाचे फळ मिळाले असून आज तो एक नामवंत धावपटू आहे आणि भारतीय नौदलात कार्यरत आहे.
परवेजचे काका खालिद सांगतात, "परवेज सरावाच्या बाबतीत कधीच तडजोड करत नाही. त्याची मेहनत नेहमी सकारात्मक विचाराने सुरू असते. जो मागे पडला आहे, त्याकडे दुर्लक्ष करून तो स्वतःला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. आता ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक आणावे, हेच आमचे एकमेव स्वप्न आहे."
परवेजचा धाकटा भाऊ रोहित खान हा देखील खेळाडू आहे. त्याने नुकतेच हरियाणाच्या क्रीडा महाकुंभात वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.
(लेखिका शायरा, कथाकार आणि पत्रकार आहेत)