राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) खासदार फौजीया खान यांनी गुरुवारी राज्यसभेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भयावह स्थितीवर प्रकाश टाकला. त्यांनी सभागृहात अत्यंत धक्कादायक माहिती दिली की, गेल्या अवघ्या तीन महिन्यांत महाराष्ट्रातील ७६६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आकडेवारीकडे लक्ष वेधताना त्यांनी सरकारला खडा सवाल विचारला की, "हे बळीराजा, हे शेतकरी सरकारला कधी 'प्रिय' होणार आहेत?"
मदतीत दुजाभाव आणि आकडेवारीतील तफावत
खान यांनी पूरग्रस्त भागातील शासकीय आकडेवारीतील त्रुटींवर बोट ठेवले. त्या म्हणाल्या की, अधिकृत आकडेवारी आणि प्रत्यक्षात मिळणारी मदत यात मोठी तफावत आहे. पुरामुळे नुकसान झालेल्या केवळ ६७६ कुटुंबांनाच सरकारी मदत मिळाली आहे, तर सुमारे २०० कुटुंबांना ही मदत नाकारण्यात आली आहे.
मदत पॅकेज आणि पीक विमा संरक्षणातील त्रुटींवर त्यांनी कडाडून टीका केली. सध्याच्या परिस्थितीचे वर्णन करताना त्या म्हणाल्या, "हे काही नेहमीचे हंगामी संकट नाही, तर ही एक 'महाभयंकर कृषी आपत्ती आहे."
केंद्राकडे प्रस्तावच गेला नाही?
यावेळी फौजीया खान यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तराचा संदर्भ दिला. त्या म्हणाल्या की, कृषी मंत्र्यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्राने अतिरिक्त मदतीसाठी केंद्राकडे प्रस्तावच सादर केलेले नाहीत. राज्य सरकारच्या या हलगर्जीपणामुळे अनेक शेतकरी पुरेशा मदतीपासून वंचित राहिले आहेत.
एकिकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना दुसरीकडे प्रशासकीय पातळीवर होत असलेला हा विलंब आणि अनास्था यावर फौजीया खान यांनी राज्यसभेत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.