गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षकपदी दुसऱ्यांदा भारतीय संघाला मायदेशातील कसोटी मालिकेत 'व्हाईटवॉश' स्वीकारण्याची नामुष्की ओढावली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताचा तब्बल ४०८ धावांनी पराभव झाला. हा भारताच्या कसोटी इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव आहे.
२०१० मध्ये भारतात केवळ एक कसोटी सामना जिंकलेल्या, त्यानंतर प्रत्येक दौऱ्यात पराभूत होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने या वेळी मात्र मालिकेतील दोन्ही सामने जिंकले. गेल्या वर्षी न्यूझीलंडने भारताला व्हाईटवॉश देताना ३-० असे हरवले होते. त्या वेळीही गंभीरच प्रशिक्षक होते.
या दुसऱ्या कसोटीत भारताचा पराभव अटळ होता. आज अखेरच्या दिवशी उरलेले आठ फलंदाज बाद करायला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना केवळ तीन तास पुरेसे ठरले. रवींद्र जडेजाने एकाकी लढत देत ५४ धावा केल्या. त्याचा अपवाद वगळता बाकी भारतीय फलंदाजांना सायमन हार्मरच्या गोलंदाजीचा अंदाज आला नाही.
गुवाहाटी कसोटी सामना भारत गमावणार, हे उघड होते. भारतीय फलंदाज लढत किती काळ देतात, एवढीच उत्सुकता होती. हार्मरने शेवटच्या दिवशी असा काही फिरकी मारा केला की, भारतीय फलंदाजांना त्याच्यासमोर शरणागती पत्करावी लागली. नाईट वॉचमन कुलदीप यादव पहिला बाद झाला. साई सुदर्शन एकदा नो बॉलवर मार्को यान्सेनला बाद झाला होता. पहिला ध्रुव जुरेल आणि रिषभ पंत जास्त लढत न देता झेलबाद होऊन हार्मरला तंबूत परतले.
चहापानानंतर साई सुदर्शन मुथुस्वामीला झेलबाद झाला. मिळालेल्या जीवदानाचा जास्त फायदा साई सुदर्शन उचलू शकला नाही. हार्मरच्या गोलंदाजीचा कोणताही अंदाज फलंदाजांना लागत नव्हता. पडझड होताना थोडी भागीदारी जडेजा-वॉशिंग्टन सुंदरदरम्यान झाली. जडेजा खराब खेळपट्टीवरही छान फलंदाजी करून दाखवत होता.
हार्मरने वॉशिंग्टन सुंदरला बाद केल्यावर भारताचा डाव गडगडला. नितीशकुमार रेड्डी रिव्हर्स स्वीप मारताना बाद झाला. अर्धशतक करून जडेजा केशव महाराजला बाद झाल्यावर, महाराजनेच सिराजला बाद करून ४०८ धावांचा भलामोठा विजय हाती घेतला. सिराजचा मार्को यान्सेनने पकडलेला अफलातून झेल बरेच काही सांगून गेला.
भारताचा दुसरा डाव १४० धावांमध्ये संपला. २५ वर्षांनी भारतात येऊन कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम दक्षिण आफ्रिकेने संघाने करून दाखवला. दक्षिण आफ्रिकन संघाने विजयी भरारी मारली असताना, भारतीय संघासमोर खेळाडूंच्या मानसिकतेपासून ते गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षण पद्धतीपर्यंत अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत.
संक्षिप्त धावफलक:
दक्षिण आफ्रिका: पहिला डाव ४८९ आणि दुसरा डाव ५ बाद २६० घोषित.
भारत: पहिला डाव २०१ आणि दुसरा डाव १४० (यशस्वी जयस्वाल १३, केएल राहुल ६, साई सुदर्शन १४, कुलदीप यादव ५, ध्रुव जुरेल २, रिषभ पंत १३, रवींद्र जडेजा ५४, वॉशिंग्टन सुंदर १६, नितीशकुमार रेड्डी ०, जसप्रीत बुमराह १, मोहम्मद सिराज ०; मार्को यान्सेन १५-७-२३-?, सिमॉन हार्मर २३-६-३७-६, केशव महाराज १२.५-१-३७-२, मुथुस्वामी ७-१-२१-१).