आगामी गणेशोत्सव २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत साजरा होत असून, ५ सप्टेंबरला ईद-ए-मिलाद हा सण येत आहे. या पार्श्वभूमीवर ईद-ए-मिलादची मिरवणूक ८ सप्टेंबरला काढण्याचा निर्णय घेऊन मुस्लीमबांधवांनी सामाजिक सलोखा जोपासण्याचा संदेश जिल्ह्याला दिला आहे.
ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक जिल्हा नियोजन सभागृहात बुधवारी (ता. २०) झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे, उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे, पोलिस उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सिरत कमिटीचा सत्कार
यावर्षी शुक्रवारी अर्थात ५ सप्टेंबरला ईद-ए-मिलाद हा सण गणेशोत्सव काळात येत असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी या दिवशी ईद-ए-मिलादची होणारी मिरवणूक दोन किंवा तीन दिवसानंतर काढण्याची सूचना जिल्हा प्रशासनातर्फे सिरत कमिटी सदस्य तसेच बैठकीस उपस्थित मुस्लीमबांधवांना करण्यात आली. याबाबत उपस्थित मुस्लीमबांधवांनी प्रशासनाशी चर्चेअंती धुळे शहरात तसेच इतर ठिकाणी ईद-ए- मिलाची मिरवणूक सोमवारी अर्थात ८ सप्टेंबरला काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला. या निर्णयाचे जिल्हाधिकारी विसपुते, पोलिस अधीक्षक धिवरे यांनी स्वागत करत उपस्थित सिरत कमिटी सदस्यांचा सत्कार केला.
विसपुते यांचे आवाहन
जिल्हाधिकारी विसपुते म्हणाल्या की, ईद-ए-मिलाद या सणाच्या दिवशी सर्वांनी सहानुभूती, सद्भावना, शांती आणि करुणा यावर लक्ष केंद्रित करावे, सण साजरे करताना भावी पिढ्यांना शिक्षण आणि मूल्यांची जाणीव करून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी असून उत्सव साजरा करताना धार्मिक पवित्रता राखावी.
योगदानकर्त्यांचा सत्कार
पोलिस अधीक्षक धिवरे यांनी येणाऱ्या प्रेषीत महम्मद पैगंबर जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच सिरत समितीच्या सहकार्याबद्दल आभार मानले. सण, उत्सवात गुन्हा नोंदवला जाऊ नये, यासाठी दक्ष राहावे. मुस्लिम समाजातून सकारात्मक योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्याची सूचना त्यांनी यंत्रणेला दिली. सोशल मीडियावर गुन्हेगारांचा गौरव करणाऱ्या पोस्टविरोधात कठोर कारवाईचा इशारा देत त्यांनी अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. अपर पोलिस अधीक्षक डॉ. देवरे यांनी सण, उत्सव साजरा करताना एकतेचा आणि शिस्तीचा आदर्श ठेवावा, असे आवाहन केले. ईदच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनामार्फत मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविणे, साफसफाई, पथदिवे बसविण्यात येतील, असे सांगण्यात आले.