'हा' आहे बकरी ईद अर्थात ईद उल अजहाचा धार्मिक इतिहास

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 1 Months ago
संकल्पनात्मक चित्र
संकल्पनात्मक चित्र

 

आज बकरी ईद जगभर साजरी केली जात आहे. बकरी ईदला 'ईद-उल-अजहा' असेही संबोधले जाते. 'रमजान ईद' झाल्यानंतर 'बकरी ईद'चे वेध लागतात ते खऱ्या अर्थाने 'हज'च्या तयारीनेच. 'बकरी ईद'ची कथा फार उद्‌बोधक आहे. ती हजरत इब्राहिम (अलैस्सलाम) यांच्याशी निगडित आहे.

सुमारे चार हजार वर्षांपूर्वीची गोष्ट. इराकमध्ये सुखसमृद्धीने नटलेली अशी दोन शहरे होती- काबूल व नैनवा. त्यावेळी येथे 'नमरुद' नावाचा राजा राज्य करीत होता. या शहरात त्याचीच सत्ता होती. तो स्वतःच ईश्वर असल्याचे आपल्या प्रजेला सांगत असे. लोक त्याचीच पूजा व भक्ती करत. त्याच वेळी इब्राहिम (अ.) यांचा एका मूर्तिकाराच्या घरात जन्म झाला. इब्राहिम जसे वयाने मोठे होत गेले, तसतसे त्यांना ईश्वराचे ज्ञान मिळत राहिले. ते सतत सृष्टीच्या निर्मात्याच्या शोधात राहिले. त्यांचा जन्म संपन्न घराण्यात झाला होता. त्यांच्यासमोर सर्व सुख, सत्ता हात जोडून उभी होती. 

परंतु हजरत इब्राहिम (अ.) हे काही सामान्य मनुष्य नव्हते. ते वेगळ्या अर्थानेच पृथ्वीतलावर जन्माला आले होते. राज्यकर्त्यांची स्वार्थी वृत्ती, ढोंगीपणा ते पूर्णपणे जाणून होते. त्यात बदल घडावा आणि गुण्यागोविंदाने सामान्य जनता नांदावी असेच त्यांना मनोमन वाटे. परंतु नेमके हेच विचार त्या काळी कोणाला पटणारे नव्हते. म्हणूनच त्यांच्यावर संकटांचे डोंगर कोसळले आणि खुद्द जन्मदात्या पित्यानेच त्यांना घरातून हाकलून देण्याचा व वारसा हक्क रद्द करण्याचा निर्णय फर्मावला. एवढेच नव्हे तर त्यांना जिवंत जाळण्याचा हुकूम दिला. ईश्वरी कृपेने मात्र ते या प्रसंगातून सहीसलामत बचावले. परंतु त्यांना घरदार, प्रियजन, आप्तेष्टांचा त्याग करून (देश) सोडावा लागला. 

आपली पत्नी व पुतण्याला घेऊन हजरत इब्राहिम (अ.) परदेशी रवाना झाले. जणू 'मानव जातीच्या' कल्याणासाठीच त्यांची ही भ्रमंती सुरू झाली होती. सीरिया, पॅलेस्टाईन, इजिप्त व अरबस्तानातील देशांचा दौरा त्यांनी केला. संकटामागून संकटे येतच होती. त्यांचा सामना करत ते पुढे चालतच राहिले. ईश्वराने पुन्हा एक दुसरी परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांची पत्नी हाजरा व तान्ह्या मुलाला वाळवंटात एकटे सोडून देण्याचा प्रसंग आला. त्या दोघांना वाळवंटात सोडून ते परतले. तेव्हा त्यांची पत्नी 'ब्र'देखील न काढता परीक्षेसाठी सज्ज झाली. तिच्याकडील अन्नसाठा जेव्हा संपला तेव्हा मात्र स्वतःच्या बालकाच्या भुकेचा प्रश्न उभा राहिला. 

मुलगा तहानेने व भुकेने अक्षरशः व्याकूळ झालेला. पाण्यासाठी शोध घेणे महत्त्वाचे होते. सभोवतालचे सर्व डोंगर पालथे घातले. 'सफा' आणि 'मर्वा'च्या दरम्यान सात वेळा ये-जा करूनही पाण्याचा थेंब मिळेना. मातेचे मन मुलासाठी बेचैन झाले होते. परंतु मार्ग सापडत नव्हता. अखेर तिची ही केविलवाणी अवस्था पाहून 'अल्लाह'ला त्या मातेची दया आली आणि ज्या ठिकाणी मूल होते तेथे मुलाच्या पायाच्या स्पर्शानेच पाण्याचा झरा निर्माण झाला, जो 'जमजम' म्हणून आज हजारो वर्षांनंतरही ममतेच्या प्रेमाची साक्ष देतो. मुलाची व मातेची तर तहान भागलीच, परंतु भविष्यात अल्लाहच्या मार्गावर येणाऱ्या सर्व भाविकांसाठी 'पाण्याचा' हा अजब साठा आजही पाहावयास मिळतो.

'हज' यात्रेतील प्रत्येक प्रवासी 'जमजम'चे पाणी घेतल्याशिवाय परतूच शकत नाही. 'जमजम'ची खोली 35 मीटर असून हजारो वर्षांपासून लाखो भाविक पाणी घेऊन स्वदेशी जातात; तरीदेखील पाण्याची पातळी किंचितही कमी होत नाही. वाळवंटातील 'जमजम'ची ही उत्पत्ती खरोखरच ईश्वरी देणगी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

जेव्हा इब्राहिम (अ.) 86 वर्षांचे होते, त्यांना संतती प्राप्त झाली. त्या पुत्राचे नाव इस्माईल असे ठेवले गेले. खरा कठीण परीक्षेचा काळ पुढचा होता. वृद्धापकाळात संतती तर अल्लाहने दिली; परंतु नेमक्‍या याच संततीचा बळी स्वतःच्या हाताने जगाच्या पालनकर्त्यासाठी आपण देऊ शकतो की नाही, असा प्रसंग त्यांच्यासमोर उभा राहिला. इब्राहिम (अ.) यांना स्वप्नात ईश्वराकडून अशी आज्ञा मिळाली, की 'आपल्या लाडक्‍या मुलाचे माझ्यासाठी बलिदान कर'. तेव्हा इब्राहिम (अ.) यांनी आपल्या लाडक्‍या मुलास, 'हे माझ्या पुत्रा, आता तूच सांग तुझा काय विचार आहे?' असे विचारले. तो म्हणाला, "पिताजी, जी काही आज्ञा आपणास दिली जात आहे तसेच करा." सरतेशेवटी जेव्हा दोघा पिता-पुत्रांनी आज्ञापालनासाठी मान तुकविली आणि इब्राहिम (अ.) यांनी पुत्राला बळी देण्यासाठी सुरा उगारला. इब्राहिम (अ.) आपल्या परीक्षेत पूर्णतः उत्तीर्ण झाले. परंतु अल्लाहला कोणा मुलाचा बळी घ्यावयाचा नव्हता. (कुरआन-सूरह अस-साफात-91-113)

याच वेळी इस्माईल (अ.) यांच्याकडे निसर्गातून ईशदुतामार्फत एक मेंढा पाठवण्यात आला व त्याचाच बळी देण्यात आला. इस्माईल (अ.) सहीसलामत राहिले. अल्लाहला कुणा प्राण्याची हत्या करणे किंवा त्यांच्या मांस व रक्ताची आवश्‍यकता नव्हती. निश्‍चितच ही एक उघड परीक्षा होती. तेव्हापासून हा दिवस 'बकरी ईद' म्हणून सर्व मुस्लिम बांधव साजरा करतात आणि कुर्बानी देतात.

- अस्लम जमादार

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter