भारतीय पुरुष, महिला तिरंदाज संघांचा अचूक लक्ष्यवेध

Story by  पुणे | Published by  Saurabh Chandanshive • 10 d ago
भारतीय तिरंदाज
भारतीय तिरंदाज

 

भारताच्या पुरुष व महिला तिरंदाजांनी येथे सुरू असलेल्या विश्‍वकरंडकातील कम्पाऊंड प्रकारातील सांघिक विभागात अंतिम फेरीत प्रवेश केला. आता भारताचे दोन्ही संघ अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकावण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील.

पुरुष संघासाठी अभिषेक वर्मा, प्रियांश व प्रथमेश फुगे या तिरंदाजांनी दमदार कामगिरी केली, तर महिला संघामधून ज्योती वेन्नम, अदिती स्वामी व परनीत कौर या खेळाडूंनी ठसा उमटवला.

भारताच्या महिला तिरंदाजी संघाला पहिल्या फेरीत पुढे चाल (बाय) मिळाली. भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत तुर्कीवर २३५-२३० असा विजय संपादन केला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.

अंतिम चारच्या फेरीत भारतीय संघाने इस्टोनिया संघाला २३५-२३० असेच पराभूत केले. या स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाला अग्रमानांकन देण्यात आले आहे. आता अजिंक्यपदाच्या लढतीत भारतीय महिला संघासमोर इटलीच्या तिरंदाजांचे आव्हान असणार आहे. इटलीच्या संघाला सहावे मानांकन देण्यात आले आहे.

यावेळी भारतीय महिला तिरंदाज अदिती स्वामी म्हणाले कि, "आम्ही सरावात प्रचंड मेहनत करीत आहोत. पॅरिसमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विश्‍वकरंडकात भारताच्या दोन्ही संघांनी (पुरुष व महिला) सुवर्णपदक जिंकले होते. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती व्हावी, असे मनापासून वाटते."

कोरियाविरुद्ध कडव्या संघर्षानंतर विजय
भारताच्या पुरुष संघाने पहिल्या फेरीत फिलीपिन्स संघावर २३३-२२७ असा विजय साकारला. त्यानंतर डेन्मार्कला २३७-२३४ असे पराभूत करण्यात भारतीय पुरुष संघाला यश मिळाले. भारतीय पुरुष संघाने उपांत्य फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित कोरियाला २३५-२३३ असे अवघ्या दोन गुणांनी पराभूत केले व अंतिम फेरीत पाऊल ठेवले.

नेदरलँडसविरुद्ध अजिंक्यपदाची लढत पार पडणार आहे. अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर अभिषेक वर्मा म्हणाला, आम्ही सांघिक कामगिरीत उल्लेखनीय यश मिळवले. वाऱ्याची दिशा आम्ही ओळखली. उपांत्य फेरीच्या सामन्यात कडव्या संघर्षाचा सामना करावा लागला. आम्ही अशा लढतीसाठी सज्ज होतो. आता सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करू.

रिकर्व्ह प्रकारात पुरुष संघ दुसऱ्या स्थानी
रिकर्व्ह प्रकारातील पात्रता फेरीत भारतीय पुरुष संघ २०४९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. या संघात तरुणदीप राय, धीरज बोम्मादेवरा व प्रवीण जाधव या खेळाडूंचा समावेश आहे. कोरियाचा संघ २०५५ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. फ्रान्सचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय महिला संघ रिकर्व्ह प्रकारातील पात्रता फेरीत सहाव्या स्थानावर आहे. या संघात अंकित भकत, दीपिकाकुमारी व भजन कौर या खेळाडूंचा समावेश आहे.