कसोटी क्रिकेटला वाचवा - ब्रायन लारा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 11 d ago
ब्रायन लारा
ब्रायन लारा

 

जगभरातील वाढत्या टी-२० लीगचे पडसाद कसोटी क्रिकेटवर उमटू लागले आहेत. याच कारणामुळे टी-२० लीगवर नियंत्रण करून कसोटी क्रिकेटला वाचवा, अशा शब्दांत वेस्ट इंडीजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा याने आयसीसीकडे साकडे घातले आहे.

एका क्रीडा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ब्रायन लारा याने आपले मत व्यक्त केले. तो पुढे म्हणाला, फुटबॉलमध्ये वर्षभर लीगला प्राधान्य देण्यात येते. बार्सिलोना, मँचेस्टर युनायटेडसारख्या क्लबमधील खेळाडू १२ महिने खेळताना दिसतात. अशा लीगमुळे देशांनाही फायदा होतो. या खेळामध्ये पैसा कमावण्यासाठी द्विपक्षीय मालिका आयोजनाची गरज भासत नाही, पण ही बाब फुटबॉलमध्ये चालू शकते.

क्रिकेटमध्ये मात्र लीगला प्राधान्य देता येणार नाही, असे स्पष्ट करताना ब्रायन लारा म्हणाला, ‘‘भारत, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या देशांची आर्थिक स्थिती क्रिकेटमुळे आणखी भक्कम होते, पण इतर देशांची परिस्थिती भिन्न आहे. वेस्ट इंडीजला आर्थिक साह्य मिळावे यासाठी भारताविरुद्धच्या मालिकेची गरज भासते. भारत, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड वगळता क्रिकेट खेळत असलेल्या देशांसाठी लीगपेक्षा द्विपक्षीय मालिका महत्त्वाच्या ठरतात. तीन बलाढ्य देश वगळता इतर देशांतील खेळाडू देशांपेक्षा जगभरातील लीगला प्राधान्य देतात. अशा प्रकारच्या लीगमुळे त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होत असतो.

प्रेक्षकांची पावले वळायला हवीत
ब्रायन लारा याची कसोटी क्रिकेटला वाचवण्याची तळमळ दिसून आली. तो म्हणाला, ‘‘टी-२० क्रिकेट लढतीचा एक सामना तीन ते साडेतीन तासांचा असतो. त्यामुळे या लढतींना प्रायोजकही मिळतात. कसोटी क्रिकेट पाच दिवस चालते. प्रायोजक प्रदीर्घ काळ चालणाऱ्या लढतींकडे कानाडोळा करतात. आयसीसीने याकडे लक्ष द्यायला हवे. कसोटी क्रिकेटकडेही प्रेक्षकांची पावले वळायला हवीत.’’