५० निरापराधांसाठी कलेक्टरसोबत भांडल्या होत्या सावित्रीबाई

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 4 Months ago
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

 

भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. सावित्रीबाईंची ओळख केवळ पहिल्या महिला शिक्षिक एवढ्यापुरतीच मर्यादित नाही तर स्वतंत्र बाण्याची क्रांतिकारक स्त्री, हीच त्यांची खरी ओळख आहे, 

सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे ३ जानेवारी, इ.स. १८३१ रोजी झाला.  आईचं नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचं नाव खंडोजी नेवसे पाटील होते. त्यांचे वडील गावाचे पाटील होते. १८४० मध्ये सावित्रीबाई ९ वर्षांच्या असताना  त्यांचा विवाह १३वर्षे वयाच्या महात्मा जोतिबा फुले यांच्याशी झाला. 

ज्या काळात स्त्रीला केवळ चूल आणि मूल सांभाळण्यापुरतेच मर्यादीत ठेवले जात होते. त्याकाळात सावित्रीबाई शिकल्या. ज्योतिबांनी त्यांना शिकवले. हे शिक्षण स्वत:पूरतेच मर्यादीत न ठेवता इतर मुलींनाही शिकवण्याचे त्यांनी ठरवले. यासाठीच त्यांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची शाळा सुरू केली.

पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. पण तिथे मुलींना शिकविण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. तेंव्हा ज्योतिबानी मला याठिकाणी शिकविण्यासाठी पाठविण्याचे ठरविले. पण समाजातील काही कर्मठ लोक मात्र यास विरोध करू लागले. मुलींनी शाळा शिकू नये म्हणून काही लोक मुलींना शाळेत तर पाठवत नव्हतेच शिवाय त्या शाळेला जात असताना लोक त्यांच्यावर चिखल, शेण फेकून त्यांना लज्जीत करू लागले. तरीही त्या डगमगल्या नाहीत.  

सावित्रीबाईंनी ज्योतिबांना लिहीलेली काही पत्रे सावित्रीबाई फुले समग्र वाङमयात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यापैकीच एक पत्र काय होते आणि सावित्रीबाई कलेक्टरसोबत कशासाठी भांडावे लागले हे पाहुयात.

एकोणिसाव्या शतकात १८७६ आणि १८९६ असे दोन मोठे दुष्काळ पडले होते. १८७६-७७ मधला दुष्काळ हा एकोणिसाव्या शतकातला सर्वांत भीषण दुष्काळ मानला जातो. हे काम करत असताना जुन्नरहून २०  एप्रिल १८७७ ला जोतिबा फुले यांना लिहिलेल्या पत्रात सावित्रीबाई तत्कालीन भीषण दुष्काळाचं वर्णन करताना लिहितात.

दुष्काळाच्या झळा सोसताना काही लोकांवर झालेला अन्यायविरूद्धही त्यांनी आवाज उठवला होता. ज्योतिबांना लिहीलेल्या पत्रात त्या म्हणतात की,  सावकारांना लुटावे, त्यांची नाके कापावी अशी दुष्ट कर्मे या भागात घडत आहेत. तस्मात मोठेमोठे दरोडे पडत आहेत. हे श्रवण करुन कलेक्टर तेथे आला. त्याने मसलत केली. गोरे सार्जंट पाठवून बंदोबस्त बसविला.

५० सत्यशोधक पकडून नेले. त्याने मला बोलाविले. तेव्हा मी उत्तर केले की आमच्या लोकांवर आळ व कुभांड घेऊन कैदेत ठेवले ते सोडा. कलेक्टर न्यायी आहे. तो गोऱ्या फौजदारास रागे भरुन बोलला की, पाटील का दरोडे घालतात. त्यांना सोडून दे. कलेक्टर दुष्काळ पाहून कष्टी झाला व कळवळून त्याने आपल्या केंद्रात ज्वारीच्या चार गाड्या पाठविल्या आहेत.  

या पत्रातून कणखर अन् केवळ स्त्रीयांसाठीच नाही तर समाजासाठी झटणाऱ्या 'सावित्री'चे दर्शन आपल्याला होते.