अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नईमा खातून

Story by  Awaz Marathi | Published by  sameer shaikh • 10 d ago
कुलगुरू नईमा खातून
कुलगुरू नईमा खातून

 

नवी दिल्ली

अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला गेला आहे. या विद्यापीठाला सोमवारी पहिल्या महिला कुलगुरू मिळाल्या आहेत. प्रा. नईमा खातून गुलरेझ आता १०३ वर्षे जुन्या या विद्यापीठाच्या प्रमुखपदी विराजमान होणार आहेत. सोमवारी रात्री राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नईमा खातून यांच्या नियुक्तीच्या आदेशावर स्वाक्षरी केली. विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंची निवड करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पॅनेलनेनईमा खातून यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. 

भाजपच्या राजवटीत केंद्रीय विद्यापीठांच्या प्रमुखपदी महिलांची नियुक्ती करण्याचा ट्रेंड दिसतो. यापूर्वी प्रा. नजमा अख्तर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठाच्या पहिल्या महिला कुलगुरू झाल्या. दिल्लीतील JNUच्या कुलगुरूपदीही महिलाच आहे. त्याचप्रमाणे राज्यांमधील अनेक विद्यापीठांमध्येही हेच सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. 

सध्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे लागू असलेली आदर्श आचारसंहिता लक्षात घेऊन सरकारने या नियुक्तीसाठी भारतीय निवडणूक आयोगाशी संपर्क साधला होता. या निर्णयाचा निवडणूक प्रचारात उपयोग केला जाणार नाही, असे आश्वासन दिल्या नंतर या नियुक्तीला हिरवा कंदील मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. यानंतर कुलगुरू नियुक्तीची अधिसूचना काढण्यात आली. 'अलीगढ महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या नईमा खातून यांची पाच वर्षांसाठी AMUच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे', असे या अधिकृत अधिसूचनेत म्हटले आहे.

१९२०मध्ये अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची स्थापना झाली. लेडी बेगम सुलतान जहाँ या विद्यापीठाच्या पहिल्या कुलपती होत्या, तर पहिले कुलगुरू महमुदाबादचे राजा मुहम्मद अली मुहम्मद खान होते. विद्यापिठाच्या कुलगुरू म्हणून महिलेच्या संभाव्य नियुक्तीला नोव्हेंबर २०२३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. मात्र योग्यतेच्या अभावामुळे याचिका फेटाळण्यात आली होती.

कोण आहेत प्रा. नईमा खातून?
नईमा खातून या मूळच्या ओडिशाच्या आहेत. त्या मानसशास्त्र आणि शैक्षणिक विज्ञान विभागात प्राध्यापक होत्या. त्यांनी विद्यापीठाच्या महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणून आणि कौशल्य विकास आणि करिअर नियोजन केंद्राच्या संचालक म्हणून काम केले आहे..त्यांनी १९८१ मध्ये एएमयूमधूनच  बी.ए. मानसशास्त्र (ऑनर्स) ची पदवी प्राप्त केली.या  परीक्षेत गुणवत्ता यादीत त्यांनी तिसरा क्रमांक पटकावला होता .

१९८८पासून त्या विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून शिकवत आहेत. या काळात त्यांनी 'A Comparative Study of Patterns of Political Segregation and Social-psychological Correlations in Hindu and Muslim Youth' या विषयावर पीएचडी मिळवली. विध सभागृहांचे प्रोव्होस्ट आणि वॉर्डन आणि डेप्युटी प्रॉक्टर म्हणूनही मोठा प्रशासकीय अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्या 'पे इक्विटी आणि फी रॅशनलायझेशन कमिटी' यांसारख्या अनेक महत्त्वाच्या समित्यांच्या सदस्याही होत्या. १९९९-२००० मध्ये त्यांनी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ रवांडा येथे सायकोलॉजी अँड एज्युकेशनल सायन्सेस फॅकल्टीमध्ये असोसिएट प्रोफेसर/रीडर म्हणूनही काम पाहिले.

कुलगुरूपदी निवड झाल्यावर नईमा खातून यांनी माध्यमांशी संवाद साधला. विद्यापीठाने व विशेषत: येथील महिलांनी खांद्यावर  टाकलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीवअसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. धर्म आणि लिंग यांवरून विद्यापीठात कोणताही भेदभाव केला जात नाही. मात्र महिलांच्या बाजूने अधिक सकारात्मक पाऊल उचलणार असल्याचे त्या म्हणाल्या.
 
आपल्या कार्यकर्तृत्वाने महिलांपुढे आदर्श निर्माण करण्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. महिलांमध्ये जन्मतःच मल्टी-टास्कर्स, प्लॅनर, फायनान्स मॅनेजर आणि यांसारखी अनेक कौशल्ये असतात. त्यामुळे कोणतेही काम आपल्या शक्तीपलीकडचे आहे असा विचार कोणत्याही महिलेने करू नये, अशी भावना त्यांनी  पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 

Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter