भाविकांच्या अमाप उत्साहात मोहरमच्या सांगता पर्वाला आता प्रारंभ झाला आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात पंजे भेटीस येत असून, आज सर्वत्र खत्तलरात्रीचा विधी होणार आहे. त्यानंतर एकूणच उत्सवाला कारुण्याची झालर लाभणार आहे. अनेक मानाचे पंजे यावेळी मिरवणुकीने भेटीसाठी बाहेर पडणार आहेत. रविवारी (ता. ६) पंजे विसर्जन होणार आहे.
शहरातील सर्व प्रमुख पेठांसह उपनगरांतही पंजे प्रतिष्ठापना झाली आहे. साहजिकच सर्वत्र ताशांचा कडकडाट, उद-धुपाचा सुगंध असा माहोल आहे. मोहरमच्या पर्वातील आज मुख्य दिवस आहे. फुलांच्या माळा, जरीचे फेटे, चांदीचे छत्र आणि विद्युत रोषणाईने सजविलेले पंजे आणि प्रखर दिव्यांच्या झोतात पंजेभेटीचा सोहळा साजरा होणार आहे. पंजांची प्रतिष्ठापना झालेल्या दर्गा, मशिदींसह अन्य ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली.
बाबूजमाल, घुडणपीर आदी दग्र्यांत मलिद्याचा नैवेद्य आणि नवसाचे फेटे बांधण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. काल रात्री भेटीसाठी आलेले पंजे घुडणपीर दर्गा, भवानी मंडप, बाबूजमाल दर्गा येथे भेटी घेऊन पुढे मार्गस्थ झाले.
आषाढी एकादशी, मोहरम एकाच दिवशी
यंदा आषाढी एकादशी आणि मोहरम एकाच दिवशी आहे. त्यामुळे सकाळी सर्वत्र विठुनामाचा गजर असेल. विठ्ठल मंदिरात विविध कार्यक्रम होतील. त्याशिवाय प्रतिपंढरपूर वारी नंदवाळसाठीही हजारो भाविकांचा जथ्था जाणार आहे. सायंकाळनंतर सर्वत्र मोहरमनिमित्त पंजे विसर्जन होणार आहे. परंपरेप्रमाणे काही पंजे पंचगंगा घाटावर, तर काही पंजांचे प्रतिष्ठापना केलेल्या ठिकाणीच विसर्जन होणार आहे.