गणेश ढेपे
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक एकात्मतेचे प्रतीक मानला जातो. महाराष्ट्रातील गावागावांत कुठे भव्य आरास तर कुठे साधेपणाने, पण मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा केला जातो. नांदेडमधील लोहा तालुक्यातील सुगाव या छोट्याशा गावात मात्र गेल्या ६३ वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’ ही अनोखी परंपरा जपली जाते.
या उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व जातीधर्मांचे गावकरी मिळून हा उत्सव साजरा करतात. इथे कुणाकडूनही देणगी घेतली जात नाही. त्यामुळे हा सोहळा खऱ्या अर्थाने लोकोत्सव ठरतो. त्याहूनही उल्लेखनीय गोष्ट म्हणजे गणपती बनवण्यासाठी लागणारी लाल माती गावातीलच हबीब मौलासाब शेख हे दरवर्षी स्वतःहून, कुठलाही मोबदला न घेता आणून देतात. त्यांच्या या श्रद्धाभावामुळे सुगावच्या गणेशोत्सवाला सामाजिक सलोख्याची आणि सामूहिकतेची एक वेगळीच ओळख लाभली आहे.
१९६२ पासून परंपरा...
सुगाव येथील लोकसंख्या तीन हजारांच्या जवळपास आहे. इथे १९६२ पासून पर्यावरणपूरक मातीची गणेशमूर्ती बनवून गणेशोत्सव साजरा केला जातो. तत्कालीन सरपंच मोहनराव पाटील, दिवंगत रामराव पाटील, दिवंगत गुलाब पाटील यांनी श्री यशवंत गणेश मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून इथे 'एक गाव, एक गणपती'ची परंपरा आजही सुरूच आहे.
पर्यावरणपूरक लाल मातीची गणेशमूर्ती हे येथील गणेशोत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे. गावातील मूर्तिकार नामदेव लोखंडे, उत्तम यमुलवाड, शिवानंद पांचाळ हे लाल मातीची मूर्ती तयार करतात. तर यासाठी लागणारी लाल माती हबीब मौलासाब शेख हे मोठ्या श्रद्धेने कुठलाही मोबदला न घेता आणून देतात.
गावात घरोघरी मातीच्याच मूर्ती
गणेश चतुर्थीला गावात घरोघरी मातीची मूर्ती बनवून पुजली जाते. गावातील गणेशोत्सवात आवर्जून सर्वधर्मीयांचा समावेश असतो. मध्ये विविध जाती-धर्माच्या अकरा मानकऱ्यांचा समावेश असतो. कोणाकडूनही देणगी न घेता अकरा मानकरांकडून त्यांच्या वैयक्तिक खर्चातून सकाळ-संध्याकाळची पूजा, आरती, प्रसाद व अकरा दिवस अन्नदान केले जाते.
गणेशोत्सवात श्रमदानासाठी एकत्र
गणेशोत्सव काळात गावातील रस्ते, परिसर, श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविली जाते. ग्रामस्थांकडून गणेशोत्सवात भजन, कीर्तन, सोंगी भारुडे, शालेय मुलांची भाषणे, विविध स्पर्धा व बालनाट्य, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रीभ्रूण हत्याविरोधी व व्यसनमुक्ती जनजागृती व महिलांचे सक्षमीकरण, वृक्षारोपण व रक्तदान व आरोग्य शिबिरे घेतली जातात. अशापद्धतीने सामाजिक उपक्रमांनी अकरा दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जात असल्याची माहिती गणेश मंडळाचे अध्यक्ष बालाजी चिंचाळे यांनी दिली.