तालिबानच्या देवबंद दौऱ्यामागे भारताची '4D' रणनीती?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी युवकांशी संवाद साधताना
तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी युवकांशी संवाद साधताना

 

मलिक असगर हाश्मी

तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी सध्या भारताच्या सहा दिवसीय दौऱ्यावर असताना, त्यांच्या दारुल उलूम देवबंद भेटीवरून देशात मोठी चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर याबद्दल अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. याच संदर्भात, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा एक दशक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये डोवाल म्हणतात, "पाकिस्तान कधीही आपला मित्र होऊ शकत नाही. तर तालिबानकडून भारताला कोणताही थेट धोका नाही. अफगाणिस्तानात भारताची प्रतिमा इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगली आहे."

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या (ORF) फेलो, सौम्या अवस्थी यांच्या एका विश्लेषणात्मक लेखाने नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. तालिबान नेते मुत्तकी यांना भारतात येण्याची परवानगी देणे, हा भारत सरकारच्या एखाद्या गंभीर सामरिक विचारांचा भाग आहे का? जुन्या संबंधांचा हवाला देऊन अफगाणिस्तानसोबतचे संबंध पुन्हा दृढ करण्याचा हा प्रयत्न आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात, विशेषतः देवबंदच्या विद्वानांच्या माध्यमातून, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध फार पूर्वीपासून आहेत. त्यामुळे, मुत्तकी यांचा देवबंद दौरा केवळ धार्मिक किंवा प्रतीकात्मक नसून, सामरिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा मानला जात आहे.

देवबंदशी जुळलेले ऐतिहासिक नाते

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील दारुल उलूम देवबंदलाही भेट दिली. इजिप्तच्या कैरो येथील अल-अझहर विद्यापीठानंतर, दारुल उलूम देवबंद हे दक्षिण आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात महत्त्वाचे ऐतिहासिक मदरसा मानले जाते. मुत्तकी यांचा हा दौरा त्या ऐतिहासिक, धार्मिक आणि सामरिक संबंधांच्या पुनरुज्जीवनाचे प्रतीक मानला जात आहे, जे दक्षिण आशियातील इस्लामी विचारधारेच्या सर्वात प्रभावशाली शाखांपैकी एकाच्या माध्यमातून अफगाणिस्तान आणि भारताला जोडतात.

सौम्या अवस्थी लिहितात की, दारुल उलूम देवबंद आणि अफगाणिस्तान यांच्यात खोल आणि दीर्घकालीन संबंध आहेत. १८६६ मध्ये स्थापन झालेला हा मदरसा इस्लामिक शिक्षणाचे एक असे केंद्र म्हणून उदयास आला, ज्याने नैतिक सुधारणांसोबतच वसाहतवादी आधुनिकतेलाही विरोध केला. त्याचे संस्थापक, मौलाना मुहम्मद कासिम नानौतवी आणि राशिद अहमद गंगोही यांनी हनफी न्यायशास्त्र आणि आध्यात्मिक शिस्तीवर आधारित एका धार्मिक पुनरुज्जीवन आंदोलनाची कल्पना केली होती. त्यांचा उद्देश सांस्कृतिक ऱ्हासाच्या काळात इस्लामिक विद्वत्तेचे संरक्षण करणे हा होता, त्याचे राजकारण करणे नाही.

१९व्या शतकाच्या उत्तरार्धापासून, या मदरशाने केवळ भारतातूनच नव्हे, तर अफगाणिस्तान, मध्य आशिया आणि सध्याच्या पाकिस्तानच्या सीमावर्ती भागांतूनही विद्यार्थ्यांना आकर्षित केले. अफगाण विद्वान देवबंदमध्ये शिकणाऱ्या सुरुवातीच्या परदेशी विद्यार्थ्यांपैकी होते, जे काबूल, कंधार आणि खोस्त येथे परत जाऊन, येथील अभ्यासक्रमावर आधारित मदरसे स्थापन करू लागले.

प्रसिद्ध 'रेशमी पत्र आंदोलना'च्या (१९१३-१९२०) काळात, देवबंदी मौलवींनी भारतातील ब्रिटिश राजवटीला आव्हान देण्यासाठी ओटोमन साम्राज्य, अफगाणिस्तान आणि जर्मन साम्राज्यासोबत युती करण्याचा प्रयत्न केला होता. या संबंधांनी भारत-अफगाण धार्मिक आणि राजकीय चेतनेवर एक अमिट छाप सोडली.

२०व्या शतकाच्या मध्यापर्यंत अफगाण विद्यार्थी दारुल उलूम देवबंदमध्ये येत राहिले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि पाकिस्तानच्या निर्मितीनंतर, अफगाण विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाले, पण ते पूर्णपणे थांबले नाही. १९५० ते १९७० च्या दशकाच्या अखेरपर्यंत, तरुण अफगाण देवबंदमध्ये शिकत राहिले.

पाकिस्तानमुळे बदललेली समीकरणे

१९७९ मध्ये सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानवर केलेल्या आक्रमणानंतर हा बौद्धिक मार्ग अचानक बंद झाला. पाकिस्तान लाखो विस्थापित अफगाणांसाठी आश्रयस्थान बनले आणि पाकिस्तानी भूमीवरील देवबंदी मदरसे, विशेषतः अकोरा खट्टकमधील दारुल उलूम हक्कानिया, भारतीय मदरशांना पर्याय म्हणून उदयास आले.

याच पाकिस्तानी संस्थांमध्ये तालिबानची वैचारिक पायाभरणी झाली. सौम्या अवस्थी लिहितात, "अशाप्रकारे, भारतातून पश्चिमेकडे गेलेल्या देवबंदी विचारसरणीचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेले. ती आपल्या विद्वत्तापूर्ण आणि सुधारणावादी भावनेतून मुक्त होऊन, पाकिस्तानच्या सामरिक गरजा, अमेरिका-सौदी शीतयुद्धाचा पैसा आणि अफगाण जिहादमुळे निर्माण झालेल्या कट्टरतावादी चारित्र्यात मिसळून गेली."

१९९४ मध्ये उदयास आलेल्या तालिबान चळवळीने देवबंदवादाची चिन्हे आणि शब्दसंग्रह वापरला, परंतु त्याच्या बौद्धिक शिस्तीचा किंवा बहुलतावादी संयमाचा अवलंब केला नाही.

मुत्तकी यांच्या दौऱ्यामागील रणनीती

अमीर खान मुत्तकी यांची दारुल उलूम देवबंदची भेट प्रतीकात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. हा धार्मिक मुत्सद्देगिरीचा एक विचारपूर्वक आखलेला डाव आहे. तालिबानसाठी, हा दौरा पाकिस्तानच्या देवबंदी नेटवर्कपासून आपले नाते तोडण्याचा आणि आपली वैचारिक सत्यता स्थापित करण्याचा एक प्रयत्न आहे. दारुल उलूम देवबंदशी सार्वजनिकरित्या जोडून, ते एका अतिरेकी राजवटीऐवजी एका विद्वान इस्लामिक सुधारणा आंदोलनाचे वारस म्हणून आपली ओळख पुन्हा स्थापित करू इच्छितात.

यासोबतच, हा दौरा तालिबानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक सौम्य प्रतिमा सादर करण्यास मदत करतो. भारतात देवबंद आपल्या नैतिक पुराणमतवादीपणासोबतच, आपल्या शांततापूर्ण दृष्टिकोनासाठीही ओळखला जातो. या मदरशाशी जोडून घेतल्याने तालिबानला आपली प्रतिमा सुधारण्याची संधी मिळते.

भारतासाठी असलेली संधी: '4 D' फ्रेमवर्क

तालिबानच्या या पुढाकारामुळे भारताला त्याच श्रद्धेच्या माध्यमातून संवादाची संधी मिळाली आहे. नवी दिल्लीला हे फार पूर्वीपासून वाटत आले आहे की, अफगाणिस्तानची स्थिरता त्याच्या प्रादेशिक हितांसाठी महत्त्वपूर्ण आहे. आतापर्यंत भारताचा संवाद पायाभूत सुविधा, विकास आणि मानवतावादी मदतीवर केंद्रित होता, पण आता त्यात 'धार्मिक मुत्सद्देगिरी' या चौथ्या आणि अधिक सूक्ष्म पैलूची भर घालण्याची गरज आहे.

सौम्या अवस्थी यांनी "4 D" - कूटनीति, विकास, संवाद आणि देवबंद (Diplomacy, Development, Dialogue and Deoband) या चौकटीचा उल्लेख केला आहे. देवबंदी परंपरेतील भारताचे ऐतिहासिक नेतृत्व त्याला वैचारिकदृष्ट्या एक भक्कम स्थान देते. ज्ञान, नैतिक अखंडता आणि शांततापूर्ण सहअस्तित्वावर पारंपारिक देवबंदी विचारधारेवर जोर देऊन, नवी दिल्ली अफगाण धर्मगुरूंच्या धार्मिक कलांना शांतपणे योग्य दिशा देऊ शकते.

मूळ देवबंद आंदोलन हे आध्यात्मिक सुधारणा, शिक्षण आणि राष्ट्रीय सहअस्तित्वासाठी उभे होते - ही मूल्ये पाकिस्तानात प्रचारित झालेल्या अतिरेकी देवबंदवादामध्ये अनुपस्थित होती. भारताने हीच विचारसरणी पुढे आणल्यास, पाकिस्तानने चुकीच्या पद्धतीने पसरवलेला विचार खोडून काढता येईल.

तालिबानकडून दारुल उलूम देवबंदचा वारंवार होणारा उल्लेख, हा स्वतःला वैधता मिळवून देण्याचा एक प्रयत्न आहे. हक्कानिया मदरशाने त्यांच्या राजकीय स्वरूपाला आकार दिला असला तरी, देवबंद त्यांना तो बौद्धिक वारसा देतो जो पाकिस्तान देऊ शकत नाही. देवबंदला आपले आध्यात्मिक उगमस्थान सांगून, तालिबान आपल्या राजवटीला धार्मिक वैधतेचे आवरण घालू इच्छितो आणि स्वतःला ISIS-K सारख्या सलाफी आणि वहाबी आंदोलनांपासून वेगळे दाखवू इच्छितो.

तालिबान आणि दारुल उलूम देवबंद यांच्यातील विकसित होणारे नाते, दक्षिण आशियाई इस्लामच्या वारशावरील एका व्यापक संघर्षाचे प्रतीक आहे. जिथे पाकिस्तानच्या मदरशांनी देवबंदवादाला भू-राजकीय प्रभावाचे साधन बनवले, तिथे भारताने आपली धार्मिक शुद्धता आणि बौद्धिक खोली कायम ठेवली.

देवबंदच्या माध्यमातून संवाद, भारताला औपचारिक मुत्सद्देगिरीच्या अडथळ्यांशिवाय तालिबानच्या वैचारिक दिशेला योग्य वळण देण्याची संधी देतो. म्हणून, मुत्तकी यांची देवबंद भेट केवळ प्रतीकात्मक कृतीपेक्षा अधिक आहे. जर भारताने या संधीचा दूरदृष्टीने आणि दृढनिश्चयाने फायदा घेतला, तर ही बाब दोन्ही देशांच्या समान आध्यात्मिक वारशाला प्रादेशिक स्थैर्य आणण्यासाठी  निश्चितच वापरता येऊ शकेल.

(लेखक ‘आवाज द व्हॉइस’च्या हिंदी विभागाचे संपादक आहेत.)


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter