दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची झुंबड

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

दिवाळीचा सण आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील बाजारपेठा सजल्या असून घरोघरी सणाची तयारी सुरू झाली आहे. रविवारी (ता. १२) वीकेण्डचा मुहूर्त साधून अनेकांनी सहकुटुंब घराबाहेर पडत खरेदीचा आनंद लुटला.

राज्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान शनिवार-रविवारच्या दिवशी दुकानदारांनीही ग्राहकांची सोय लक्षात घेऊन रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवली होती. मोठ्या खरेदीसोबतच लहान-सहान वस्तूंच्या खरेदीसाठीही लोकांची गर्दी होती. त्यामुळे इलेक्ट्रिशियनच्या दुकानांपासून ते मोठ्या मॉलपर्यंत सर्वत्र ग्राहकांची झुंबड पाहायला मिळाली.

आधुनिकतेचा संगम आणि सवलतींचा वर्षाव
यंदा दिवाळीच्या खरेदीत पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचा संगम दिसून आला. घरसजावटीच्या वस्तू, दिवे, फुलांच्या माळा, आकाशकंदील, रांगोळीचे रंग, कपडे, दागिने आणि मिठाई यांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. विशेषतः 'थ्री-डी' आणि सोलार लाइट असलेले आकाशकंदील लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्याचबरोबर पर्यावरणपूरक कापडी आणि कागदी आकाशकंदिलांनाही मोठी मागणी होती. अनेकांनी प्लॅस्टिकमुक्त सजावटीच्या वस्तूंना प्राधान्य दिले.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापाऱ्यांनी विविध सवलतींचा वर्षाव केला. इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, फर्निचर आणि सोन्याच्या दागिन्यांवर 'फेस्टिव्हल ऑफर्स' देण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी 'एकावर एक मोफत' किंवा 'फ्लॅट डिस्काउंट'ला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. 

महाराष्ट्रभरात दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह पाहायला मिळाला. या वातावरणाबाबत संभाजीनगर येथील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष युसूफ मुकाती यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "ग्राहकांना विविध प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत. तसेच होणारी गैरसोय टाळण्यासाठी महापालिका आणि पोलिस प्रशासन सहकार्य करत आहे. सुट्टीचा दिवस असल्याने बाजारात ग्राहकांनी गर्दी केली होती. गतवर्षीच्या तुलनेत खरेदीचा उत्साह अधिक आहे."