दर्गा ट्रस्टच्या अध्यक्षा शकीला पटेल, वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने आणि दोन्ही समाजातील नागरिक एकमेकांना शुभेच्छा देताना
भक्ती चाळक
एका बाजूला हजरत पीर दस्तगीर दर्ग्याची संदल मिरवणूक आणि दुसऱ्या बाजूला दुर्गा मातेच्या नवरात्रोत्सवाची मिरवणूक. हे दृश्य आहे कोरेगाव तालुक्यातील बनवडी येथील. या दोन्ही मिरवणुका बनवडी गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकत्र आल्या होत्या. यावेळी दोन्ही धार्मिक परंपरांचा संगम तर झालाच पण एकात्मतेचा आणि बंधुभावाचा एक नवा अध्याय देखील लिहिला गेला. बनवडीकरांनी या ऐतिहासिक क्षणातून सामाजिक ऐक्य आणि धार्मिक सलोख्याचे उदाहरण समाजापुढे ठेवले.
साताऱ्यातील बनवडी गाव हे सामाजिक आणि धार्मिक सलोख्याचे केंद्र राहिले आहे. इथे हिंदू-मुस्लीम समाज सलोख्याने नांदतो, त्यांच्या रोजच्या जीवनात याचे प्रतिबिंबही पाहायला मिळतात. नुकतेच एप्रिल महिन्यात झालेल्या ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात गावातील मुस्लिम समाजाने काल्याच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते. यातून त्यांनी ‘एक गाव, एक परिवार’ ही भावना साकारली. त्याच भावनेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला तो नुकत्याच घडलेल्या या दोन मिरवणुकांच्या भेटीतून.
मुस्लीम मावळ्याची छत्रपतींना मानवंदना
या दोन्ही मिरवणूका एकत्र आल्या त्यावेळी अरबाज शेख यांनी छत्रपती शिवरायांचा गुणगौरव करत काव्यात्मक मानवंदना दिली. या प्रसंगाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाण व्हायरल झाला. लोकांनी अरबाज यांच्या या कृतीचे भरभरून कौतुक केले.
हजरत पीर दस्तगीर यांचा हा केवळ साताऱ्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्र आणि देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मुस्लिम जगतात 'ग्यारवी शरीफ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवशी येथे मोठा उरूस भरतो. बगदादचे सुफी संत अब्दुल कादिर जिलानी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस जगभर साजरा केला जातो आणि बनवडीचा दर्गा त्यांचेच एक प्रतीकात्मक स्थान (चिल्ला) मानले जाते. त्यामुळे या उरुसाच्या काळात हजारो भाविक गडावर असलेल्या या दर्ग्याच्या दर्शनासाठी येतात. याकाळात गावात मोठी आर्थिक आणि सांस्कृतिक उलाढाल होते. त्यामुळे हा दर्गा येथील गावांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे.
या ऐतिहासिक घटनेनंतर हजरत पीर दस्तगीर दर्गा ट्रस्टच्या अध्यक्षा शकीला पटेल यांनी ‘आवाज मराठी’ला प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “आमचा सातारा जिल्हा हा त्यावेळचा शिवाजी महाराजांचा बालेकिल्ला. महाराजांचे विचार आणि त्यांच्या शिकवणीचे आम्ही आजही अनुसरण करतो. त्यामुळे आमच्या या भागात कधीच जातीय तेढ निर्माण होत नाही. उलट आम्ही हिंदू-मुस्लीम सगळे सण एकोप्याने साजरे करतो. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा अख्ख्या महाराष्ट्राला आमच्या एकीचा प्रत्यय आला असेल.”
या अनोख्या संगमाविषयी सविस्तर माहिती देताना शकीला पटेल म्हणाल्या की, “दरवर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दुर्गा मातेच्या पालखीची मिरवणूक असते. योगायोगाने यावर्षी त्याच दिवशी दर्ग्याचा संदल देखील होता. हे दोन्ही एकाच दिवशी आल्याने गावकऱ्यांपुढे प्रश्न निर्माण झाला. यावर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायतचे दोन सदस्य आणि दर्गा ट्रस्टचे एक संचालक आणि मी अशी आमची बैठक पार पडली. आणि यातून एक सलोख्याचा मार्ग निघाला.”
त्या पुढे म्हणतात, “दोन्ही मिरवणुका एकाच दिवशी काढण्याचा निर्णय आमच्या बैठकीत झाला. परंतु धार्मिक आणि भावनिक विषय असल्याने असल्याने मनात भीतीही होती. मग मुस्लीम समाजाला विश्वासात घेऊन हा सोहळा शांततेत पार पाडण्याची जबाबदारी आम्ही घेतली. तसेच हिंदू समाजाची जबाबदारी नवरात्रोत्स समितीने घेतली. मग ठरलं, दोन्ही मिरवणुका एकाच दिवशी करून समाजाला सलोख्याचा संदेश द्यायचा.”
त्यांच्या या निर्णयाला पोलीस प्रशासनाची कशी साथ मिळाली, याविषयी शकीला म्हणतात, “हा प्रस्ताव घेऊन आम्ही वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात गेलो. आमचा प्रस्ताव मांडल्यावर पोलिसांच्या चेहऱ्यावरही संकोच दिसत होता. कारण अशा धार्मिक सोहळ्यांमध्ये पोलिसांची भूमिका आणि जबाबदारी खूप मोठी असते. पहिल्यांदा त्यांचे उत्तर नकारार्थीच आले. परंतु आमचे बनवडी गाव पहिल्यापासूनच हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतिक राहिले आहे, म्हणून इथे विपरीत घटना घडणे शक्यच नव्हते. दोन्ही बाजूने असं काहीच घडणार नाही असा, विश्वास आम्ही पोलिसांना दिला.”
त्या पुढे म्हणतात, “आमच्या या निर्णयाचे पोलिसांनी कौतुक तर केलेच परंतु, दोन्ही मिरवणुकांचा संगम घडवण्याची संकल्पना त्यांनी दिली. अशारितीने एकाच दिवशी दुर्गा मातेची मिरवणूक आणि पीरबाबांच्या दर्ग्याची संदल मिरवणूक यांचा संगम झाला. आणि यातून सातारकरांनी पुन्हा एकदा सौहार्दाचा संदेश दिला. या घटनेनंतर महाराष्ट्रभरातून आम्हाला प्रतिक्रिया आल्या. आणि आमच्या निर्णयाचे कौतुक देखील झाले.”
वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी या भेटीसाठी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या समन्वयामुळे हा अभूतपूर्व सोहळा यशस्वी झाला. अविनाश माने यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाच्या वतीने दोन्ही समाजाशी समन्वय साधला गेला. हा सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी गावकऱ्यांचेही मोठे सहकार्य लाभले. तमाम बनवडीकरांनी कृतीद्वारे सामाजिक ऐक्य जपण्याचा संदेश दिला आहे.”
शाहू महाराजांनी सुरु केली संदलची प्रथा
हजरत पीर दस्तगीर दर्ग्याचा इतिहास सांगताना शकीला म्हणतात, “हा दर्गा चारेकशे वर्षे जुना असल्याचे येथील लोक सांगतात. सतराशेच्या काळात अदिलशहाने चंदनवंदन किल्ला बांधला होता. तेव्हापासूनच तिथे हजरत पीर दस्तगीर बाबांचा चिल्ला (ध्यानधारणेचे ठिकाण) होता. नंतर शिवाजी महाराजांनी तो किल्ला जिंकला आणि तो दर्गा त्यांनी अबाधित ठेवला. मग नंतरच्या काळात शाहू महाराजांनी हजरत पीर दस्तगीर दर्ग्याचा संदल आणि उरुसाची प्रथा सुरु केली.”
त्या पुढे म्हणाल्या, “चंदनमधील महबूब सुभानी गौस पाक बाबा दर्गा आणि वंदन येथील अब्दाल साहब दर्गा या दोन्ही ठिकाणचा उरूस देखील शाहू महाराजांनी सुरु केला. त्यावेळी शाहू महाराजांनी या दर्ग्यासाठी मुस्लीम सुभेदारांना भरपूर जमिनी इनाममध्ये दिलेल्या आहेत, असे सांगण्यात येते. त्यामुळे महाराजांचा हा वारसा आम्ही नेटाने जपण्याचा प्रयत्न करत आहोत.”
ट्रस्टच्या माध्यमातून गरजवंतांची मदत
हजरत पीर दस्तगीर दर्गा ट्रस्टची स्थपना २००७ मध्ये झाली. तेव्हापासून ट्रस्टचे न्यायालयीन कामकाज शकीला पटेल या पाहात आल्या आहेत. कोरोनानंतरच्या काळात त्या ट्रस्टच्या अध्यक्षा झाल्या. आता शकील इब्राहीम पटेल आणि इतर सहकाऱ्यांसमवेत त्या ट्रस्टचे कामकाज पाहात आहेत. या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.
याविषयी शकीला सांगतात, “ट्रस्टला म्हणावे तेवढे उत्पन्न मिळत नाही पण आम्हाला आमच्यापरीने जेवढे मदतकार्य करता येईल तेवढे करतो. समाजाला थोडा आधार देण्याच्या उद्देशाने मी कुटुंब आणि पाहुणे मंडळीच्या सहाय्याने २०१५ मध्ये एका संस्थेची स्थापना केली. ट्रस्टच्या माध्यमातून जेवढी आर्थिक मदत करता येईल तेवढी करतोच पण आमच्या संस्थेच्या माध्यमातून देखील मोठा हातभार लावतो. लग्न, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात आम्ही जास्तीत जास्त आर्थिक मदत देतोय.”
शेवटी शकीला म्हणतात, “मदतकार्य करताना आम्ही कुणाचाही धर्म बघत नाही, आम्ही बघतो तो केवळ गरजवंत. ईदला तुमच्याकडे बिर्याणी बनली आहे. मात्र तुमच्या बाजूचा मुस्लीम किंवा गैरमुस्लिम व्यक्ती उपाशी आहे आणि तुम्ही ईद साजरी करताय तर तो सण सुद्धा हराम आहे, असे धर्मामध्ये सांगितले आहे. हा संदेश समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, जेणेकरून कुणावरही अन्याय होणार नाही. आपण सर्व एकत्र राहिलो तरच आपला देश अधिक बलवान होणार आहे.”