लालबाग गणेशोत्सवाच्या मखमली पडद्याला हिंदू-मुस्लीम एकतेची वीण

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

गणेशोत्सव केवळ सण नाही, तर संस्कृती, परंपरा आणि एकतेचा संगम आहे. देशभरात दहा दिवस अगदी धूमधड्याक्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातच रोवली गेली. यावर्षी राज्य सरकारने हा उत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून जाहीर केला आहे. हा दर्जा मिळाल्याने या उत्सवाला शासकीय स्तरावर अनुदान आणि मदत मिळणार आहे. लोकसहभाग, डिजिटल प्रसार, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता आणि पर्यावरणपूरक उपक्रम यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता समाजाला एकत्र आणणारा सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे.

या उत्सवातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मुंबईतील लालबागचा राजा. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला हा गणपती राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून जगभर ओळखला जातो. आज या उत्सवाचे ९२वे वर्ष. नवसाचा गणपती म्हणून देखील प्रसिद्ध असलेला हा गणपती केवळ इच्छापूर्तीचेच नाही तर सामाजिक एकतेचे देखील प्रतीक आहे. लालबागचा राजा उत्सव मंडळाच्या एका कृतीतून जगाला हिंदू-मुस्लीम सामाजिक ऐक्याचे दर्शनही घडले आहे. ते कसे आजच्या या विशेष लेखातून जाणून घेऊया. 

एकतेची वीण घातलेला मखमली पडदा 
यंदा लालबागच्या राजाची आरास तिरुपती बालाजीच्या स्वर्ण थीमवर आधारित आहे. राजाची भव्य मूर्ती गडद लाल रंगाच्या पितांबरात सुवर्ण सिंहासनावर विराजमान झालेली आहे. डाव्या हातात धारण केलेले चक्र, उजव्या हातात शंख आणि डोक्यावर भव्य मुकुट घातलेले हे रूप भाविकांना मंत्रमुग्ध करत आहे. गणरायाभोवती चमकणारे दिवे, सोन्याची सजावट आणि प्रवेशद्वारावर उभे हत्ती यामुळे मंडपाला जणू काही राजवाड्याचे स्वरूप देण्यात आले आहे. हे सर्व असले तरीही या वर्षाच्या सजावटीचे वैशिष्ट्य म्हणजे मंडपासमोरचा ५० फूट उंच मखमली पडदा.

यंदा तिरुपती बालाजीचा भव्य मुकूट साकारण्यात आल्याने मंडपाची उंचीही ५० फुटांपर्यंत वाढवावी लागली. त्यामुळे या मंडपासमोर आवश्यक असलेला भरजरी मखमली पडदा तयार करणे हे खरे तर मोठे आव्हान होते. खूप प्रयत्न करूनही कुशल कारागीर मिळणे अवघड झाले होते. मंडळातर्फे त्यासाठी देशभर कारागिरांचा शोध सुरू झाला आणि शेवटी तोडगा मिळाला तो उत्तर प्रदेशातील एका मुस्लीम व्यक्तीकडे. लखनऊच्या एका गावातील मोहम्मद आमीर खान यांनी आपल्या साथीदारांसह हा पडदा तयार करण्याचे आव्हान पेलवले. मंडळाने सोपवलेले हे काम त्यांनी चोखपणे पूर्ण करून आपली कलाकुसर अप्रतिम रीतीने सादर केली आहे. 
 
 
५० फूट उंच मखमली पडद्याची वैशिष्ट्ये 
मंडपासमोर बसवला गेलेला हा पडदा ५० फूट उंच आणि रुंद आहे. त्याच्या निऱ्या बसवलेला घेरही तब्बल आठ फुटाचा आहे. लखनऊहून आलेले खान चाचा पाच ते सहा दिवसांहून अधिक काळ या पडद्यासाठी मशीनवर रात्रंदिवस मेहनत घेत होते. मखमल आणि भरजरी नक्षीकाम असलेल्या या पडद्यामुळे लालबागच्या राजाची यंदाची आरास अधिक भव्य दिसणार आहे.  हा पडदा केवळ सजावटीपुरता मर्यादित नसून तो एकता, श्रद्धा आणि कलेचा संगम बनला आहे. 
 

गणेशोत्सवाच्या पार्शभूमीवर समाजात धार्मिक सौहार्द निर्माण करण्याचे हेतूने एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने व्हिडीओ बनवला. मात्र या व्हिडीओमुळे अनेकांच्या भावना दुखवल्या गेल्या. मुस्लिम मुर्तीकाराकडून मूर्ती विकत घेण्याच्या या व्हिडीओवरून सध्या वादंग पेटले आहे. समाजात द्वेषयुक्त वातावरणाची सरशी होत असताना महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय गणपती म्हणून ओळख असलेल्या लालबागचा राजा उत्सव मंडळाने सौहार्दाची घट्ट वीण घातली आहे. त्यांच्या या निर्णयाने खऱ्या अर्थाने सार्वजनिक गणेश उत्सवाचे वास्तव जगाला दाखवून दिले आहे. 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter