पाकिस्तानमध्ये 'तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान' (TLP) या कट्टरतावादी संघटनेने लष्कर आणि सरकारविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, देशात गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. लाहोरसह अनेक शहरांमध्ये TLP कार्यकर्ते आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार संघर्ष पेटला असून, आंदोलकांनी पोलिसांवर थेट गोळीबार आणि ॲसिड हल्ला केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
लाहोरमध्ये परिस्थिती सर्वाधिक तणावपूर्ण आहे. पंजाब प्रशासनाने TLP कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताच, दोन्ही बाजूंमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. आंदोलकांनी दावा केला आहे की, पोलीस त्यांच्यावर थेट गोळीबार आणि प्रचंड शेलिंग करत आहेत, ज्यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे, काही वृत्तांनुसार, आंदोलकांनी पोलिसांवर ॲसिडने हल्ला केल्याचा आरोप आहे.
या आंदोलनाचे लोण आता राजधानी इस्लामाबाद आणि रावळपिंडीपर्यंत पोहोचले आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून, सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून या दोन्ही शहरांमधील मोबाईल इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद केली आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
TLP ने आपल्या मागण्यांसाठी सरकार आणि लष्कराला थेट आव्हान दिल्याने, पाकिस्तान सरकार मोठ्या पेचात सापडले आहे. रस्त्यांवर उतरलेल्या हजारो कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणणे सुरक्षा दलांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. या वाढत्या संघर्षामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा मोठ्या राजकीय आणि सामाजिक संकटात सापडला आहे.