आशिया चषकाचा विजेता भारत, पण ट्रॉफी दुबईत 'ताळेबंद'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारतीय संघाने जिंकलेल्या आशिया करंडकाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ही ट्रॉफी परिषदेच्या मुख्यालयात ताळेबंद केली आहे आणि आपल्या सूचनेशिवाय तिला कोणी हात लावू नये, असे आदेश दिले आहेत.

आशिया करंडक अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर भारतीय संघ पारितोषिक वितरण समारंभासाठी मैदानात उपस्थित होता, परंतु नववी यांच्या हस्ते करंडक आम्ही स्वीकारणार नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर नववी यांनी करंडकासह पलायन केले होते.

नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष असून, पाक सरकारमध्ये गृहमंत्रिपदही ते सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांच्या हस्ते करंडक न स्वीकारण्यास भारतीय खेळाडू ठाम राहिले.

दुबईमध्ये असलेल्या आशिया क्रिकेट परिषदेच्या कार्यालयात आशिया ट्रॉफी बंदिस्त आहे. माझ्या संमतीशिवाय ही ट्रॉफी कोठेही हलवू नये, अशा स्पष्ट सूचना नक्वी यांनी आम्हाला दिल्या आहेत, असे कार्यालयातील एका व्यक्तीने पीटीआयला सांगितले. हा करंडक मीच भारतीय संघाला देणार, असेही ते म्हणाले आहेत.

संपूर्ण आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा भारत-पाकिस्तान यांच्यातील ताणलेल्या संबंधांमुळे गाजली. भारतीय संघाने त्यांच्याकडून करंडक स्वीकारण्यास नकार दिला याचा अर्थ नक्वी करंडक स्वतः घेऊन जाऊ शकत नाहीत, अशी टीका भारतीय क्रिकेट मंडळाकडून करण्यात आली आहे. या स्पर्धेचे यजमान आणि विजेते भारत आहेत, हे नक्वी यांनी लक्षात ठेवावे, असेही बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.

नक्वी यांची उचलबांगडी ?
नक्वी यांनी करंडकासह पलायन केल्यानंतरही आयसीसीकडून मतप्रदर्शन करण्यात आलेले नाही. आयसीसीची पुढील महिन्यात बैठक होत आहे. त्यात नक्वी यांची आयसीसीमधूनच हकालपट्टी केली जाण्याची शक्यता आहे.