भारतीय क्रिकेट संघाने रविवारी पाकिस्तानला धूळ चारत आशियाई करंडकाच्या जेतेपदावर नाव कोरले; मात्र आशियाई क्रिकेट काउन्सिलचे चेअरमन मोहसिन नक्वी यांच्या हस्ते भारतीय संघाने करंडक स्वीकारण्यास नकार दिला. नववी यांनी मात्र इतर मान्यवरांच्या हस्ते भारतीय संघाला करंडक देऊ केला नाही. आता दोन दिवसांनंतरही भारताकडे विजेतेपदाचा करंडक देण्यात आलेला नाही. याचा तीव्र आक्षेप बीसीसीआयकडून आशियाई क्रिकेट काउन्सिलच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत नोंदवण्यात आला आहे. भारतीयांकडून त्यांना खडेबोल सुनावण्यात आले. तरीही नक्वी यांनी विजेतेपदाचा करंडक देण्यास नकार सांगत आपला आडमुठेपणा कायम ठेवला आहे.
आशियाई क्रिकेट काउन्सिलच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत बीसीसीआयकडून उपाध्यक्ष राजीव शुक्ला व माजी खजिनदार आशीष शेलार उपस्थित होते. याप्रसंगी आशियाई क्रिकेट काउन्सिल समितीतील सूत्रांकडून सांगण्यात आले, की आशियाई करंडक आटोपल्यानंतर बक्षीस सोहळ्यात मोहसिन नक्वी यांच्याकडून ज्याप्रकारे वर्तणूक करण्यात आली, त्यावर बीसीसीआयकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे. तसेच अजूनही करंडक सुपूर्द करण्यात आला नसल्याबाबतचे परखड मत व्यक्त करण्यात आले आहे.
राजीव शुक्ला यांनी या बैठकीत आपले मत व्यक्त करताना म्हटले, की आशियाई क्रिकेट काउन्सिल यांच्या वतीने आशियाई स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्यानंतर विजयी झालेल्या संघाला हा करंडक द्यावा, हे साहजिकच आहे. या करंडकावर कोणा एका व्यक्तीचा हक्क असू शकत नाही.
करंडक देण्यास नकार
आशियाई करंडक बक्षीस सोहळ्यास मोहसिन नक्वी यांची गैरवर्तणूक प्रकर्षाने दिसून आली. इतर मान्यवरांच्या हस्ते भारतीय संघाला आशियाई करंडक देण्यात आला नाही. जवळपास एक तासाच्या प्रतीक्षेनंतरही विजेता संघ जेतेपदाच्या करंडकापासून दूर राहिला. अखेर नक्वी यांनी विजेतेपदाचा करंडक व मेडल्स आपल्यासोबत नेले. आता दोन दिवसांनंतरही ते करंडक देण्यास तयार नाहीत.
आयसीसीच्या बैठकीत आवाज उठवणार
मोहसिन नक्वी यांनी या बैठकीत सुरुवातीला वेस्ट इंडीजला पराभूत करणाऱ्या नेपाळ संघाचे कौतुक केले. मात्र आशियाई विजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन केले नाही. यावर आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला. तसेच या प्रकरणाबाबत नोव्हेंबर महिन्यात होत असलेल्या आयसीसीच्या बैठकीत आवाज उठवण्यात येईल, असे भारतीयांकडून सांगण्यात आले. दरम्यान, भारताविरुद्ध युद्ध करणाऱ्या व्यक्तीकडून आपल्या संघाने विजेतेपदाचा करंडक स्वीकारण्यास नकार दिला. याचे समर्थन बीसीसीआय सचिव देवजित सैकिया यांनी याप्रसंगी केले. आम्ही त्यांच्या हातून करंडक स्वीकारायचा नाही, याचा निर्णय घेतला होता. याचा अर्थ त्यांनी करंडक आणि आमच्या खेळाडूंची विजयी मेडल्स घेऊन हॉटेलला जाणे अत्यंत चुकीचे आहे, असे सैकिया पुढे म्हणाले.