विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर 'विराट' विजय, ८८ धावांनी चारली धूळ!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

आयसीसी महिला विश्वचषकात भारताने आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ८८ धावांनी धुव्वा उडवत, आपल्या विश्वचषक अभियानाची विजयाने शानदार सुरुवात केली आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर भारतीय संघाने केलेल्या जबरदस्त कामगिरीपुढे पाकिस्तानचा संघ हतबल दिसला. या विजयामुळे भारताने पाकिस्तानवरील सलग १२वा एकदिवसीय विजय नोंदवला आहे.

कोलंबोच्या रणसिंगे प्रेमदासा मैदानावर झालेल्या या सामन्यात, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी संयमी सुरुवात केली, मात्र कोणीही मोठी धावसंख्या उभारू शकले नाही. हरलीन देओल (४६), रिचा घोष (३५) आणि जेमिमा रॉड्रिग्स (३२) यांच्या उपयुक्त खेळींमुळे भारताने २४७ धावांपर्यंत मजल मारली.

२४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत पाकिस्तानच्या फलंदाजांना जखडून ठेवले. क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी ३ बळी घेत पाकिस्तानचा डाव १५९ धावांत गुंडाळला. पाकिस्तानकडून सिद्रा अमीनने एकाकी झुंज देत ८१ धावा केल्या, पण तिचे प्रयत्न अपुरे पडले.

या विजयाने भारताने सलग दुसरा विजय मिळवत गुणतालिकेत ४ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब क्रांती गौडने पटकावला.