दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठाभोवतीचे फास आवळले जात आहेत. या विद्यापीठाचे अध्यक्ष आणि संस्थापक जावाद अहमद सिद्दीकी यांना अटक केल्यानंतर, आता संस्थेतील २०० हून अधिक डॉक्टर आणि कर्मचारी तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.
सध्या सुरू असलेल्या या तपासादरम्यान विद्यापीठात सुरक्षा यंत्रणांची सततची तपासणी आणि छापेमारी सुरू आहे. यामुळे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक कर्मचारी आपले सामान गुंडाळून रजेवर गेले आहेत आणि आपापल्या घरी परतत आहेत.
स्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठातून नेमके किती लोक निघून गेले आहेत, याचा आकडा तपास अधिकारी निश्चित करत आहेत आणि त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. स्फोटासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांशी यातील काही व्यक्तींचे संबंध असावेत, असा तपास यंत्रणांना संशय आहे.
याव्यतिरिक्त, अनेक लोकांनी आपल्या मोबाइलमधील डेटा डिलीट केल्याचेही समोर आले आहे. आता अधिकारी या डिलीट केलेल्या डेटाचाही तपास करणार आहेत. आतापर्यंत १,००० हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच, कॅम्पसच्या बाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांची आणि खोल्यांची झाडाझडती पोलीस घेत आहेत.
बॉम्बरला खोली देणारी महिला ताब्यात
या प्रकरणातील सुईसाईड बॉम्बर डॉ. उमर उन नबी याला हरियाणातील नूह येथील हिदायत कॉलनीत खोली भाड्याने देणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. लाल किल्ला स्फोटानंतर ही महिला फरार होती. तिच्या कुटुंबाचीही चौकशी सुरू आहे. नूहमध्ये उमरचे कोणाशी संबंध होते, हे शोधण्यासाठी इतर सात जणांचीही चौकशी करण्यात आली आहे. या भाड्याच्या खोलीत राहताना सुईसाईड बॉम्बरने अनेक मोबाईल फोन्सचा वापर केल्याचे वृत्त आहे.
अल-फलाह मेडिकल कॉलेजशी बॉम्बरचे कनेक्शन
१० नोव्हेंबरच्या स्फोटात १२ हून अधिक लोकांचा बळी गेल्यानंतर अल-फलाह मेडिकल कॉलेज वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. तपासाला सुरुवात झाल्यापासून रुग्णालयातील रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटापूर्वी बाह्यरुग्ण विभागात (OPD) दररोज सुमारे २०० रुग्ण येत असत, ती संख्या आता १०० च्या खाली आली आहे.
डॉ. उमरला संस्थेत 'खास वागणूक' दिली जात होती का आणि विद्यापीठात त्याचा कोणी 'हँडलर' होता का, याचा शोध सुरक्षा यंत्रणा घेत आहेत.
अल-फलाह मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीला असलेला डॉ. उमर उन नबी २०२३ मध्ये रजा किंवा सूचना न देता जवळजवळ सहा महिने रुग्णालय आणि विद्यापीठातून अनुपस्थित होता, अशी माहिती एमबीबीएस पूर्ण करून तिथेच उमेदवारी करणाऱ्या दोन डॉक्टरांनी दिली.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, परतल्यावर डॉ. उमरने पुन्हा कामावर रुजू होणे पसंत केले आणि त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तो खूप कमी तासिका) घेत असे. आठवड्यातून फक्त एक किंवा दोनच लेक्चर्स तो घ्यायचा आणि तीसुद्धा फक्त १५ ते २० मिनिटे चालायची. त्यानंतर डॉ. उमर आपल्या खोलीत परत जायचा. तो वर्गांची पूर्ण वेळ शिकवत नसल्यामुळे इतर प्राध्यापकांना हे खटकत असे.
विशेष म्हणजे, डॉ. उमरला रुग्णालयात नेहमी संध्याकाळची किंवा रात्रीची शिफ्ट दिली जायची, त्याला कधीही सकाळची शिफ्ट दिली जात नसे, असाही खुलासा डॉक्टरांनी केला आहे.
अल-फलाह विद्यापीठ तपासाच्या केंद्रस्थानी
लाल किल्ला स्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठ तपास यंत्रणांच्या रडारवर आहे आणि अधिकारी सध्या तिथे तळ ठोकून आहेत. १० नोव्हेंबरच्या स्फोटाचा मुख्य तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेव्यतिरिक्त (NIA), दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल, उत्तर प्रदेश एटीएस (ATS), फरिदाबाद गुन्हे शाखा आणि जम्मू-काश्मीर पोलीस सतत विद्यापीठाला भेटी देत आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सुद्धा मंगळवारी विद्यापीठाला भेट दिली आणि अल-फलाह समूहाचे अध्यक्ष जावाद अहमद सिद्दीकी यांना अटक केली. या समूहाचे विद्यापीठ, ट्रस्ट आणि संबंधित कंपन्यांशी जोडलेल्या दिल्ली आणि फरिदाबादमधील २५ हून अधिक ठिकाणी छापे टाकल्यानंतर ही अटक करण्यात आली.
सिद्दीकी यांना 'मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्या'च्या (PMLA) कलम १९ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. एका वरिष्ठ ईडी अधिकाऱ्याने सांगितले की, १९९५ मध्ये अल-फलाह ट्रस्टची स्थापना झाल्यापासून व्यवस्थापकीय विश्वस्त असलेले आणि समूहाच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावणारे सिद्दीकी, ट्रस्ट आणि त्याच्या शैक्षणिक नेटवर्कवर "पूर्ण नियंत्रण" ठेवून होते. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, दिल्ली न्यायालयाने बुधवारी सिद्दीकी यांना १३ दिवसांची ईडी कोठडी सुनावली.
दरम्यान, एनआयए (NIA) आणि सीबीआय (CBI) सह केंद्रीय तपास यंत्रणांनी आणि दिल्ली पोलिसांनी अशा डॉक्टरांची माहिती मागवली आहे, ज्यांनी भारताबाहेरून - विशेषतः पाकिस्तान, बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती आणि चीनमधून - वैद्यकीय पदव्या मिळवल्या आहेत. 'डॉक्टर टेरर मॉड्युल'च्या सदस्यांचे संभाव्य सहकारी किंवा समर्थक ओळखण्यासाठी हा गुप्तचर माहितीवर आधारित प्रयत्न सुरू आहे. सर्व तपास यंत्रणांनी विद्यापीठाच्या आवारातच एक तात्पुरते 'कमांड सेंटर' उभारले आहे.