पश्चिम बंगालच्या मिदनापूरमधील बेरा बल्लभपूर येथील सुफी चांदशाह पीर यांच्या दर्ग्याची गेल्या ५० वर्षांपासून हिंदू भाविकच काळजी घेत आहेत. हे भाविक केवळ दर्ग्याची स्वच्छता आणि देखभालच करत नाहीत, तर वेळोवेळी त्याच्या नूतनीकरणाची जबाबदारीही आनंदाने उचलतात.
स्थानिक लोकांच्या मते, १९७० च्या दशकापूर्वी सुफी चांदशाह पीर हे मिदनापूर शहरातील मुस्लिमबहुल बेरा बल्लभपूर परिसरात एका सुफी फकिराप्रमाणे राहत होते. ते हिंदूंमध्ये खूप लोकप्रिय होते. सर्वजण त्यांना 'चांदशाह बाबा' म्हणत. १९८० मध्ये वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
विशेष म्हणजे, त्यांच्यावर हिंदू समाजानेच दफनविधी केले. त्यांच्या अंत्यसंस्काराला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. साहजिकच त्यात बहुतांश हिंदू होते. चांदशाह पीर यांच्या दफनस्थानाचे रूपांतर पुढे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दर्ग्यात झाले.
लोकांचा विश्वास होता की, बाबा चांदशाह यांच्यात त्यांच्या समस्या सोडवण्याची दैवी शक्ती आहे. हळूहळू ही बाब सर्वत्र पसरली आणि दूरदूरवरून लोक त्यांच्या दर्ग्यात प्रार्थना करण्यासाठी येऊ लागले. आणि चांदशाह बाबा हिंदू समाजात खूप लोकप्रिय झाले.
विशेष म्हणजे, पीर बाबांच्या निधनानंतर, चमथ सेतुआ नावाच्या एका हिंदू भक्ताने आणि त्यांच्या कुटुंबाने चांदशाह पीर यांच्या कबरीचे दर्ग्यात रूपांतर करण्याचा पुढाकार घेतला. या कुटुंबाने दर्ग्याची देखभाल केली. सर्व धर्मांचे लोक येथे येऊ लागले. हळूहळू, चांदशाह बाबांची कीर्ती संपूर्ण मिदनापूर शहरात पसरली. सध्या, या मुस्लिमबहुल भागातील दर्ग्यात येणारे ८० टक्के भाविक हिंदू आहेत.
स्थानिक लोकांचा विश्वास आहे की, या दर्ग्यात प्रार्थना केल्याने निपुत्रिक जोडप्यांची इच्छा पूर्ण होते. नोकरी शोधणारे, व्यावसायिक आणि इतर अनेक लोकही येथे प्रार्थना करण्यासाठी येतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते.
या दर्ग्यात चैत्र महिन्याच्या शेवटच्या दिवशी वार्षिक उरुस भरतो. या उत्सवासाठी सुमारे एक लाख लोक येथे जमतात. वार्षिक उत्सवाव्यतिरिक्त, दर गुरुवारीही येथे विशेष कार्यक्रम होतात, जेव्हा सर्व समुदायांचे अनुयायी बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. या दिवशी दर्ग्यात विशेष प्रार्थना आयोजित केल्या जातात. इतकेच नाही, तर सर्व समुदायांकडून संयुक्तपणे भोजनाची व्यवस्थाही केली जाते.
या दिवशी पुलाव, वांग्याचे भरीत (बैंगन भज्जा), पांढरा भात, तीन प्रकारच्या भाज्या आणि पायस (खीर) असा प्रसाद असतो. शेकडो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात.
स्थानिक पत्रकार झुल्फिकार अली यांच्या मते, सेतुआ कुटुंबीय अनेक वर्षांपासून या दर्ग्याची काळजी घेत आहे. तथापि, स्थानिकांचे म्हणणे आहे की आर्थिक अडचणींमुळे अलीकडच्या काळात त्यांना दर्ग्याचे व्यवस्थापन करणे अवघड जात आहे आणि प्रशासनाने तो ताब्यात घ्यावा, अशी त्यांची इच्छा आहे. निवडणुकीच्या काळात बहुतेक उमेदवारांनी दर्ग्याचे नूतनीकरण करण्याचे आश्वासन दिले, पण प्रत्यक्षात काहीच झाले नाही, अशी खंतही भाविक बोलून दाखवतात.