गणेशमूर्ती पुराच्या पाण्यापासून सुरक्षितस्थळी हलवताना कराडमधील हिंदू-मुस्लीम तरुण
त्या संध्याकाळी साताऱ्यातील कराडात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. अतिवृष्टीमुळे कोयना नदीच्या काठावर पूरस्थिती निर्माण झाली होती. गणेशोत्सवाच्या तयारीत दंग असलेल्या कोटाखाली परिसरात गणेशमूर्ती बनवणाऱ्या कारागिरांच्या मनात धडकी भरली. मेहनतीने घडवलेल्या शेकडो गणेशमूर्ती पुराच्या पाण्यात वाहून जातात की काय अशी भीती निर्माण झाली होती. तेवढ्यात कराडकरांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर बातमी पसरली आणि हिंदू-मुस्लीम तरुण बाप्पांच्या मूर्ती वाचवण्यासाठी धावून गेले.
अनेक महिन्यांपासून रात्रंदिवस मेहनत करून घडवलेल्या मूर्ती पाण्यात वाहून जाऊ नये म्हणून स्थानिक कार्यकर्ते एकवटले. या हिंदू आणि मुस्लिम तरुणांनी खांद्याला खांदा लावून बचावकार्याला सुरुवात केली आणि सर्व मूर्ती सुरक्षित स्थळी हलवल्या. यात मोठी भूमिका बजावली ती मोहसिन कागदी यांनी. त्यांनी आपले गोडाऊन मूर्ती ठेवण्यासाठी खुले केले. ब्रदर्स फाऊंडेशनच्या सर्वधर्मीय कार्यकर्त्यांनी केलेल्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
त्यादिवशी घडलेल्या संपूर्ण प्रसंगाबद्दल बोलताना जय सूर्यवंशी म्हणाले की, “२०१९ला कराडमध्ये पूर आल्याने नदीलगतच्या गावांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. तिथे कुंभार समाज मोठ्याप्रमाण वास्तव्यास आहे. त्यावेळी आलेल्या पुरात त्यांच्या अनेक गणेशमूर्ती वाहून गेल्या आणि कुंभार समाजचे भरपूर नुकसान झाले होते. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर ग्राहकांनी त्यांच्याकडे गणेशमूर्ती बुक केल्या होत्या. पण ऐनवेळी ओढावलेल्या या परिस्थितीमुळे त्यांना गणेशमूर्ती देता आल्या नाहीत.”
जय यांनी पुढे सांगितले की, “यावेळी सुद्धा तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती. जोरदार पावसामुळे पाण्याची पातळी वाढत चालली होती, तो परिसर जलमय होऊ लागला होता. ही गोष्ट लक्षात येताच घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी दाखल झालो आणि सर्व गणेशमूर्ती सुरक्षित स्थळी हलवल्या. त्यावेळी आम्ही सर्व हिंदू-मुस्लीम बांधव एकत्रच कार्यरत होतो. हीच आमच्या ग्रुपची खासियत आहे.”
जय पुढे म्हणतात, “आमचं कराड शहर कधीच्या जातीपातीच्या राजकारणाला बळी पडत नाही. आम्ही सर्व सलोख्याच्या वाटेवर चालणारे आहोत. आमच्या इथे उच्चनीचतेला थारा नाही. म्हणूनच आमच्या फाऊंडेशनला कुणी अध्यक्ष नाही. सर्वधर्मीय कार्यकर्ते हेच संघटनेचे प्रमुख आहेत.”
गणेश मूर्तींसाठी आपले गोडाऊन रिकामे करून देणारे मोहसिन कागदी सांगतात, “त्यादिवशी कुंभार समाजातील आमच्या मित्रांचे मदतीसाठी कॉल आले. जवळपास ३०० गणेशमूर्ती त्याठिकाणी होत्या. गणेश मूर्ती हलवून त्या सुरक्षित ठिकाणी कुठे ठेवायच्या हा पेच निर्माण झाला होता. त्याठिकाणीच जवळपास माझे दुकान होते म्हणूनच क्षणाचाही विलंब न करता मी दुकान मोकळे करून दिले आणि शेकडो गणेशमूर्ती तिथे ठेवल्या.”
ते पुढे म्हणतात की, “आमचे ब्रदर्स फाऊंडेशन नेहमीच धार्मिक सद्भावनेसाठी अग्रेसर असते. आम्ही कायमच समाजसेवेसाठी पुढे असतो. आम्ही जातपात मनात नाही, सगळे एकत्रितच सत्कर्म करतो. त्यामुळे हे कार्य करून आम्ही काही विशेष केले असे मला वाटत नाही. यापुढेहीआम्हाला असे काही कार्य करायला मिळाले तर ते आम्ही सन्मानाने करू.”
या घटनेविषयी हळहळ व्यक्त करताना मोहसिन म्हणतात, “यापुढे असा प्रसंग कधी येऊ नये एवढेच मला वाटते. यात कुंभार समाजचे जेवढे काही नुकसान झाले आहे, त्यासाठी शासनाने योग्य ती मदत द्यावी. कारण त्यादिवशी त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले होते. धोधो पावसात त्यांना भाड्याने ट्रक्टर, क्रेन आणावे लागले. त्यामध्ये त्यांचा भरपूर पैसा गेला. आम्ही सर्व मित्र मंडळींनी त्यांना वाहनांची व्यवस्था सुद्धा करून दिली. त्यामुळे त्यांना जरा दिलासा मिळाला.”
ब्रदर्स फाऊंडेशन या संघटनेचे मुस्लीम कार्यकर्ते समीर पटवेकर म्हणले की, “कोयनेच्या किनारी असलेल्या कोटाखाली येथे कुंभार समाज अनेक वर्षांपासून गणेशमूर्ती घडवतो. गणेशोत्सवाच्या पाच-सहा महिने आधी त्यांचे सर्व काम सुरु होते. यंदाही त्यांच्या गणेशमूर्तींचे रंगकाम पूर्ण होऊन त्या विक्रीस तयार झाल्या होत्या. परंतु अचानक झालेल्या पावसाने मूर्तींसाठी धोका निर्माण झाला होता. यापूर्वीही अनेकदा मूर्ती वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये मूर्तिकारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. त्यांचे नुकसान होऊ नये आणि गणेशोत्सव आनंदात साजरा व्हावा या हेतून आम्ही सर्व कामाला लागलो. अशापद्धतीने सर्व गणेशमूर्ती सुखरूप ठेवल्या.”
खरंतर सण-उत्सव साजरे करण्याची मूळ संकल्पना ही समाजाला एकत्रित आणण्याची होती, परंतु आज हे स्वरूप बदलत चालले आहे. कराडच्या या घटनेने मात्र सण-उत्सवांचा खरा उद्देश पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. हा प्रसंग केवळ मूर्ती वाचवण्यापुरता मर्यादित नव्हता, तर या घटनेने साताऱ्यातील सामाजिक सलोखा आणखी घट्ट झाला. धार्मिक सीमा ओलांडून एकत्र आलेल्या या तरुणांनी गणेशोत्सवाच्या पवित्र भावनेला खऱ्या अर्थाने उजाळा दिला.