संकटग्रस्तांना हात, माणुसकीला साथ देत साताऱ्याच्या मुस्लिमांनी जिंकली मने

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्तांची मदत करताना हिंदू-मुस्लीम कार्यकर्ते
धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्तांची मदत करताना हिंदू-मुस्लीम कार्यकर्ते

 

देशभरात अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रातही अनेक भागांमध्येही पावसाने थैमान घातल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा संकटकाळात अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अशावेळी साताऱ्यातील 'जमियत उलमा-ए-हिंद' आणि 'खिदमत-ए-खल्क' या संस्था माणुसकीचा धर्म जपत धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेल्या आहेत. निसर्गाच्या कोपामुळे मराठवाड्यातील परंडा तालुक्यातील अनेक गावे उद्ध्वस्त झाली असताना सातारकर मुस्लिमांनी केलेल्या या कृतीतून खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडले आहे.

सीना आणि खैरी नद्यांना आलेल्या महापुराने परंडा तालुक्यात हाहाकार माजवला होता. अनेकांचे संसार डोळ्यादेखत वाहून गेले, घरे उद्ध्वस्त झाली आणि काबाडकष्टाने पिकवलेली शेती मातीमोल झाली. अशा परिस्थितीत पूरग्रस्त कॅम्पमध्ये अन्नधान्याविना आणि जीवनावश्यक वस्तूंशिवाय जगत होते, तेव्हा साताऱ्यातील या संस्थांनी आपल्या देशबांधवांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.

प्रेषितांवरील प्रेम कृतीतून व्यक्त
साताऱ्यातील जमियत उलमा-ए-हिंदचे अध्यक्ष हाफिज वसीम युसुफ शेख या मदतकार्याविषयी म्हणाले की, "संकटग्रस्त भुकेले, बेघर असताना त्यांना साथ आणि हात देणे हेच आमचे काम आहे. तुम्ही जमिनीवरील लोकांवर दया करा, म्हणजे आकाशातील देव तुमच्यावर दया करेल. जो स्वतः पोटभर जेवतो आणि त्याचा शेजारी उपाशी झोपतो, तो आमच्यापैकी नाही, अशी आमच्या धर्माची शिकवण आहे."

'एक हात माणुसकीचा'
'जमियत उलमा-ए-हिंद'चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मौलाना नदीम सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनाखाली 'एक हात माणुसकीचा' हा उपक्रम हाती घेतला. मौलाना रियाज, सादिक शेख, हाजी मोहसीन व मुबीन महाडवाले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू झाला. या उपक्रमांतर्गतच पूरग्रस्तांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी सातारकर थेट परंडा तालुक्यात दाखल झाले.

गावकऱ्यांना दिलासा
या उपक्रमांतर्गत सुरुवातीला कार्यकर्त्यांनी तब्बल ४५० कुटुंबांना मदत केली. संकटात सापडलेल्या या कुटुंबांना आधार देण्यासाठी त्यांनी लाडू, शेव, फरसाण यांसारखे तयार खाद्यपदार्थ दिले. तसेच साखर आणि चहापत्ती पाठवली. यासोबतच ६० रेशन किट, १००० किलो तांदूळ, महिला-पुरुष आणि मुलांसाठी कपडे, शालेय साहित्य, औषधांचे किट आणि इतर संसारोपयोगी वस्तूंचा समावेश असलेली सुमारे सव्वा लाख रुपयांची मदत त्यांनी थेट पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवली.

ते एवढ्यातच थांबले नाही, तर काही दुर्लक्षित गावांना देखील त्यांनी दत्तक घेतले. त्यानंतर चिंचपूर बुद्रुक, शेळगाव आणि मुंगशी या गावांमध्ये मदत पोहोचवली. तिथेही तब्बल २०० कुटुंबांना रेशन किट आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील आवटी येथील पूरग्रस्तांनाही मदत मिळाली. आजपर्यंत सातारा जिल्ह्यातून एकूण १००० कुटुंबांपर्यंत ही मदत पोहोचली आहे.

स्थानिक कार्याक्रत्यांच्या सोबतीने मदतकार्य यशस्वी
या मदतकार्यात गरजूंची अचूक निवड करणे महत्त्वाचे होते. हे काम स्थानिक पातळीवर यशस्वीपणे पार पडले. 'जमियत'चे परंडा अध्यक्ष मुर्तुझा पठाण, पत्रकार नुरजहाँ शेख, इरफान शेख, समीर पठाण आणि त्यांच्या कमिटीने हे कार्य केले. त्यांनी स्थानिक प्रशासन आणि पडताळणीद्वारे गरजूंची यादी बनवली.

चिंचपूर येथे शिवाजी शिंदे, रिजवान शेख, जानकीराम गायकवाड, जावेद शेख आणि सुभाष सुतार यांसारख्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने गरजूंपर्यंत किट पोहोचवण्यात आले. ज्या पूरग्रस्तांचे संपूर्ण संसार वाहून गेले होते, अशा कुटुंबांना कॅम्पमध्ये जाऊन भांडी, कपडे आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

या मदतकार्यात परंडाचे माजी नगरसेवक इरफान शेख, हाजी समीर पठाण, साताऱ्याहून आलेले सादिक शेख, मुफ्ती उबेदुल्लाह, मुफ्ती मोहसीन-अली बागवान, अझहर मणियार, हाफिज शाकीर, मोहसीन कोरबू, रझिया शेख, मौलाना अब्दुल अलीम, इस्माईल पठाण, मुजफ्फर सय्यद आणि यासिन शेख यांसारख्या अनेक कार्यकर्त्यांनी जातीने हजेरी लावली. तसेच 'सैफुल्लाह ग्रुप' आणि मी 'मुस्लिम मावळा छत्रपतींचा' या संघटनांच्या स्वयंसेवकांनीही या कार्यात मोलाचा वाटा उचलला.

गावकऱ्यांना ही अनपेक्षित मदत मिळाल्यानंतर त्यांनी साताऱ्याच्या मुस्लिम बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिलास्याचा भाव स्पष्ट दिसत होता. 'जमियत-ए-उलेमा-ए-हिंद'च्या या कार्यामुळे समाजासमोर एकतेचा आणि सामाजिक सलोख्याचा महत्त्वाचा संदेश पोहोचला आहे.

संकटकाळात एकमेकांना सावरण्यासाठी पुढे येणारे हातच समाजाला जिवंत ठेवतात. साताऱ्यातील या संस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी धर्म, जात, प्रांत या सगळ्याच्या पलीकडे जाऊन केवळ 'माणुसकी' हाच धर्म मानला. त्यांनी पूरग्रस्तांच्या ताटात केवळ अन्नच नाही, तर त्यांच्या मनात आशेचा आणि विश्वासाचा किरण निर्माण केला आहे. सण कोणताही असो परंतु आपल्या देशबांधवाच्या दुःखात सहभागी होऊन त्याला मदत करणे, हाच खरा धर्म हे सातारकर मुस्लिमांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter