धर्माच्या नावावर लोकांची हत्या अमान्य - ए.आर. रहमान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 39 m ago
संगीतकार ए.आर. रहमान
संगीतकार ए.आर. रहमान

 

ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांनी नेहमीच त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाविषयी आणि सुफीवाद स्वीकारण्याच्या निर्णयावर मोकळेपणाने भाष्य केले आहे. नुकत्याच झालेल्या एका संवादात, या संगीत दिग्गजाने धर्म, संगीताची भूमिका आणि सुफी मार्गाकडे आकर्षित होण्यामागील कारणांवर आपले विचार मांडले.

'मी सर्व धर्मांचा चाहता आहे, पण…'

श्रद्धेबद्दलच्या दृष्टिकोनावर विचारले असता, रहमान म्हणाले की त्यांनी विविध धर्मांमधील शिकवण अभ्यासली आहे. निखिल कामत यांच्या पॉडकास्टवर ते म्हणाले, "मी सर्व धर्मांचा चाहता आहे, आणि मी इस्लाम, हिंदू आणि ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला आहे. माझी एकच अडचण आहे, ती म्हणजे धर्माच्या नावावर लोकांची हत्या करणे किंवा त्यांना इजा पोहोचवणे मला मान्य नाही."

रहमान यांनी सांगितले की, मंचावर सादरीकरण करणे अनेकदा एका पवित्र स्थळात प्रवेश करण्यासारखे वाटते. तिथे विविध संस्कृती आणि श्रद्धांचे लोक एकत्र येतात. ते म्हणतात, "मला मनोरंजन करायला आवडते, आणि मी सादरीकरण करतो तेव्हा मला वाटते की ते एक पवित्र स्थान आहे. आपण सर्वजण एकतेच्या फळांचा आनंद घेत असतो. वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक तिथे एकत्र येतात."

ए.आर. रहमान यांनी सुफीवाद का स्वीकारला?

सुफीवादाचा अर्थ स्पष्ट करताना रहमान यांनी सांगितले की, ही अहंकार आणि नकारात्मक मानवी प्रवृत्ती सोडून देण्याची एक प्रक्रिया आहे. "सुफीवाद म्हणजे मरण्यापूर्वी मरणे. असे काही पडदे आहेत, ते तुम्हाला आत्मपरीक्षण करायला लावतात. ते पडदे दूर करण्यासाठी तुम्हाला स्वतःला नष्ट करावे लागते... वासना, लोभ, मत्सर किंवा दुसऱ्यांबद्दल मत बनवणे, या सर्वांचा अंत व्हायला हवा. तुमचा अहंकार संपतो आणि मगच तुम्ही देवासारखे पारदर्शक बनता."

त्यांनी पुढे सांगितले की, धार्मिक पार्श्वभूमी कोणतीही असो, श्रद्धेतील प्रामाणिकपणा सर्वात महत्त्वाचा असतो. "श्रद्धेमधील समानता मला आवडते. आपण वेगवेगळे धर्म पाळत असू, पण श्रद्धेचा प्रामाणिकपणा मोजला जातो. तोच आपल्याला चांगल्या गोष्टी करायला लावतो. त्यामुळे मानवतेचा फायदा होतो. आपण सर्वांनी आध्यात्मिकदृष्ट्या श्रीमंत असायला हवे, कारण जेव्हा आध्यात्मिक समृद्धी येते, तेव्हा भौतिक समृद्धी आपोआप येते."

सुफीवादावरील त्यांचे पूर्वीचे विचार

रहमान यांनी यापूर्वीही सुफीवादाने त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला कसा आकार दिला, यावर भाष्य केले आहे. 'ए.आर. रहमान: द स्पिरिट ऑफ म्युझिक'मध्ये त्यांनी सांगितले की, ही विचारसरणी त्यांच्या आणि त्यांच्या आईच्या मनात खोलवर रुजली होती. त्यांनी लिहिले की, ही निवड कोणत्याही दबावाखाली न येता नैसर्गिकरित्या झाली. १९८७ मधील एका संक्रमणाच्या काळात एका विशिष्ट आध्यात्मिक दिशेचा शोध तीव्र झाल्याची आठवण त्यांनी सांगितली. सुफी मार्ग स्वीकारल्याने त्यांना आणि त्यांच्या आईला उभारी मिळाली. संगीतकार म्हणून असलेल्या त्यांच्या ओळखीमुळे त्यांना कोणत्याही विरोधाशिवाय हा मार्ग अनुसरण्यासाठी सामाजिक अवकाश मिळाला.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter