"बदलत्या जगात एकजूट गरजेची"; अजित डोवाल यांचा शेजारी देशांना संदेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल

 

"वेगाने बदलणारे आणि आव्हानात्मक जागतिक सुरक्षा वातावरण" पाहता प्रादेशिक भागीदारी मजबूत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी गुरुवारी (२० नोव्हेंबर) केले. नवी दिल्लीत आयोजित 'कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह'च्या (CSC) ७ व्या NSA-स्तरीय बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

या बैठकीला सदस्य देश म्हणून मालदीव, मॉरिशस, श्रीलंका आणि बांगलादेशचे प्रतिनिधी उपस्थित होते. तर, सेशेल्स 'निरीक्षक' म्हणून आणि मलेशिया 'पाहुणे' म्हणून सहभागी झाले होते.

डोवाल यांनी जोर दिला की, २०२० मध्ये स्थापन झालेली ही परिषद आता एक अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ बनली आहे. ते म्हणाले, "हिंद महासागर क्षेत्रातील देशांमधील प्रादेशिक भागीदारी मजबूत करण्याचे वाढते महत्त्व ओळखून, आम्ही सुरक्षेच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहकार्य वाढवण्यासाठी एकत्र आलो आहोत."

हिंद महासागराचे वर्णन त्यांनी या क्षेत्राचा "सर्वात मोठा सामायिक वारसा" असे केले. त्याची स्थिरता, सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

डोवाल यांनी सागरी सुरक्षेपासून ते उदयोन्मुख सायबर धोक्यांपर्यंतच्या आव्हानांकडे लक्ष वेधले. त्यांनी सदस्य देशांना आपली क्षमता एकत्र आणण्याचे आणि अधिक जवळून समन्वय साधण्याचे आवाहन केले. "आपल्या सामायिक सागरी वारशाचे जतन आणि वापर करण्यासाठी आपल्याला एकत्र काम करणे आवश्यक आहे," असे म्हणत त्यांनी या गटातील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी भारताची वचनबद्धता व्यक्त केली.

पाच प्रमुख मुद्द्यांवर झाली चर्चा

या बैठकीत CSC च्या पाच प्रमुख आधारस्तंभांवर (key pillars) झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला:

१. सागरी सुरक्षा आणि सुरक्षितता (Maritime Safety and Security)

२. दहशतवाद आणि कट्टरतावादाचा मुकाबला (Counter-terrorism and De-radicalisation)

३. आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारीचा बिमोड (Combating Transnational Organised Crime)

४. सायबर सुरक्षा आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचे संरक्षण (Cyber Security)

५. मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (Humanitarian Assistance)

या बैठकीत २०२६ सालासाठीचा 'रोडमॅप आणि ॲक्शन प्लॅन' निश्चित केला जाण्याची अपेक्षा आहे.

बांगलादेशचा पाठिंबा

बांगलादेशचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डॉ. खलील-उर-रहमान यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच नुकत्याच झालेल्या दिल्ली बॉम्बस्फोटाचा निषेध करून केली. त्यांनी पीडितांप्रती संवेदना व्यक्त केल्या आणि "स्थिर, शांततापूर्ण, सुरक्षित आणि समृद्ध" हिंद महासागरासाठी ढाक्याची (बांगलादेशची) वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली. उदयोन्मुख सुरक्षा आव्हानांच्या गुंतागुंतीतून मार्ग काढण्यासाठी CSC सारख्या सामूहिक यंत्रणेची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.