बनू मुश्ताक यांच्या ‘हार्ट लॅम्प’ ला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 Months ago
आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२५ : कर्नाटकच्या बानू मुश्ताक यांना 'हार्ट लॅम्प' साठी मिळाला जागतिक सन्मान
आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२५ : कर्नाटकच्या बानू मुश्ताक यांना 'हार्ट लॅम्प' साठी मिळाला जागतिक सन्मान

 

काल लंडनच्या टेट मॉडर्न येथे झालेल्या भव्य समारंभात कन्नड लेखिका बनू मुश्ताक यांच्या ‘हार्ट लॅम्प’ या लघुकथा संग्रहाला प्रतिष्ठित इंटरनॅशनल बुकर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार त्यांनी अनुवादक दीपा भास्थी यांच्यासह स्वीकारला.  कन्नड भाषेतील कृतीला पहिल्यांदाच हा सन्मान मिळाला आहे. ‘हार्ट लॅम्प’ या लघुकथासंग्रहाला मिळालेला पहिलाच आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे. भारतासाठी हा दुसरा बुकर सन्मान असून २०२२ मध्ये गीतांजली श्री यांच्या ‘टॉम्ब ऑफ सँड’ या हिंदी कादंबरीला हा पुरस्कार मिळाला होता.
 

‘हार्ट लॅम्प’ मधील १२ लघुकथा १९९० ते २०२३ या तीन दशकांत बनू मुश्ताक यांनी लिहिल्या आहेत. या कथा दक्षिण भारतातील पितृसत्ताक समाजात जगणाऱ्या मुस्लिम महिलांच्या जीवनावर प्रकाश टाकतात. या कथा केवळ दुःख किंवा शोषणापुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या प्रतिरोध, बुद्धिमत्ता, बंधुभाव आणि धैर्याची गोष्ट सांगतात. आई , आजी, मुली आणि पत्नी यांच्या दैनंदिन जीवनातील संघर्ष आणि त्यांचे आत्मबल यांचे रंगीत चित्रण या कथांमधून दिसते. कन्नडमधील ‘बंदाया’ (बंडखोर) साहित्य परंपरेतून आलेल्या बनू मुश्ताक यांनी या कथांमधून लिंग, जात, धर्म आणि सत्तेच्या संरचनांवर प्रहार केले आहेत.

७७ वर्षीय बनू मुश्ताक या लेखिका, वकील आणि महिला हक्कांच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांनी कर्नाटकमध्ये आपले जीवन आणि कार्य केंद्रित केले आहे. त्यांना या कथा लिहाण्याची प्रेरणा मिळाली ती त्यांच्या वकिलीच्या कामातून. त्यांच्याकडे मदतीसाठी येणाऱ्या महिलांच्या अनुभवांनी त्यांच्या लेखनाला आकार दिला. “या कथा माझ्या समुदायातील महिलांच्या दुःखातून आणि त्यांच्या धैर्याने जन्मल्या आहेत,” असे त्या म्हणतात. त्यांनी सामाजिक आणि धार्मिक भेदभावाविरुद्ध लढा दिला असून पितृसत्तेला आव्हान दिले आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी परंपरांना झुगारून स्वतःच्या पसंतीने विवाह केला.

‘हार्ट लॅम्प’चे इंग्रजी अनुवादक दीपा भास्थी यांनी या कथांना जागतिक व्यासपीठावर आणले. कोडगू येथील लेखिका आणि अनुवादक दीपा भास्थी यांनी कन्नड, उर्दू आणि अरबी शब्दांचा मूळ भाव टिकवून या कथांचा अनुवाद केला आहे.  “हा केवळ अनुवाद नव्हता, तर कन्नड भाषेच्या लयीतून इंग्रजीत नवे रंग भरण्याचा प्रयत्न होता,” असे दीपा म्हणाल्या. त्यांनी उर्दू संगीत आणि साहित्याचा अभ्यास करून या कथांचा सांस्कृतिक आत्मा जपला आहे. त्यांच्या या कामाला निर्णायक मंडळाने रॅडिकल ट्रान्सलेशन असे संबोधले. बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या  दीपा या पहिल्या भारतीय अनुवादक ठरल्या आहेत. 

हा पुरस्कार देणाऱ्या निर्णायक मंडळाचे अध्यक्ष मॅक्स पोर्टर यांनी ‘हार्ट लॅम्प’ला  इंग्रजी वाचकांसाठी काहीतरी नवीन कथा मिळाली असे वर्णन केले. “या कथा जिवंत, बोलक्या आणि प्रभावी आहेत. त्या जाती, धर्म आणि लिंगाच्या सीमा ओलांडून समाजातील खरे सत्य मांडतात,” असे त्यांनी सांगितले. हार्ट लॅम्पने  सहा जागतिक कथांना मागे टाकून हा पुरस्कार पटकावला.

प्रामुख्याने कर्नाटकात कन्नड भाषा सुमारे ६.५ कोटी लोक बोलतात. या भाषेतील साहित्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळणे दुर्मीळ आहे. बनू मुश्ताक यांच्या आधी यू. आर. अनंतमूर्ती यांच्या कन्नड कादंबरीला २०१३ मध्ये बुकरसाठी नामांकन मिळाले होते पण पुरस्कार मिळाला नव्हता.  ‘हार्ट लॅम्प’ने ही कमतरता भरून काढली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याला “कन्नड भाषा आणि संस्कृतीसाठी अभिमानाचा क्षण” म्हटले.

या कथांमधील मौखिक कथाकथनाची परंपरा आणि बहुभाषिकता हा त्यांचा खास पैलू आहे. पात्रांच्या संवादात उर्दू आणि अरबी शब्द जपले गेले आहेत. यामुळे दक्षिण भारतातील सांस्कृतिक वैविध्य जिवंत राहिले आहे. या कथा केवळ शोषण दाखवत नाहीत, तर महिलांचा प्रतिकार, त्यांची बुद्धिमत्ता आणि एकमेकींसाठीचा आधार यांचे चित्रण करतात. उदाहरणार्थ, ‘हाय-हिल्ड शू’ कथेत नसीमा आपल्या स्वार्थासाठी त्रास देते, पण यातूनही पितृसत्तेच्या जटिलतेचे दर्शन घडते.

‘हार्ट लॅम्प’मधील कथा सामाजिक दस्तऐवजासारख्या आहेत. त्या धर्म, जाती आणि लिंगाच्या प्रश्नांना हात घालतात. बनू यांनी ‘बंदाया’ साहित्य परंपरेला नवे परिमाण दिले आहेत.  त्यांनी मुस्लिम महिलांच्या अनुभवांना केंद्रस्थानी आणले. महिला एकमेकींविरुद्ध लढतात, पण त्याचवेळी आपल्या मुलींसाठी स्वातंत्र्य आणि शिक्षणाची स्वप्ने पाहतात, हे या कथांच्या माध्यमातून दिसते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter