'धार्मिक स्वातंत्र्याला भारताचा नेहमीच पाठिंबा'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 16 h ago
दलाई लामा
दलाई लामा

 

तिबेटी बौद्धधर्मीयांसाठी सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांनी भावी दलाई लामांच्या निवडीसाठी गादेन फोडरांग ट्रस्टला दिलेले सर्वाधिकार आणि चीनने त्यावर घेतलेला आक्षेप यापार्श्वभूमीवर भारत सरकारने या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करताना श्रद्धा व धार्मिक प्रथांबाबत काहीही बोलणार नाही असे म्हटले आहे. सोबतच, भारतातील सर्व धार्मिक स्वातंत्र्याचे सरकार समर्थन करेल, असेही म्हटले आहे. भावी दलाई लामांच्या निवडीसाठी विद्यमान दलाई लामा यांनी जारी केलेल्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सरकारची भूमिका मांडली.

निवेदनात म्हटले आहे, सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार श्रद्धा आणि धर्माच्या प्रथांबद्दल कोणतीही भूमिका घेत नाही किंवा बोलत नाही. सरकारने मा नेहमीच भारतातील सर्व धार्मिक स्वातंत्र्याचे समर्थन केले आहे आणि ते करत राहील, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, तिबेटी बौद्ध धर्मियांच्या प्रथेप्रमाणे भावी दलाई लामांची निवड करण्यासंदर्भात धर्मगुरू दलाई लामा यांनी दोन जुलैला निवेदन जारी केले होते. त्यात भावी दलाई लामांना कोणत्या प्रक्रियेद्वारे मान्यता द्यावी यासाठी २४ सप्टेंबर २०११ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनाचा दाखला देण्यात आला होता. 

या निवडीची जबाबदारी केवळ गादेन फोडरांग ट्रस्टची असेल. त्यांनी तिबेटी बौद्ध परंपरांच्या विविध प्रमुखांशी आणि दलाई लामांच्या वंशाशी अविभाज्यपणे जोडलेले विश्वसनीय शपथ घेतलेल्या धर्म रक्षकांशी सल्लामसलत करावी. त्यानुसार त्यांनी भूतकाळातील परंपरेनुसार शोध आणि ओळखीची प्रक्रिया पार पाडावी, असे म्हटले. तसेच भविष्यातील पुनर्जन्माला मान्यता देण्याचा एकमेव अधिकार गादेन फोडरंग ट्रस्टला आहे; या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा असा कोणताही अधिकार इतर कोणालाही नाही, असेही बजावले आहे. मात्र, चीनने यावर थयथयाट केला असून ही प्रक्रिया नाकारताना भावी नियुक्तीला आपली मान्यता आवश्यक असेल असा इशारा दिला आहे.

'उत्तराधिकारी दलाई लामांनीच ठरवावा'
"उत्तराधिकारी कोण असावा याचा निर्णय दलाई लामा यांनीच घ्यावा, ही त्यांच्या अनुयायांची आणि साधकांची इच्छा आहे," या भूमिकेचा पुनरुच्चार संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी आज केला. तसेच चीनच्या भूमिकेबद्दल बोलण्यास नकार देताना रिजिजू यांनी आपले मत हे बौद्ध धर्माचा अनुयायी, साधक या नात्याने आहे, असेही स्पष्ट केले.

हज यात्रेच्या तयारी संदर्भात झालेल्या अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना रिजिजू यांनी सांगितले, की दलाई लामांसंदर्भातील मुद्दयावर आपण गोंधळात राहण्याची गरज नाही. संपूर्ण जगातील बौद्ध धर्मियांची, दलाई लामांना मानणाऱ्यांची इच्छा आहे की पुढील दलाई लामा कोण असतील हे तेच ठरवतील. चीनने यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर आपल्याला प्रतिक्रिया द्यायची नाही. एक अनुयायी, साधक या नात्याने बोलतो आहे. चीनी सरकारच्या वक्तव्यावर काहीही बोलायचे नाही.

सावधगिरीने विधाने करावीत : चीन
बीजिंग: आपला उत्तराधिकारी दलाई लामा हेच ठरवतील, या केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांच्या विधानाला चीनने आक्षेप घेतला आहे. तिबेटसंबंधी मुक्ष्यांबाबत बोलताना भारताने सावधगिरी बाळगावी आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या प्रक्रियेवर त्याचा परिणाम होऊ देऊ नये, असे आवाहन चीनने केले आहे. "१४ व्या दलाई लामांचे चीनविरोधी धोरण भारताने ध्यानात घ्यावे आणि शिझंग (तिबेट) प्रांताबाबत चीनला दिलेले आश्वासन स्मरणात ठेवावे", असे आवाहन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी केले आहे. दलाई लामांच्या निवडीची पारंपरिक प्रक्रिया असून त्या निवडीला चीन सरकारची मान्यता घ्यावी लागते आणि सध्याच्या दलाई लामांनाही तत्कालीन सरकारने परवानगी दिली होती, असेही माओ निंग यांनी निदर्शनास आणून दिले.