मुस्लिमबहुल मालेगावात निघाली तिरंगा रॅली

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 3 h ago
मालेगाव तिरंगा रॅलीचे आयोजक  AIMIM चे आमदार मुफ्ती इस्माईल
मालेगाव तिरंगा रॅलीचे आयोजक AIMIM चे आमदार मुफ्ती इस्माईल

 

दहशतवाद्यांनी पहलगाम येथे हल्ला करून २६ भारतीय पर्यटकांना ठार केले. या घटनेचा येथे तीव्र निषेध करण्यात आला. भारतीय सैन्य दलाने 'ऑपरेशन सिंदुर'च्या माध्यमातून दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय जवानांचा जयजयकार करीत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 'एमआयएम'चे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली.

मालेगावातील मुशावरत चौकापासून तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीत शेकडो तरुण भारताचा तिरंगा झेंडा घेत सहभागी झाले. नागरीकांनी पाकिस्तान मुर्दाबाद, सोफिया कुरेशी, व्योमिका सिंग झिंदाबाद यासह अनेक घोषणा दिल्या. भारत झिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. पाकिस्तानला कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंग याच भारी आहेत. महिलांसह सैन्य दलाने पाकिस्तानला धूळ चारली असून युद्धात भारताचाच विजय होणार असल्याची भावना मौलाना मुफ्ती यांनी व्यक्त केली.  
 

आम्ही लष्करासोबतच…
मौलाना मुफ्ती म्हणाले, की ही रॅली भारतीय सेनेचे मनोबल वाढविणारी आहे. भारतीय सेनेने पाकिस्तानला त्याची जागा दाखवावी. भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हल्ल्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. पाकिस्तानवर अशीच कडक कारवाई करून दहशतवाद्यांचा नायनाट करावा. मालेगाव शहरातून १९२२ मध्ये ब्रिटीशापासून भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी एक फौज तयार करण्यात आली होती. त्या फौजचे आझाद हिंद या देशाचे सच्चे व प्रेम करणारे नागरीक आहेत. भारत हा पाकिस्तानची दहशतवाद सहन करणार नाही. भारतीय सेनेचे मनोबल वाढविण्यासाठी देशातील प्रत्येक मुसलमान भारतीय सेनेसोबत आहे.

 

पाकिस्तान वेगळा झाला त्यावेळी आमच्या पूर्वजांनी भारतात राहणे पसंत केले, जमेतुल उलेमा हिंदने पाकिस्तान ज्यावेळी वेगळा झाला त्याचा निषेध केला होता. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी दिल्ली येथील जामे मशिदवरुन भारतातील मुसलमानांना येथेच राहण्याचा सल्ला दिला होता. स्वातंत्र्यावेळी येथील मुसलमानांनी भारतातच राहणे पसंत केले. येथील मुसलमान हा देशासोबत एकनिष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले. रॅलीत युसूफ इलियास, शफीक राना, समीर अहमद, अलीम फलाही, खालिद सिकंदर, जमाल नासीर, एतेशाम बेकरीवाला आदींसह बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते. 

- जलील शेख, मालेगाव 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter