करबला : इस्लामच्या इतिहासाला कलाटणी देणारी दुर्दैवी घटना

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 16 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

करबलाची शोकांतिका इस्लामी इतिहासातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. ही केवळ लढाई नव्हती, तर न्याय, सत्य आणि योग्य नेतृत्वासाठीचा नैतिक संघर्षही होता. ६१ हिजरीच्या १० मुहर्रमला (इसवी सन ६८०), आजच्या इराकमधील करबलाच्या वाळवंटात पैगंबर मुहम्मद यांचे नातू इमाम हुसेन आणि त्यांच्या ७० हून अधिक सहकाऱ्यांना यझीदच्या सैन्याने शहीद केले. हा संघर्ष वैयक्तिक किंवा कौटुंबिक वैमनस्याचा नव्हता, तर इस्लामी नेतृत्व लोकसल्ल्यावर आणि न्यायावर आधारित असावे की राजेशाही आणि हुकूमशाहीवर असावे याच्या निकालाचा होता.  

करबलाचा शोकांतिकेचा ऐतिहासिक संदर्भ  
करबलाची शोकांतिका समजून घेण्यासाठी त्याची पार्श्वभूमी समजणे आवश्यक आहे. तिसरे खलिफा उस्मान इब्न अफ्फान यांच्या काळात त्यांच्यावर बनू उमय्या जमातीला सरकारी पदे देऊन पक्षपात केल्याचा आरोप झाला. यामुळे व्यापक असंतोष निर्माण झाला आणि इसवी सन ६५६ मध्ये संतप्त बंडखोरांनी त्यांची हत्या केली. त्यानंतर हजरत अली यांची चौथे खलिफा म्हणून निवड झाली. परंतु बनू उमय्या जमातीतून येणारा सिरियाचा गव्हर्नर मुआविया याने अलींचे नेतृत्व स्वीकारण्यास नकार दिला. त्याने उस्मानच्या हत्येचा बदला घेण्याची मागणी केली. यातून जमाल आणि सिफ्फिनसारख्या मोठ्या लढाया झाल्या.  ज्या पहिले गृहयुद्ध (अल-फित्ना अल-कुब्रा) म्हणून ओळखल्या गेल्या.  

अखेरीस, मुआवियाने राजकीय सत्ता मिळवली आणि अलींचा मुलगा हसन यांच्याशी शांतता करार केला. या करारात मुआवियाने आपला उत्तराधिकारी नेमणार नाही, असे वचन दिले. परंतु त्याने हा करार मोडला आणि आपला मुलगा यझीद याला पुढील खलिफा म्हणून नेमले. इस्लामी परंपरेनुसार लोकसल्ल्याने (शूरा)  नेता निवडण्याच्या विरोधात जाणारी ही कृती होती. यझीद सत्तेवर आल्यानंतर त्याने इमाम हुसेन यांच्याकडून निष्ठेची शपथ (बयत) मागितली. परंतु हुसेन यांनी यझीदला भ्रष्ट आणि अयोग्य मानून ही शपथ नाकारली. कुफा (इराक) येथील लोकांनी हुसेन यांना नेतृत्व करण्याचे पत्र पाठवले. कुटुंबासह कुफ्याकडे निघालेल्या हुसेन यांना यझीदच्या सैन्याने करबलात अडवले. त्यांना पाणी नाकारले गेले  आणि १० मुहर्रमला त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शहीद करण्यात आले.  

करबलाच्या शोकांतिकेचा प्रभाव  
या हत्याकांडानंतर यझीदच्या सैन्याने हुसेन यांच्या कुटुंबाला कैद केले आणि त्यांचा अपमान केला. यझीदला आपली सत्तेचे नाणे खनकवायचे होते, मात्र यामुळे हुसेन यांच्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूती वाढली. मक्केतील अब्दुल्ला इब्न झुबैर यांनी यझीदच्या सत्तेला नकार देत स्वतःचे नेतृत्व जाहीर केले. करबलानंतर मक्का, मदिना आणि मुस्लिम जगातील इतर भागांत यझीदविरुद्ध बंडखोरी वाढली. हा काळ (इसवी सन ६८३–६९२) दुसरे गृहयुद्ध (दुसरी फित्ना) म्हणून ओळखला गेला. उमय्या राजवटनी नंतर पुन्हा सत्ता मिळवली आणि काही दशके राज्य केले, पण त्यांचे नैतिक बळ मोठ्या प्रमाणात खचले.  

उमय्या राजवटीचे पुनरुज्जन आणि सुधारणा  
उमय्यांनी आपली सत्ता मरवानीद शाखेद्वारे पुन्हा संघटित केली. अब्दुल मलिक इब्न मरवान आणि उमर इब्न अब्दुल अझीझ यासारख्या खलिफांनी नाणी, टपाल व्यवस्था आणि प्रशासकीय केंद्रीकरण यासारख्या सुधारणा आणल्या. पण या सुधारणांनंतरही अरबेतर मुस्लिमांना दुय्यम नागरिकांप्रमाणे वागणूक मिळत राहिली. त्यामुळे खोरासान आणि इराकसारख्या भागांत लोकांचा असंतोष वाढत गेला. लोकांना वाटू लागले की उमय्या केवळ आपल्या जमातीचा विचार करतात आणि न्याय, समानता या मानवी मूल्यांकडे दुर्लक्ष करतात.  

अब्बासी चळवळ आणि करबलाचा संदेश  
हाच असंतोष अब्बासी चळवळीच्या उदयाला कारणीभूत ठरला. अब्बासांनी पैगंबरांचे काका अब्बास यांचे वंशज असल्याचा दावा केला. खोरासानमध्ये अबू मुस्लिम नावाच्या क्रांतिकारी नेत्याच्या प्रयत्नांनी त्यांना संघटित केले. त्यांची भूमिका करबलाच्या शोकांतिकेभोवती केंद्रित होता. त्यांनी इमाम हुसेन यांच्या रक्ताचा बदला घेऊन खऱ्या इस्लामी राजवटीची पुनर्स्थापना करण्याचे वचन दिले. त्यांचा नारा—“अल-रिदा मिन आल-ए-मुहम्मद” (मुहम्मद यांच्या कुटुंबातून निवडलेला)—लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाला. त्यांनी आपली मोहीम करबलाच्या अन्यायाच्या वेदनेशी जोडली.  

करबलाच्या शोकांतिकेने मुस्लिम समाजाच्या विवेकाला धक्का दिला आणि संपूर्ण उमय्या व्यवस्थेचा हळूहळू पतनाला सुरुवात झाली. उमय्यांनी त्यांच्या सत्तेला वैध ठरवणारी स्पष्ट धार्मिक व्यवस्था (थियॉलॉजी) कधीच उभारली नव्हती, त्यामुळे अब्बासांनी करबलाला उमय्यांच्या अत्याचाराचा पुरावा म्हणून सादर करणारी आक्रमक, राज्य-प्रायोजित प्रचार मोहीम सुरू केली तेव्हा उमय्या निरुत्तर झाले. 

या आरोपातून सुटका मिळवण्यासाठी उमय्या प्रवक्त्यांनी दावा केला, “करबलात जे घडले ते ईश्वराचा आदेश होता.” यावर प्रसिद्ध विद्वान हसन अल-बसरी यांनी उत्तर दिले की, ईश्वर कधीही हिंसा किंवा अन्यायाची आज्ञा देत नाही—तो केवळ चांगुलपणाची आज्ञा देतो—आणि माणसाचे वाईट कृत्याची निवड माणसाची स्वतःची निवड आहे. 

या उत्तराने एक मूलभूत सत्य अधोरेखित केले: माणसाला बरोबर आणि चूक निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, आणि शासकांना त्यांच्या कृतींसाठी जबाबदार राहावे लागते. करबलाने उमय्यांची नैतिक वैधता काढून घेतली, त्यांच्या सत्तेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रत्येक आवाजाला बळ दिले आणि अब्बासांना उमय्या राजवंश पूर्णपणे संपवण्याचा मार्ग खुला केला.  

अब्बासी विजय आणि बदल  
इसवी सन ७५० मध्ये अब्बासांनी झाब नदीच्या लढाईत शेवटच्या उमय्या खलिफाला पराभूत केले. खलिफतीची राजधानी दमास्कस (सिरिया) येथून बगदाद (इराक) येथे हलवली गेली. सुरुवातीच्या काळात अब्बासी शासक अधिक समावेशी होते. त्यांनी गैर-अरब मुस्लिमांना अधिक हक्क दिले, विद्वानांना पाठबळ दिले आणि स्वतःला पैगंबरांच्या कुटुंबाचे रक्षक म्हणून सादर केले. 

मुहर्रममध्ये त्यांनी करबलाच्या स्मरणार्थ सार्वजनिक शोकसभांचे (मजलिस), कविता आणि स्मरण कार्यक्रमांना समर्थन दिले. पण कालांतराने अब्बासीही राजेशाही प्रवृत्तीचे बनले. बंडखोरीची भीती वाटल्यावर त्यांनीही शिया विधींवर निर्बंध लादले. सत्ता बदलली तरी विरोधी विचारांना दडपण्याची इच्छा कायम राहते, हेच यातून दिसते.  

शिया विचारधारा आणि खलिफतीची व्याख्या  
शिया विचारसरणीत खलिफतीचा केंद्रबिंदू नेहमी हजरत अली यांचे कुटुंब, विशेषतः इमाम हुसेन यांचा वंश, राहिला आहे. सुरुवातीपासून शिया मुस्लिमांचा विश्वास होता की खरे नेतृत्व केवळ अहल अल-बैत—पैगंबर मुहम्मद यांचे निकटवर्ती कुटुंब—यांच्याकडेच असावे. अहल अल-बैत म्हणजे ‘घरातील लोक’, म्हणजेच पैगंबरांचे जवळचे कुटुंबीय, ज्यामध्ये हजरत अली, बीबी फातिमा, इमाम हसन आणि इमाम हुसेन यांचा समावेश आहे. 

शियांनी त्यांना मुस्लिम समुदायाचे नेतृत्व करण्यासाठी सर्वात शुद्ध आणि आध्यात्मिकदृष्ट्या पात्र मानले. त्यांनी या विश्वासाला धार्मिक अर्थ दिला, असे म्हणत की अहल अल-बैत ईश्वराने निवडलेले आणि पापमुक्त (मासूम) आहेत असे म्हणत . अशा प्रकारे, शिया विचारसरणीतील खलिफतीची संकल्पना मर्यादित आणि विशेष होती, सर्व मुस्लिमांसाठी खुली नव्हती. त्यांनी उमय्यांनी खलिफतीला राजेशाही बनवल्याचा विरोध केला, पण त्यांनीही एका निश्चित वंशाला—फक्त वेगळ्या—समर्थन दिले. आजही अनेक शिया मानतात की इस्लाममधील नेतृत्व केवळ इमाम हुसेन यांच्या वंशजांमधूनच चालू राहावे. त्यांचा दावा पैगंबरांच्या कुटुंबावरील प्रेम आणि आदरावर आधारित आहे, परंतु यामुळे राजकीय सत्तेला पवित्र दर्जा देण्याचा मार्गही खुला झाला.  

शिया-सुन्नी भेद आणि करबलाचा वारसा  
करबलाच्या शोकांतिकेनंतर शिया आणि सुन्नी मुस्लिमांमधील भेद स्पष्ट झाला. या घटनेपूर्वी मुस्लिम समुदायात राजकीय मतभेद होते, पण ते धार्मिक भेद नव्हते. करबलानंतर इमाम हुसेन यांच्या अनुयायांनी एक मजबूत ओळख निर्माण केली. त्यांचा विश्वास होता की केवळ पैगंबरांचे कुटुंब—विशेषतः हजरत अली आणि इमाम हुसेन यांच्याद्वारे—मुस्लिम जगाचे नेतृत्व करू शकते. हा विश्वास शिया विचारसरणीचा केंद्रबिंदू बनला. दुसरीकडे, सुन्नी मुस्लिमांचा विश्वास होता की नेतृत्व पात्र आणि स्वीकृत व्यक्तीकडून, शूरा (लोकसल्ला) द्वारे यावे, केवळ पैगंबरांच्या कुटुंबापुरते मर्यादित नसावे. 

शियांसाठी करबला हे योग्य नेत्याला भ्रष्ट शासकाने मारल्याचे वेदनादायी प्रतीक बनले. कालांतराने, शियांनी मुहर्रमला शोक आणि विधींसह साजरे करण्यास सुरुवात केली, तर सुन्नींनी या घटनेची आठवण वेगळ्या पद्धतीने केली. स्मृती, भावना आणि धार्मिक समजुतीतील हा फरक इस्लाममध्ये दोन मार्ग निर्माण करणारा ठरला. करबलानंतर हा भेद केवळ राजकीय राहिला नाही—तो खोलवर आध्यात्मिक आणि भावनिक बनला, ज्याने आजपर्यंत चालणाऱ्या वेगळ्या धार्मिक परंपरा घडवल्या.  

करबलाचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा  
करबलाची स्मृती केवळ शिया विचारसरणीपुरती मर्यादित राहिली नाही, तर सुन्नी आणि सुफी परंपरांमध्येही ती जिवंत राहिली. शिया मुस्लिमांसाठी करबला अन्यायाविरुद्ध प्रतिकाराचे प्रतीक बनले. दरवर्षी मुहर्रममध्ये ते हुसेन यांच्या बलिदानाची शोकपूर्ण आठवण करतात. सुफी परंपरांनीही हुसेन यांच्या सत्य, संयम आणि आध्यात्मिक प्रतिकाराच्या मूल्यांचा गौरव केला. करबलानंतर तात्काळ सुफीवाद सुरू झाला असे म्हणणे अचूक नसले, तरी नंतरच्या सुफी शिकवणींनी इमाम हुसेन आणि त्यांच्या नैतिक धैर्याचा खूप आदर केला.  

राजकीय वापर आणि करबलाचा संदेश  
राजकारणात करबलाच्या स्मृतीचा वेगवेगळ्या शासकांनी स्वतःच्या हेतूसाठी वापर केला. उमय्यांनी याला बंडखोरी ठरवले. अब्बासांनी याला अत्याचारी शासकांनी घडवलेली शोकांतिका म्हटले. नंतरच्या शिया राजवंशांनी, जसे की इराणमधील सफवी, याचा उपयोग स्वतःची ओळख आणि वैधता निर्माण करण्यासाठी केला. पण या सर्व राजकीय वापरापलीकडे, करबलाचा संदेश स्पष्ट राहिला: कितीही शक्तिशाली अत्याचारी असला, तरी सत्य आणि न्याय यांचा बचाव करायलाच हवा—मग त्यासाठी जीवाची किंमत का असेना.  

करबलाचा कालातीत प्रभाव  
करबला ही केवळ ऐतिहासिक घटना नव्हती. तिने इस्लामी समाजाचा आत्मा बदलला. वैध सत्ता ही बळावरून नव्हे, तर न्याय, नीतिमत्ता आणि लोकांच्या इच्छेवरून येते, हे तिने दाखवले. करबलाचा धडा आजही लोकांना प्रेरित करतो—अन्यायाखाली जगण्यापेक्षा सन्मानाने मरणे चांगले. म्हणूनच, १,४०० वर्षांनंतरही, हुसेन यांची कहाणी जिवंत आहे—केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे, तर सत्य, सन्मान आणि मानवतेसाठी उभे राहणाऱ्या सर्वांसाठी.  

- डॉ. उझमा खातून 
(लेखिकेने अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या इस्लामिक अभ्यास विभागात अध्यापन केले आहे.)