नोबेल विजेत्या नर्गिस मोहम्मदींचे पुन्हा उपोषण

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 4 Months ago
नर्गिस मोहम्मदी
नर्गिस मोहम्मदी

 

इराणच्या तुरुंगात असलेल्या यावर्षीच्या नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त नर्गिस मोहम्मदी यांनी पुन्हा एकदा उपोषणाची तयारी केली आहे. रविवारी त्यांच्या अनुपस्थीत ओस्लो येथे त्यांच्या कुटुंबीयांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांचे पती आणि दोन मुलं उपस्थित होते. मोहम्मदी यांच्या पतीने यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

मोहम्मदी यांचे पती ओस्लोतील पत्रकार परिषदेत म्हणाले की, बाहाई धार्मिक अल्पसंख्यांक गटासाठी त्या उपोषण करणार आहेत. मोहम्मदी या २०२१ पासून तेहराणच्या इव्हिन तुरुंगात आहेत. महिलांसाठी हिजाब बंधनकारक असणे आणि इराणमधील मृत्यूदंडाची शिक्षा या विरोधात त्यांनी आंदोलनं केली आहेत.

मोहम्मदी यांनी महिलांच्या हक्काबाबत कायम आवाज उठवलाय. पुरस्कार वितरणावेळी त्या अनुपस्थित होत्या. पण, त्यांची १७ वर्षांची दोन जुळी मुलं आणि त्यांचे पत्नी त्याठिकाणी उपस्थित होते. अली आणि कायना सध्या फ्रान्समध्ये राहत असून ते गेल्या सात वर्षांपासून आपल्या आईला भेटलेले नाहीत.

कोण आहेत नर्गिस मोहम्मदी?
झंजान येथे जन्मलेल्या मोहम्मदी यांचे शिक्षण इमाल खोमेनी इंटरनॅशन युनिव्हर्सिटीमध्ये झालं आहे. त्यांच्याकडे फिजिक्सची पदवी आहे. कॉलेजमध्ये असतानाच त्या महिलांचे हक्क आणि समानता याबाबत कार्य करत होत्या. पदवी झाल्यानंतर त्यांनी इंजिनियर म्हणून काम केलं. याच काळात त्यांनी सुधारणांबाबत विविध वृत्तपत्रातून लेख लिहिले.

२००३ मध्ये मोहम्मदी मानवी हक्काच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या तेहरान येथील संस्थेत सहभागी झाल्या. ही संस्था नोबेल पुरस्कार विजेत्या शिरिन इबादी या चालवत होत्या. मोहम्मदी यांना पहिल्यांदा २०११ मध्ये अटक झाली. २०१३ मध्ये त्यांना जामीन मंजूर जाला. तुरुंगातून बाहेर आल्या तरी त्यांनी मृत्यूदंडाच्या शिक्षेला विरोध सुरुच ठेवला. त्यानंतर त्यांना २०१५ मध्ये पुन्हा तुरुंगवास झाला.

मोहम्मदी यांना आतापर्यंत १३ वेळेस अटक झाली असून एकूण ३१ वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यांना शिक्षा म्हणून १५४ फटके सुद्धा देण्यात आलेत. गेल्या काही वर्षात त्यांना अतोनात छळाला सामोरे जावं लागलंय.

२२ वर्षीय मेहसा अमिनी हिचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला होता. हिजाब ड्रेस कोडचे पालन न करण्यात आल्याने तिला ताब्यात घेण्यात आले होते. अमिनीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये मोठे आंदोलन उभे राहिलं. या आंदोलनाला त्यांनी तुरुंगातून खंबीर पाठिंबा दिला.

नवे उपोषण कशासाठी
इराणमधील बाहाई धार्मिक अल्पसंख्याक गटावर होणारे अत्याचार या विरोधात मोहम्मदी यांनी उपोषणाचे हत्यार उचललं आहे. त्यांच्यासोबत आणखी दोन कार्यकर्ते देखील उपोषण करत आहेत. काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यासाठी तोंड झाकण्याच्या सक्तीच्या विरोधात त्यांनी काही दिवस उपोषण केले होते.