लष्करातील महिला अधिकाऱ्यांप्रमाणे महिला सैनिकांनाही यापुढील काळात मातृत्व, मुलांचे संगोपन तसेच मूल दत्तक घेण्यासाठी सुट्या व इतर आवश्यक सुविधा मिळणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी मंजुरी दिली.
लष्करात महिलांबाबत सर्वसमावेशक धोरण अवलंबिले जात असून त्यानुसार वरील निर्णय घेण्यात आला असल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे महिला सैनिकांच्या स्थितीमध्ये सुधारणा होऊन त्यांच्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन साधण्यास मदत होईल.
विशेष म्हणजे ‘अग्निवीर’ योजनेंतर्गत सामावून घेण्यात आलेल्या महिला सैनिकांना देखील या योजनांचे लाभ उपलब्ध करून दिले जाणार आहेत, असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. लष्करात कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यांना सध्या मातृत्व, मुलांचे संगोपन आणि मूल दत्तक घेण्यासाठी सुट्या व इतर सुविधा दिल्या जातात. तिन्ही सेना दलांतील महिला अधिकाऱ्यांना याचा लाभ मिळतो.
आता त्याच धर्तीवर महिला सैनिकांना याचा लाभ मिळू शकेल. भारतीय लष्करात २०१९ मध्ये महिला सैनिकांच्या नियुक्तीला सुरूवात झाली होती. लष्कराच्या पोलिस कोअरमध्ये महिलांना काम करण्याची संधी देण्यात आली होती. लष्करातील महिला अधिकाऱ्यांप्रमाणेच सैनिकांना अशा प्रकारच्या सुविधा मिळाव्यात म्हणून वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू होती.
असे होतील परिणाम
-
महिलांच्या वैयक्तिक, व्यावसायिक आयुष्यात सुधारणा
-
महिला सैनिकांची लष्करातील कामगिरी उंचावणार
-
तिन्ही सेनादलांतील महिला सैनिकांना लाभ मिळणार
-
महिला अग्निवीरांना या योजनेचा लाभ होणार
-
लष्करातील महिला अधिकाऱ्यांप्रमाणे सवलती
अशा मिळतात सुट्या
महिला अधिकाऱ्यांना सध्या वर्षाला मातृत्व काळासाठी १८० दिवसांच्या पगारी सुट्या दिल्या जातात. याशिवाय संपूर्ण सेवा काळात मूल संगोपनाकरिता ३६० दिवसांच्या सुट्या दिल्या जातात. एक वर्षाखालील मूल दत्तक घेतल्यास एका वर्षासाठी १८० दिवसांच्या सुट्या दिल्या जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली.