कोलंबियासह अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 14 d ago
कोलंबिया विद्यापीठ
कोलंबिया विद्यापीठ

 

कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ सुरु असलेले आंदोलन थांबण्याची चिन्ह आहेत. कारण, न्यू यॉर्क पोलीस मोठ्या संख्येने विद्यापीठात शिरले असून ते आक्रमक झाले आहेत. अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. महापौर इरिक एडम्स यांनी आंदोलन थांबायला पाहिजे असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर काही तासांतच ही कारवाई करण्यात आली आहे.

टीव्ही रिपोर्टनुसार, अनेक पोलीस अधिकारी हेल्मेट, काठ्या, अश्रूधूरकांड्या घेऊन विद्यापीठ परिसरात गेले आहेत. आंदोलन आक्रमक झाले असून ते पोलिसांना विरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत. गाझापट्टीमध्ये होणारा हिंसाचार थांबवण्याची आंदोलकांची मागणी आहे. गाझामध्ये निष्पाप लोक, लहान मुलं याची हत्या सुरु असून ती तात्काळ थांबावी अशी मागणी आंदोलकांची लावून धरली आहे.

कोलंम्बिया विद्यापीठ प्रशासनाने यापूर्वी विद्यार्थ्यांना नोटीस जारी केली होती. यामध्ये आंदोलकांना सक्त ताकिद देण्यात आली होती. शिवाय हे आंदोलन बाहेरच्या लोकांनी प्रेरित असल्याचा आरोप करण्यात आला होता. विद्यार्थ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला होता. विद्यापीठातून काढून टाकण्याची धमकी देखील विद्यार्थ्यांना देण्यात आलीये.

गाझामध्ये जो काही नससंहार सुरु आहे, त्याच्याविरोधात अमेरिकेतील अनेक भागात आंदोलन सुरु आहे. प्रशासनाने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना अद्याप यश आलेलं नाही. विद्यार्थ्यांनी विद्यापीठ्यातील एक हॉल ताब्यात घेतला असून पॅलेस्टिनी लहान मुलांच्या मृत्यूच्या स्मरणार्थ त्याला हिंद हॉल असं नाव देण्यात आलंय.

विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना काही प्राध्यापकांनी देखील पाठिंबा दिलाय. पण, पोलिसांनी बळाचा वापर करुन अनेकांची धरपकड केली आहे. यासंदर्भातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायराल झाले आहेत. व्हिडिओमध्ये पोलीस हेल्मेट आणि हातात काठ्या घेऊन उभे असल्याचं दिसत आहे.

७ ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्राइलवर हल्ला केला होता. त्यानंतर इस्राइलने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली असून अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. गाझा पट्टीची अक्षरश: चाळणी झाली आहे. अनेकांना जीव गमवाला लागला आहे. या मुद्द्यावरुन अमेरिकत वाद निर्माण झाला आहे. विद्यापीठामध्ये दोन गट पडले आहेत. विद्यार्थ्यांना आंदोलनाच्या अधिकारापासून का वंचित ठेवलं जात आहे असा प्रश्न विचारला जात आहे.