लखनऊचा मोहम्मद आर्यन ICSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत भारतात पहिला

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
निकाल जाहीर झाल्यावर आनंद साजरा करताना आपल्या आईसोबत मोहम्मद आर्यन.
निकाल जाहीर झाल्यावर आनंद साजरा करताना आपल्या आईसोबत मोहम्मद आर्यन.

 

“कधीही कोणतीही परीक्षा फार मोठी  समजू नका; संकट तर समजूच नका! जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट तुमच्यापेक्षा मोठी आहे असे समजता तेव्हा कळत-नकळत तुमचे खच्चीकरण व्हायला सुरुवात होते,” हे प्रेरक शब्द आहेत मोहम्मद आर्यन या विद्यार्थ्याचे.'कौन्सिल ऑफ इंडियन सर्टिफिकेट स्कूल एक्झॅमिनेशन'च्या (CICSE) बारावीच्या परीक्षेत लखनऊच्या मोहम्मद आर्यनने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. कसे मिळवले त्याने हे देदीप्यमान यश? वाचा...

-छाया काविरे ([email protected])
---------------------------------------------------------------- 

'ग्यान की रोशनी से पूरी दुनिया को रोशन किया जा सकता है...’ असे एक सुवचन आहे. याच सुवचनाची प्रचीती उत्तर प्रदेशासह साऱ्या भारताला दिली आहे मोहम्मद आर्यन या विद्यार्थ्याने. आर्यन हा उत्तर प्रदेशाची राजधानी लखनऊ इथल्या 'सिटी मॉन्टेसरी स्कूल'चा विद्यार्थी. त्याने बारावीत ४०० पैकी ३९९ गुण (९९.७५ टक्के) मिळवत नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. 

'कौन्सिल ऑफ इंडियन सर्टिफिकेट स्कूल एक्झॅमिनेशन'तर्फे (CICSE) घेण्यात आलेल्या 'इंडियन स्कूल सर्टिफिकेट'च्या (ISC) दहावीच्या परीक्षेत ९८.९४ टक्के, तर बारावीच्या परीक्षेत ९६.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पाच विद्यार्थ्यांनी ISC बोर्डात ३९९ गुण मिळवून अव्वल स्थान प्राप्त केले आहे, तर नऊ विद्यार्थ्यांनी CICSE च्या दहावीच्या गुणवत्तायादीत स्थान मिळवले आहे.

आर्यनचे वडील तारीक नफीस खासगी नोकरी करतात, तर आई इमाइला गृहिणी आहे. मुलाच्या यशाबद्दल तारीक म्हणाले, “हा एक भावनिक क्षण आहे. शब्दांत व्यक्त करता येत नाहीय इतका मला आनंद झालाय. कुणाचाही मुलगा देशात पहिला आल्यावर साहजिकच त्या पालकांचा आनंद गगनात न मावणाराच असेल.” ते पुढे म्हणतात, “'आर्यन अभ्यास कर‌' असं त्याला सांगण्याची वेळ आमच्यावर कधीच आली नाही. लहानपणापासूनच तो अभ्यासू होता. 'फोकस्ड्' होता. उलट, 'आता बाकीचा अभ्यास उद्या कर,' असे आम्हालाच त्याला सांगावे लागायचे... पण ठरवलेला अभ्यास पूर्ण केल्याशिवाय त्याला राहवायचेच नाही.”

आर्यनची आई इमाइला म्हणतात, “आर्यनने ही मला ‘मदर्स डे’ची सगळ्यात मोठी भेट दिली आहे. आर्यनला ९० टक्क्यांच्या पुढे मार्क्स मिळतील याची कल्पना होतीच; पण त्याचा देशात पहिला क्रमांक येईल याचा अंदाजही नव्हता. निकाल लागल्यापासून नातेवाइकांच्या शुभेच्छांचे फोन व मेसेजेस येत आहेत. भविष्यात आर्यनला जे व्हावंसं वाटत असेल ते त्यानं व्हावं. आम्ही नेहमीच त्याच्या सोबत आहोत.”  

आर्यनच्या स्वावलंबनाचे एक छोटेसे उदाहरण सांगताना त्या म्हणतात, " तो रात्री खूप उशिरापर्यंत अभ्यास करत बसलेला असायचा... तरतरी येण्यासाठी त्याला कधी चहा-कॉफी हवी असायची. मात्र, मी त्याला चहा-कॉफी करून द्यावी अशी अपेक्षा न बाळगता तो स्वतःच चहा किंवा कॉफी करून घ्यायचा."

आर्यनची आजी नाातवाच्या यशाचा आनंद साजरा करताना त्याच्या इतर गुणांचे कौतुक करताना सांगते, “आर्यन अवघ्या सात वर्षांचा असतानाच त्याने 'कुराणशरीफ'चा अभ्यास पूर्ण केला. त्याला उर्दू उत्तमरीत्या लिहिता-वाचता येते. कुराणातल्या सगळ्या गोष्टी त्याच्या तोंडपाठ आहेत. लहानपणापासूनच तो अभ्यासात आघाडीवर होता. माझी 'दुआ' आर्यनसोबत नेहमीच असेल. त्याला असेच यश मिळत राहो.”

आपल्या यशाबद्दल आर्यन सांगतो, “मी कधी शाळा मिस केली नाही. सुट्ट्या घेतल्या नाहीत. रात्री बारा वाजता, एक वाजता जरी आम्हा विद्यार्थ्यांना अभ्यासासंदर्भात काही शंका असल्या तर त्या शंकांचे निराकरण आमचे शिक्षक त्याच वेळी करायचे.” 

“एकदाच दहा तास खूप अभ्यास केला आणि नंतर नाही केला तरी चालेल, असे असायला बोर्डाची परीक्षा म्हणजे काही १०० मीटरची रेस नव्हे. बोर्डाची एक्झॅम ही एक प्रकारे मॅरेथॉन असते. तुम्हाला लांब पल्ल्याचा रस्ता गाठायचा असेल तर नियोजन करून धावणे म्हणजेच नियोजन करून अभ्यास करणे गरजेचे असते. सुरुवातीपासूनच मी तीन-चार तास अभ्यास करत असे. यादरम्यान मी सोशल मीडियावरदेखील ॲक्टिव्ह असायचो... क्रिकेट खेळायचो... सिरीज पाहायचो... सगळे काही एंजॉय करत, माझे वेळापत्रक समतोल कसे राहील हे मी पाहिले. 'बॅलन्स्ड् शेड्युल' फार महत्त्वाचे असते. जानेवारी-फेब्रुवारी-मार्च या महिन्यांत मी शाळेतच अभ्यास करायला सुरुवात केली. कारण, घरी बऱ्याचदा नातेवाईक यायचे. त्यामुळे मन विचलित व्हायचे. हे डिस्ट्रॅक्शन टाळण्यासाठी मी शाळेतच अभ्यास करायचो. अभ्यासाचा फ्लो जायला नको म्हणून मी ही युक्ती योजली होती. ग्रुप स्टडी, काही विषयांवर डिस्कशन यावर मी अधिक भर दिला,” आर्यनने त्याच्या यशाची सूत्रेच उलगडून दाखवली.

"तू इतर मुलांना काय टिप्स देशील?" या प्रश्नाला उत्तर देताना आर्यन सांगतो, "अभ्यासाचा एकदम, एकाच वेळी जास्त दबाव न घेता सातत्याने अभ्यास करा. एकाच दिवसात दहा तास अभ्यास करायची गरज नाही. दोनच तास अभ्यास करा; पण तो अगदी रोज, नित्यनियमाने तेवढा वेळ होईलच, याची काळजी घ्या. 'हे आपल्याच्याने शक्य नाही,' असे बऱ्याचदा वाटते... पण अशा वेळीच स्वतःवर विश्वास ठेवायचा असतो.  'मेहनतीचे फळ चांगलेच मिळते,' हे सतत लक्षात असू द्या."

अभ्यासाची स्ट्रॅटेजी सांगताना तो म्हणतो, “फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे माझे कंपल्सरी विषय होते, तर बायोटेक्नॉलॉजी आणि फिजिकल एज्युकेशन हे ऑप्शनल विषय होते. ISC बोर्डात इंग्लिश हा विषय कंपल्सरी असतो, त्यामुळे मी इंग्लिशवर खूप भर दिला. कौन्सिलने दिलेल्या इंग्लिशच्या तीन पुस्तकांचा मी चांगला अभ्यास केला. यात शिक्षकांनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाचे डायलॉग, धडे यांचा अधिक अभ्यास केला. मॅथ्सची रेग्युलर प्रॅक्टिस केली. केमिस्ट्री हा माझा आवडता विषय होता. हा विषय अधिक समजून घेण्यासाठी बेला मॅडमचे मार्गदर्शन मला लाभले. बायोलॉजीमध्ये कन्सेप्ट क्लीअर असणे अत्यंत गरजेचे असते. त्यावरही मी भर दिला.”

“शेवटच्या टप्प्यात मी मोबाईलपासून होता होईल तितका दूर राहिलो. मोबाईल कमीत कमी वापरला. ‘तुम्हाला काहीतरी मोठे मिळवायचे असेल तर काही सवयींचा, आवडींचा काही काळासाठी का होईना त्याग करावाच लागतो, असे मला नेहमी वाटते," आपल्या यशाचे असे गमक सांगून, खासगी कोचिंगबद्दल बोलताना आर्यन म्हणतो, “कोचिंग लावल्याने फार काही बदल घडतो असे मला वाटत नाही. शाळेतल्याच अभ्यासक्रमाचा/शिक्षणाचा एक छोटा फॉर्म (प्रतिकृती) म्हणजे कोचिंग, असे मी समजतो. कोचिंग न लावता शाळा करून स्वयं-अध्ययनाला महत्त्व दिले तरी खूप आहे. सगळ्यांनाच अभ्यासाचा ताण येतो; पण ताणाचे ते ओझे डोईजड होऊ न देता त्याकडे 'मोटिवेशन' म्हणून पाहिले तर त्या ताणाचे व दडपणाचेच रूपांतर बलस्थानात करता येऊ शकते." 

"मला खूप ताण आला की मी माझ्या आई-वडिलांशी, शिक्षकांशी व मित्रांशी बोलायचो. ते सगळे मला म्हणायचे, ‘मार्कांच्या मागे पळू नकोस. शंभर टक्के मेहनत घे!’ मी स्वतःच्या नोट्स काढल्या होत्या. पन्नास पानांच्या पुस्तकाच्या मी पाच पानांत नोट्स काढल्या होत्या. पेपर लिहिताना डायग्राम, आलेख, बुलेट पॉईंट्स अशी माझी मांडणी असायची. यामुळे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांवर चांगला प्रभाव पडतो. याशिवाय, 'रीडिंग हॅबिट' असणे हेही खूप लाभदायक ठरते. पन्नाशीच्या व्यक्तीला असणाऱ्या अनुभवाइतका अनुभव अवांतर पुस्तके वाचण्याच्या सवयीमुळे वयाच्या अठराव्या वर्षीच तुम्ही मिळवू शकता. वाचनाच्या सवयीची बोर्डाच्या परीक्षांमध्ये खूप मदत होते. हे सगळे करत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत अभ्यास करायला हवा.”

शेवटी आनंद व्यक्त करताना आर्यन म्हणतो, “माझ्यामुळे माझ्या कुटुंबीयांना, शिक्षकांना आणि मित्रांना खूप आनंद होत आहे, याचाच मला जास्त आनंद आहे. माझ्या या यशात माझे कुटुंबीय, शिक्षक यांचा सिंहाचा वाटा आहे.” 

आर्यनला व्हायचेय डॉक्टर 
त्याविषयी तो म्हणतो, "डॉक्टर हा असा एकमेव व्यवसाय आहे की, त्यात तुम्ही रुग्णाला केवळ थेट मदतच करू शकता असे नव्हे तर, त्याचा जीवही वाचवू शकता. मला NEET उत्तीर्ण करून हृद्रोगतज्ज्ञ व्हायचे आहे. डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करायची आहे." 

मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री (सीएम) योगी आदित्यनाथ यांनी, परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे : CICSE आणि ISC बोर्डाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, तसेच पालक व शिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन! तुम्ही सर्वजण 'न्यू उत्तर प्रदेश'चा सोनेरी भविष्यकाळ आहात. कठोर परिश्रमांनी आणि अविचल समर्पणाने आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेत असेच उत्तीर्ण होत राहा, हीच माझी सदिच्छा. सरस्वतीमातेचा आशीर्वाद तुम्हाला सदैव मिळत राहो."