पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारामुळे पूंछ जिल्ह्यातील नागरी भागात मोठे नुकसान झाले असून सुमारे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष नरिंदर सिंग यांनी बुधवारी ही माहिती दिली.
यावेळी बोलताना अध्यक्ष नरिंदर सिंग यांनी सांगितले की, "एक गोळी गीता भवनाला लागली आणि दुसरी गोळी मस्जिदीवर पडली. त्यात मस्जिदीतील एका शिक्षकाचा मृत्यू झाला."
"शेजारी देशाला शहाणपण उरलेलं नाही. सामान्य नागरिकांवर मोठा हल्ला केलाय. खूप नुकसान झालंय. सरकार आणि केंद्राने परिस्थिती सुधारण्यासाठी पावलं उचलावीत. लोकांमध्ये भीती पसरली असून अनेकांनी स्वतःची घरं सोडली आहेत." असं नरिंदर सिंग यांनी स्वतःच्या व्हिडिओत सांगितले.
नरिंदर सिंग पुढे बोलताना म्हणाले, "सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारात सुमारे १२ लोकांचा मृत्यू झालाय. पूंछ शहरात पाच शीख बांधव, तर बाकी मुस्लिम समाजातील लोक होते. गुरुद्वाऱ्याच्या एका कोपऱ्यावर गोळी लागली, दरवाजा आणि काही काच फुटल्या. गुरुद्वाऱ्याचं मोठं नुकसान झालं अशी अफवा पसरलीय, पण ती चुकीची आहे. हा परिसर दाट वस्तीचा असल्यामुळे गीता भवन आणि मस्जिदीला सुद्धा गोळ्या लागल्या. मस्जिदीत एक शिक्षक मृत्युमुखी पडला."
या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी पाकिस्तानच्या सैन्याने पवित्र केंद्रीय गुरुद्वाऱ्यावर केलेल्या अमानुष हल्ल्याचा तीव्र निषेध केला. बादल यांच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात तीन शीख बांधवांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अमरीक सिंग (रागी सिंग), भाई अमरजीत सिंग आणि रणजित सिंग यांचा समावेश आहे.
बादल यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करत नुकसानभरपाईची मागणी केली. "गुरुद्वाऱ्यावर झालेल्या अमानुष हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. अमरीक सिंग, अमरजीत सिंग आणि रणजित सिंग यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. शिरोमणी अकाली दल या कुटुंबियांच्या पाठीशी आहे आणि या वीरांना श्रद्धांजली अर्पण करतो." असं बादल यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितलं.
ते पुढे म्हणाले, "या हल्ल्यात बळी गेलेले निष्पाप जीव शहीद म्हणून गौरवले जावेत आणि त्यांच्या कुटुंबांना मदत मिळावी, ही आमची मागणी आहे. शीख समाज नेहमीच देशासाठी उभा राहिलाय आणि राहील. आम्ही आमच्या शूर जवानांच्या पाठीशी ठाम उभे आहोत."
"ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-कश्मीरच्या सीमेवर नागरी भागांवर गोळीबार केला. त्यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि अनेक घरांचं नुकसान झालं," असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या परिस्थितीवर तातडीची बैठक घेतली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, "ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने शौर्य दाखवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक कारवाई केली."
एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, "या कारवाईत नागरिकांचं नुकसान होऊ नये याची पूर्ण काळजी घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सैन्याने नवा इतिहास रचला. अचूकता आणि संवेदनशीलतेसह ही कारवाई झाली. आपल्या जवानांनी जागरूकता आणि माणुसकी दाखवली. त्यांच्या शौर्याला देशभरातून सलाम." असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.
संयुक्त पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हटले की, पहलगाम दहशतवादी हल्ला अत्यंत क्रूर होता. बहुतेक पीडितांना जवळून गोळ्या घालून ठार करण्यात आलं आणि त्यांचे कुटुंबीय ते पाहत होते. हल्ल्याचा उद्देश काश्मीरमध्ये पुन्हा शांतता येऊ न देण्याचा होता. आमच्या गुप्तचर संस्थांना आणखी हल्ल्यांची शक्यता दिसत होती. म्हणूनच भारताने कारवाई करण्याचा निर्णय घेतला. ही कारवाई संयमित, मोजकी आणि जबाबदारीने केली गेली. उद्दिष्ट फक्त दहशतवादी तळांचा नाश करण्याचं होतं," असं ते म्हणाले.
विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितले की, "नऊ दहशतवादी तळांवर यशस्वी कारवाई झाली. कोणत्याही नागरिकाच्या जीविताला किंवा मालमत्तेला धक्का पोहोचू नये, अशी ठिकाणं निवडलेली होती. ऑपरेशन सिंदूर दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय देण्यासाठी होतं." असे त्यांनी स्पष्ट केले.
कर्नल सोफिया कुरेशी यांनी स्ट्राईकचे व्हिडिओ दाखवले. बुधवारी सकाळी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. पहलगामच्या हल्ल्यात २६ लोक मारले गेले. सरकारने आधीच सांगितले होते की या हल्ल्याला जे कुणी जबाबदार असेल त्यांना कठोर शिक्षा भोगावी लागेल.