संपूर्ण गाझा पट्टीवर ताबा मिळविण्याचे आणि पॅलेस्टिनी भागात दीर्घ काळ राहण्याच्या नियोजनाला इस्रायलने सोमवारी (दि.२) मंजुरी दिली. इस्रायलच्या दोन अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या नियोजनाची अंमलबजावणी झाली, तर पॅलेस्टिनी भागातील इस्रायलच्या कारवाया वाढणार असून, इस्रायलला आंतरराष्ट्रीय विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
नव्या नियोजनानुसार, इस्रायलला युद्ध उद्दिष्टे गाठण्यास मदत होणार आहे. हमासचा पराभव आणि गाझामध्ये ठेवलेल्या इस्रायलच्या ओलिसांची सुटका याबरोबरच पॅलेस्टिनींना दक्षिण गाझाकडे आणखी ढकलणे ही उद्दिष्टे यामागे आहेत. इस्रायल आणि हमासमधील शस्त्रसंधी करार मार्च महिन्याच्या मध्यात संपल्यानंतर इस्रायलने पुन्हा एकदा पॅलेस्टिनी भागात हल्ले सुरू केले. त्यात शेकडोंचा मृत्यू झाला. आत्ता जवळपास निम्म्या गाझा पट्टीवर इस्रायलचा ताबा आहे.
शस्त्रसंधी संपण्यापूर्वी इस्त्रायलने गाझा पट्टीकडे जाणारी मानवी दृष्टिकोनातून करण्यात येणारी मदत थांबविली. त्यात अन्न, इंधन आणि पाण्याचा समावेश आहे. तिथे अन्नपदार्थांचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून तिथे लूटमार होत आहे. अन्नाच्या तुटवड्यामुळे कुपोषण आणि पचनाच्या समस्यांनी अनेकांचा मृत्यू होत आहे.
इस्रायली अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, "गाझामध्ये कोणत्याही प्रकारच्या अन्नाचा तुटवडा नाही. तसेच तिथे लोकसंख्येसाठी पुरेशी मदत पोहोचली आहे. हमासच्या ताब्यात मदत जाऊ नये." असे त्यांनी म्हटले आहे.
इस्रायलने लष्करी मोहीम वाढवण्याची योजना जाहीर केली. बुधवारी रफाहमध्ये हवाई हल्ले झाले. इमारती उद्ध्वस्त झाल्या, असे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे विस्थापित गाझावासीयांचा त्रास वाढत आहे. गाझामध्ये लोकांना शेती करण्यावर बंदी आहे. मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई आहे. गाझा पूर्णपणे बाहेरील अन्नावर अवलंबून आहे. इस्रायलने शेवटची मदत २ मार्चला दिली होती. त्यांनंतर हे भुकेचे संकट गाझावर ओढवले आहे.
संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय मदत संस्थांनी मोठ्या संकटाची चेतावणी दिली. संयुक्त राष्ट्र मानवतावादी संस्था OCHA च्या मते, २३ लाख लोकसंख्येपैकी २० लाखांहून अधिक लोकांना तीव्र अन्नटंचाईचा सामना करावा लागत आहे. कुपोषणामुळे मुले, गर्भवती महिला आणि दीर्घकालीन आजार असलेले लोक गंभीरपणे प्रभावित झाले आहेत. युद्धात जखमी झालेल्यांचा पुनर्वसनही थांबले आहे. मदत साठा जवळपास संपला आहे, असे अनेक संस्थांनी सांगितले.
गाझा आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, किमान ६५,००० मुलांमध्ये कुपोषणाची लक्षणे दिसत आहेत. गाझा सरकारच्या माध्यम कार्यालयाने सांगितले की, २ मार्चपासून इस्रायलने प्रवेशद्वारे बंद केल्यापासून कुपोषणामुळे ५७ लोक, मुख्यतः मुले, मरण पावली. ही दोन्ही कार्यालये हमासच्या नियंत्रणाखाली आहेत.