भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत 7 मे 2025 रोजी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीर (PoK) मधील 9 दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. या हल्ल्यांद्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यात आले. 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. या कारवाईनंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी जगभरातील अनेक देशांच्या सुरक्षा सल्लागार आणि प्रमुख नेत्यांशी संपर्क साधला.
ऑपरेशन सिंदूर आणि डोवाल यांची भूमिका
‘ऑपरेशन सिंदूर’ ही कारवाई मंगळवारी मध्यरात्रीनंतर 1:44 वाजता सुरू झाली. या हल्ल्यांत बहावलपूर, मुरिदके, कोटली, सियालकोट, अहमदपूर शर्किया, बाग, भिवर, गुलपूर आणि मुजफ्फराबादमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या छावण्या या ठिकाणी होत्या.
या कारवाईसाठी अजित डोवाल यांनी विशेष टीम तयार केली होती. गुप्तचर माहिती गोळा करण्यापासून ते हल्ल्यांची अंमलबजावणी करण्यापर्यंत सर्व जबाबदारी त्यांनी सांभाळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित डोवाल यांना पूर्ण स्वायत्तता दिली होती. डोवाल यांनी 15 हून अधिक उच्चस्तरीय बैठका घेऊन या हल्ल्याचे अचूक नियोजन केल्याचे सूत्रांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय नेत्यांशी साधला संवाद
डोवाल यांनी हल्ल्यांनंतर लगेचच अनेक देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी संपर्क साधला. यात अमेरिकेचे NSA आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो, ब्रिटनचे NSA जोनाथन पॉवेल, सौदी अरेबियाचे NSA मुसैद अल अयबान, UAE चे NSA शेख तहनून, UAE चे NSC चे सरचिटणीस अली अल शम्सी आणि जपानचे NSA मासातका ओकानो यांचा समावेश होता. याशिवाय रशियाचे NSA सर्जेई शोइगु, चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटिकल ब्युरोचे सदस्य आणि परराष्ट्रमंत्री वांग यी, तसेच फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार इमॅन्युएल बॉन यांच्याशीही संपर्क झाला.
डोवाल यांनी या नेत्यांना कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली. ही कारवाई मोजूनमापून आणि अचूक होती, ती तणाव न वाढवणारी आणि संयमाने केलेली होती, असे त्यांनी स्पष्ट केले. भारताला तणाव वाढवायचा नाही, पण पाकिस्तानने तणाव वाढवला तर ठाम प्रत्युत्तर देण्यास भारत तयार आहे, असेही डोवाल यांनी सांगितले.
अजित डोवाल यांचा अनुभव आला कामी
अजित डोवाल हे भारताचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. 2014 पासून ते या पदावर आहेत. 1945 मध्ये उत्तराखंडच्या पौडी गढवाल येथे जन्मलेले डोवाल हे केरळ कॅडरचे माजी IPS अधिकारी आहेत. त्यांनी आग्रा विद्यापीठातून अर्थशास्त्रात मास्टर्स केले आहे. गुप्तचर आणि दहशतवादविरोधी क्षेत्रातील त्यांचा अनुभव गाढा आहे. 2004-05 मध्ये ते गुप्तचर ब्युरोचे संचालक होते. त्यापूर्वी त्यांनी एका वर्षासाठी पाकिस्तानात गुप्तचर म्हणून काम केले. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयात त्यांनी 6 वर्षे सेवा बजावली.
डोवाल यांनी अनेक महत्त्वाच्या कारवायांमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. 1988 मध्ये ऑपरेशन ब्लॅक थंडर, 2015 मध्ये ऑपरेशन हॉट परस्युट आणि इराकमधून 46 भारतीय नागरिकांची सुटका यात त्यांचा सहभाग होता. 2019 मध्ये बालाकोट हवाई हल्ले आणि 2016 मधील सर्जिकल स्ट्राइकही त्यांच्या देखरेखीखाली झाले होते. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची होती.
ऑपरेशन सिंदूरचा परिणाम
या हल्ल्यांत 90 हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय मर्कझ सुबहान अल्लाह पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. मुरिदके येथील लष्कर-ए-तोयबाचे केंद्रही या हल्ल्यात नष्ट झाले. याच ठिकाणी 2008 च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब आणि डेव्हिड हेडली यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. कोटली येथील अब्बास छावणी लष्कर-ए-तोयबाची आत्मघाती हल्लेखोरांसाठी प्रशिक्षण केंद्र होती. तीही या हल्ल्यात नष्ट झाली आहेत.
भारताची पुढील तयारी
ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक 8 मे रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू सहभागी होतील. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा दुपारी 2 वाजता उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि DGP या बैठकीला हजर राहतील.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter