इस्राईलच्या सुरक्षा मंत्रिमंडळाने सोमवारी गाझा पट्टी पूर्णपणे ताब्यात घेण्याच्या योजनेला मंजुरी दिली. इस्राईलची ही योजना गाझावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहे. सुरक्षा मंत्रिमंडळाचा हा निर्णय हमासवर दबाव वाढवण्यासाठी आणि बंधकांची सुटका करून इस्राईलच्या अटींवर युद्धविराम निश्चित करण्यासाठी आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या निर्णयामुळे लाखो पॅलेस्टाईन नागरिकांना दक्षिण गाझाकडे स्थलांतर करावं लागेल.
इस्राईलची योजना काय?
इस्राईल हा गाझाचा निम्मा भाग नियंत्रित करतो. यामध्ये सीमेलगतचा बफर झोन आणि तीन पूर्व-पश्चिम कॉरिडॉरचा समावेश आहे. यामुळे युद्धग्रस्त पॅलेस्टाईन नागरिकांना गाझातील छोट्या आणि विनाश झालेल्या भागात ढकललं गेलं आहे. रविवारी, इस्राईलच्या लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल इयाल झमीर यांनी सांगितलं, की “लष्कर लाखो राखीव सैनिकांना बोलावत आहे. गाझातील नव्या भागात कारवाया वाढवून दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करणार आहे.”
हमासवर दबाव
गेल्या काही आठवड्यांपासून इस्राईल हमासवर दबाव वाढवत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला इस्राईलने गाझात मदत बंद केली होती. संयुक्त राष्ट्राने या बंदीचा विरोध केला आहे. यामुळे २३ लाख लोकसंख्येच्या गाझात मानवी संकट गंभीर झालं आहे. १८ मार्चपासून इस्राईलने पुन्हा हल्ले सुरू केले. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यात २६०० हून अधिक लोक मारले गेले, यात अनेक महिला आणि मुलांचा समावेश आहे.
युद्धाची पार्श्वभूमी
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या नेतृत्वाखालील दहशतवाद्यांनी दक्षिण इस्राईलवर हल्ला केला. यात १२०० लोक मारले गेले आणि सुमारे २५० जणांना ओलिस ठेवलं. इस्राईलच्या म्हणण्यानुसार, ५९ बंधक गाझात आहेत. यापैकी ३५ बांधकांचा मृत्यू झाला आहे. इस्राईलच्या प्रत्युत्तरातील कारवाईत ५२, ००० हून अधिक पॅलेस्टाईन नागरिक मारले गेले. यात अनेक महिला आणि मुलांचा समावेश आहे. गाझातील ९० टक्के लोकसंख्या विस्थापित झाली आहे. अनेकांना अनेकदा घर सोडावं लागलं आहे.
युद्धविराम का अयशस्वी?
जानेवारीत झालेला युद्धविराम युद्ध संपवण्यासाठी होता. पण इस्राईल आणि हमास यांच्यातील मतभेदांमुळे तो अयशस्वी झाला. इस्राईलच्या म्हणण्यानुसार हमासचा पराभव होईपर्यंत युद्ध थांबणार नाही. हमास मात्र युद्ध संपवण्याची मागणी करत आहे.