इस्रायलच्या विमानतळावर हुती बंडखोरांचा क्षेपणास्त्र हल्ला

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 21 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

गाझा-इस्रायल युद्धामुळे मध्य पूर्वात तणाव सातत्याने वाढत आहे. ४ मे ला यमनच्या हुथींनी इस्रायलच्या सर्वात मोठ्या बेन-गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. हे क्षेपणास्त्र विमानतळाच्या धावपट्टीवर कोसळले. यामुळे तिथे मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या हल्ल्यात किमान चार जण जखमी झाले. हल्ल्यामुळे विमानतळावरील सर्व उड्डाणे काही काळासाठी रद्द करण्यात आली होती. तसेच आसपासचे रस्तेही बंद करण्यात आले.

इस्रायलच्या ‘मॅगन डेव्हिड अ‍ॅडोम’ वैद्यकीय सेवेने सांगितले की, या हल्ल्यात ४ जण किरकोळ जखमी झाले. माध्यमांच्या दाव्यांनुसार, हल्ल्यामुळे विमानतळाचे मोठे नुकसान झाले. अनेक धावपट्ट्या उद्ध्वस्त झाल्या. विमानतळाचा एक भाग पूर्णपणे नष्ट झाला. हल्ल्यादरम्यान इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणा अपयशी ठरली. यामुळे एवढे मोठे नुकसान झाले.

हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी निवेदन जारी केले. त्यात त्यांनी म्हटले की, “या हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. हूती विद्रोही आणि त्यांचे इराणी पाठीराखे यांना परिणाम भोगावे लागतील." या व्यक्तव्यामुळे मध्य पूर्वात पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता आहे. इस्रायल कधीही इराण आणि यमनवर हल्ला करू शकते, असे सांगितले जात आहे.

हूती विद्रोह्यांची नवी धमकी
हूती विद्रोह्यांनी हल्ल्यानंतर चेतावणी दिली. ते बेन-गुरियन विमानतळावर सातत्याने हल्ले करतील. त्यांनी आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना इस्रायलसाठी उड्डाणे थांबवण्यास सांगितले. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे आवश्यक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. हूतींनी दावा केला की, या हल्ल्यात त्यांनी हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र वापरले.

गाझामध्ये होणार तीव्र हल्ले  
हल्ल्यानंतर काही तासांत इस्रायली मंत्रिमंडळाची बैठक झाली. गाझामधील लढाई तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. इजरायली लष्कराचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एयाल झमीर म्हणाले, “गाझामधील जमिनीवर आणि जमिनीखालील दहशतवादी ठिकाणे नष्ट केली जातील.”

गाझातील परिस्थिती गंभीर
गाझातील युद्धात आतापर्यंत ५२,००० हून अधिक लोक मरण पावले. यात मोठ्या संख्येने महिला आणि मुले आहेत. गाझातील ९० टक्के लोकांना घरे सोडावी लागली. अन्न, पाणी आणि औषधांचा तीव्र तुटवडा आहे. या हल्ला आणि चेतावणीमुळे संपूर्ण क्षेत्रात तणाव आणखी वाढला आहे.