के.व्ही. रबिया
केरळच्या साक्षरता मोहिमेत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या आणि अपंगत्वावर मात करत सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या के.व्ही. रबिया यांचे रविवारी मलप्पुरम येथे निधन झाले. रबिया यांना ५९ वर्षांचे आयुष्य लाभले. कर्करोगाशी दीर्घ लढाई आणि अल्प आजारानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
२५ फेब्रुवारी १९६६ मध्ये मलप्पुरम जिल्ह्यातील वेल्लिलकाडू गावात मूसाकुट्टी हाजी आणि बीयाचुटी हज्जुम्मा यांच्या यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. रबिया यांना पाच भावंडे होती. वयाच्या १४व्या वर्षी पोलिओमुळे त्यांचे पाय निकामी झाले. त्यामुळे त्यांनी व्हीलचेअरवर अभ्यास करत घरातूनच शिक्षण पूर्ण केले.
तिरुरंगडी येथील सरकारी हायस्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर रबिया यांनी तिरुरंगडीच्या पीएसएमओ कॉलेजमध्ये प्री-डिग्री अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. मात्र पोलिओमुळे त्यांना हा अभ्यासक्रम घरीच पूर्ण करावा लागला.
१९९०च्या दशकात केरळ सरकारच्या साक्षरता मोहिमेने रबिया यांना प्रेरित केले. त्यानंतर त्यांचे मूळ गाव असलेल्या वेल्लिलाक्कडजवळील तिरुरंगडी येथे सर्व वयोगटातील निरक्षर प्रौढांसाठी त्यांनी साक्षरता मोहीम सुरू केली. व्हीलचेअरवरूनच आपल्या परिसरातील निरक्षरांना त्या शिकवायच्या. त्यांच्या अनोख्या शिकवण्याच्या पद्धती आणि समर्पणामुळे जिल्ह्याभरातून शेकडो लोक त्यांच्या घरी येऊ लागले. त्यांनी राज्य सरकारच्या संपूर्ण साक्षरता मिशनमध्ये प्रशिक्षक म्हणून काम केले.
१९९४मध्ये रबिया यांनी 'चलनम चॅरिटेबल सोसायटी' स्थापन केली. या संस्थेने अपंग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी, ग्रामीण भागात आरोग्य जागरूकता वाढवण्यासाठी आणि विशेषतः महिलांमध्ये औपचारिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी काम केले. या संस्थेअंतर्गत अपंग मुलांसाठी शाळा, महिलांसाठी लघु-उद्योग, महिलांसाठी ग्रंथालय, युवक क्लब आणि हुंडा, अंधश्रद्धा, दारूबंदी यासारख्या सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध विविध कार्यक्रम राबवले गेले.
प्रौढ साक्षरतेसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे १९९४मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या हस्ते रबिया यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला. २०२२ मध्ये त्यांना पद्मश्री, देशातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान, प्रदान करण्यात आला. याशिवाय त्यांना केंद्र सरकार आणि युएनडीपी यांचा 'यूथ व्हॉलेंटियर अगेन्स्ट पॉव्हर्टी', नेहरू युवा केंद्र पुरस्कार, जोसेफ मुंडासेरी सामाजिक कार्य पुरस्कार आणि केरळ राज्य साक्षरता समिती पुरस्कार असे मानाचे पुरस्कार मिळाले.
रबिया यांनी केरळ सरकारच्या 'अक्षय' कार्यक्रमातही मलप्पुरम जिल्ह्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या कार्यक्रमाचा उद्देश डिजिटल अंतर कमी करणे आणि डिजिटलायझेशनद्वारे सरकारी सेवा घरापर्यंत पोहोचवणे हा होता.
२०००मध्ये रबिया यांना कर्करोगाचे निदान झाले. अशा परिस्थितीत त्यांनी थ्रिसूर येथे केमोथेरपी घेऊन या आजाराशी लढा दिला. इतर कर्करोग रुग्णांना आधुनिक वैद्यकीय उपचारांचा अवलंब करण्याचा सल्ला त्या देत. २००२मध्ये त्यांनी हज यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली.
२००४ मध्ये स्नानगृहात पडल्याने त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे त्यांच्या हालचाली मोठ्या प्रमाणात मर्यादित झाल्या. तरीही बेडवरूनच त्यांनी आपले विचार लिहायला सुरुवात केली. यातून पुढे चार पुस्तके प्रकाशित झाली. त्यापैकी २००९ मध्ये आलेले त्यांचे आत्मचरित्र 'स्वप्नांगलकु चिरकुकलुंदु' (स्वप्नांना पंख असतात) याला समीक्षकांची विशेष पसंती मिळाली.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी रबिया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. “ज्ञान मिळवण्यावर कोणतीही मर्यादा नसावी, हे रबिया यांनी शिकवले,” असे ते म्हणाले.