परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर
"भारत जेव्हा जगाकडे पाहतो, तेव्हा तो सहकाऱ्यांचा शोध घेतो, उपदेश देणाऱ्यांचा नाही," अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी युरोपीय महासंघावर कोरडे ओढले. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युरोपीय महासंघाने पाकसोबत चर्चा करण्याचा सल्ला भारताला दिला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना जयशंकर यांनी युरोपीय महासंघाची खरडपट्टी काढली.
आर्क्टिक सर्कल इंडिया फोरम कार्यक्रमात बोलताना "युरोपकडून भारताला कोणती अपेक्षा आहे?" असे विचारले असता जयशंकर म्हणाले, "उपदेश देणारे काहीजण असे आहेत की जे विदेशात बसून इतरांना ज्ञान देतात. मात्र स्वतःच्या देशांमध्ये त्याचे पालन करत नाहीत. युरोपमधील काही देश अशा प्रकारच्या समस्येचा सामना करीत आहेत. त्यामुळे युरोपीय महासंघाने इतरांवर टीका करण्याआधी युरोपमधील वस्तुस्थितीची पडताळणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे ते वस्तुस्थिती समजावून घेत काळाबरोबर पुढे जातील की नाही पाहण्यासारखे ठरणार आहे. भारताच्या दृष्टीने जर कोणाला आमच्याशी भागीदारी करावयाची असेल तर संबंधितांमध्ये संवेदनशीलता असणे आवश्यक आहे. शिवाय हितांमध्ये परस्पर पूरकता असणे तितकेच गरजेचे आहे."
दृष्टिकोन बदलण्याची गरज
"याआधीही भारताने अनेक मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रशियाकडून तेलाची खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे युरोपमध्ये चिंता निर्माण झाली होती. युरोपचा एक दृष्टिकोन आहे, कोणता पर्याय निवडायचा, हा त्यांचा विषय आहे. युरोपने त्यांच्या इंधन गरजांची पूर्तता करण्यासाठी पर्याय निवडले होते. मात्र भारताचा इंधन गरजांचा मुद्दा आल्यावर आम्हाला वेगळेच काहीतरी करण्यास सांगण्यात आले होते असे जयशंकर म्हणाले. युरोपने अशा प्रकारच्या मानसिकतेतून बाहेर पडणे आवश्यक आहे. युरोपच्या समस्या वा जगाच्या समस्या आहेत, मात्र जगाब्या समस्या या युरोपच्या नाहीत, अशी त्यांची भूमिका असल्याचेही जयशंकर यांनी सांगितले.
भारत महत्त्वपूर्ण देश
"युरोपीय महासंघ आजदेखील त्यांची मूल्ये आणि कार्यामधील फरकाचा सामना करत आहेत," असे जयशंकर म्हणाले. भारत ज्या देशांसोबत काम करतो, ते पूर्ण प्रामाणिकपणे करतो. भारत जगातला महत्त्वपूर्ण देश आहे. जगात काही जरी झाले तरी त्याचा फरक भारतावर पडतो. जागतिक स्पर्धा वाढली आहे अमेरिकेने आपल्या भूमिकेत खूप बदल केला आहे. तर दुसरीकडे चीन आधी जे करत होता, तेच करत आहे, असेही जयशंकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.