मौलाना गुलाम वस्तनवी: एका युगाचा अस्त

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 20 h ago
मौलाना गुलाम मोहम्मद वस्तनवी
मौलाना गुलाम मोहम्मद वस्तनवी

 

महान शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक आणि जामिया इस्लामिया इशातुल उलूमचे संस्थापक मौलाना गुलाम मोहम्मद वस्तनवी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन शिक्षण, सामाजिक न्याय आणि मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी समर्पित केले. त्यांचे निधन केवळ त्यांच्या कुटुंबियांसाठीच नव्हे, तर त्यांच्या लाखो विद्यार्थ्यांसाठी आणि अनुयायांसाठी एक मोठी दुःखद घटना आहे.

महाराष्ट्रामधील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे असलेले जामिया इस्लामिया इशातुल उलूम या संस्थेचे संस्थापक मौलाना गुलाम मोहम्मद वस्तनवी हे एक प्रसिद्ध भारतीय मुस्लिम विद्वान आणि शिक्षणतज्ज्ञ होते. पारंपरिक इस्लामिक शिक्षणात आधुनिक विषयांचा समावेश करण्याच्या प्रयत्नांसाठी ते ओळखले जातात.

१ जून १९५० ला गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील कोसाडी येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ गाव वस्तान असल्यामुळे त्यांना वस्तनवी हे उपनाव मिळाले. त्यांनी कोसाडी येथील मदरसा कुव्वत-उल-इस्लाममध्ये प्राथमिक शिक्षण घेतले, जिथे त्यांनी कुराणचे पाठांतर केले. त्यानंतर त्यांनी बडोद्यातील मदरसा शम्स-उल-उलूम आणि १९६४ पासून आठ वर्षे गुजरातच्या तुर्केसर येथील मदरसा फलाह-ए-दारैनमध्ये शिक्षण घेतले. १९७२ मध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील मजाहिर उलूममध्ये प्रवेश घेतला आणि १९७३ मध्ये तेथून उच्च शिक्षण प्राप्त केले. इस्लामिक शिक्षणासोबतच त्यांनी एमबीएची पदवी देखील प्राप्त केली आहे.

१९७९ मध्ये मौलाना वस्तनवी यांनी अक्कलकुवा येथे जामिया इस्लामिया इशातुल उलूमची स्थापना केली. सुरुवातीला एका लहान जागेत सहा विद्यार्थी आणि एका शिक्षकासह सुरू झालेली ही संस्था आज एक मोठी शैक्षणिक संस्था बनली आहे,येथे आधुनिक शिक्षणाबरोबरच इस्लामिक शिक्षण ही दिले जाते. त्यांनी भारतातील पहिली अल्पसंख्याक-व्यवस्थापित वैद्यकीय महाविद्यालय देखील सुरू केले, ज्याला मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (MCI) ची मान्यता आहे.

मौलाना वस्तनवी यांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन नेहमीच पुरोगामी राहिला. त्यांनी पारंपरिक शिक्षणात आधुनिक विषयांचा समावेश करण्यावर भर दिला. त्यांचे ठाम मत होते की आजच्या जगात यशस्वी होण्यासाठी मुस्लिम तरुणांना केवळ धार्मिक ज्ञान पुरेसे नाही, तर त्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यावसायिक शिक्षण घेणेही आवश्यक आहे. याच विचारातून त्यांनी आपल्या संस्थेत अनेक आधुनिक अभ्यासक्रम सुरू केले. त्यांनी मुलींच्या शिक्षणाला विशेष महत्त्व दिले आणि त्यांच्यासाठी सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली.

केवळ शिक्षणच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही मौलाना वस्तनवी यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी नेहमीच जातीय सलोखा, धार्मिक सहिष्णुता आणि सामाजिक न्यायाचा पुरस्कार केला. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. त्यांच्या संस्थेत आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी मोफत शिक्षण आणि निवास व्यवस्था उपलब्ध आहे. आजवर लाखो विद्यार्थी मोफत उच्च शिक्षण घेऊन देशात आणि परदेशात उच्च पदावर काम करत आहेत याचे श्रेय निश्चितच मौलाना गुलाम वस्तानी यांना जाते.

मौलाना वस्तनवी यांची नेतृत्व क्षमताही उल्लेखनीय होती. त्यांनी जामिया इस्लामिया इशातुल उलूमला एका आंतरराष्ट्रीय स्तराच्या शिक्षण संस्थेत रूपांतरित केले. त्यांच्या दूरदृष्टी आणि कठोर परिश्रमामुळेच हे शक्य झाले. दारुल उलूम देवबंदच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती, परंतु काही मतभेदांमुळे त्यांना ते पद सोडावे लागले. मात्र, या काळातही त्यांनी संस्थेत सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला.

मौलाना वस्तनवी हे एक प्रभावी वक्ते आणि लेखकही होते. त्यांचे विचार आणि मार्गदर्शन अनेक लोकांसाठी प्रेरणास्रोत होते. त्यांच्या निधनाने शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील एका प्रेरणादायी पर्वाचा अंत झाला आहे. त्यांचे कार्य आणि विचार नेहमीच आपल्यासोबत राहतील आणि भावी पिढ्यांना मार्गदर्शन करत राहतील. आज त्यांच्या निधनाने शोक व्यक्त करताना, त्यांच्या कार्याला सलाम करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना करतो. त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील.

- हाजी गुलाम हुसेन बुजरूक