अॅपलने या तंत्रज्ञान क्षेत्रातील अव्वल कंपनीने त्यांच्या आयफोन उत्पादनाचा मोठा हिस्सा भारतात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जून २०२५ पासून अमेरिकेत विक्रीसाठी येणारे बहुतांश आयफोन आता भारतात तयार होतील. चीनमधील उत्पादनावर असलेली अवलंबित्व कमी करणे आणि अमेरिकेच्या नव्या टॅरिफ धोरणांमुळे होणारा खर्च टाळणे, हे या नव्या निर्णयामागेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनीयाविषयी माहिती देताना सांगितले की, अमेरिकेच्या टॅरिफमुळे कंपनीला या तिमाहीत सुमारे ९०० दशलक्ष डॉलर्सचा अतिरिक्त खर्च होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर अॅपलने भारतातील उत्पादन वाढवण्यावर भर दिला आहे. फॉक्सकॉन आणि टाटा समूहाने भारतात उत्पादन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
२०२४ मध्ये भारतात तयार झालेल्या आयफोनचे उत्पादन मूल्य १४ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. हा आकडा अॅपलच्या एकूण जागतिक उत्पादनाच्या सुमारे १४% इतका आहे. या उत्पादनात फॉक्सकॉनचा वाटा ६७% आहे, तर टाटा समूहाने घेतलेल्या कर्नाटकातील विंस्ट्रॉन प्लांटमधून उर्वरित उत्पादन होते.
अॅपलच्या या निर्णयामुळे भारतात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. टाटा इलेक्ट्रॉनिक्सने २०२४ मध्ये ४०,००० कोटी रुपयांचे आयफोन उत्पादन केले. त्यापैकी तब्बल ३१,००० कोटी रुपयांचे आयफोन निर्यात केले गेले. या विस्तारामुळे टाटाच्या कर्मचाऱ्यांची संख्या १९,००० वरून ३१,००० पर्यंत वाढली आहे.
भारत सरकारच्या उत्पादन-आधारित प्रोत्साहन (PLI) योजनेमुळे अॅपलला भारतात उत्पादन वाढवण्यास मदत झाली. या योजनेमुळे भारतात उच्च मूल्याच्या तंत्रज्ञान उत्पादनासाठी आणि वितरणासाठी एक मजबूत पुरवठा साखळी तयार झाली. अॅपलच्या या निर्णयामुळे भारत जागतिक आयफोन उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नावारूपाला आला आहे. या निर्णयामुळे भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे अर्थातच देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.
टिम कुक यांनी सांगितले की, अॅपल लवकरच भारतात आपल्या कंपनीच्या मालकीचे आणखी काही रिटेल स्टोअर्स सुरू करणार आहे. सध्या दिल्ली आणि मुंबईत दोन स्टोअर्स आहेत. यावर्षाच्या शेवटी नवीन स्टोअर्स उघडण्याची अॅपलची योजना आहे. चीनसोबतच्या टॅरिफ युद्धाचा परिणाम टाळण्यासाठी अॅपलने उत्पादनाचे वेळापत्रकही नव्याने आखले आहे. कंपनीचे चीन हे सर्वात मोठे उत्पादन केंद्र आहे. त्यामुळे जोखीम कमी करण्यासाठी अॅपल भारतात उत्पादन आणि विक्री अशा दोहोंचा दोन्ही विस्तारत करत आहे.