पन्हाळा येथील येथील ग्रामदैवत व सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत पीर शहादुद्दीन खतालवली यांचा उरूस आजपासून सुरू झाला आहे. हा चार दिवसांचा सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो. आज पहिल्या दिवशी पहाटे किल्लेदार दर्गाहा येथे गंध अर्पण व दिवसभर मासाहेब यांच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
बुधवारी पहाटे २.३० ते ४ वाजेपर्यंत सर्वधर्मियांच्या उपस्थितीत मुख्य दर्यात गंधरात्र व साडेचार वाजता गलेफ अर्पण केला जाणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी किल्लेदार दर्गाहा व तानपीर येथे गलेफ अर्पण केला जाणार आहे. दिवसभर भाविक नैवेद्य दाखवतील. त्यानंतर गुरुवारी पहाटे चार वाजता छत्रपती संभाजी महाराजांच्या मंदिरातून शाही इतमामात मुख्य दर्यात जाणारा शासकीय गलेफ अर्पण केला जाणार आहे. शेवटच्या दिवशी सोमवारी महाप्रसादाने सांगता होणार आहे.
पन्हाळयाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आण्णासो बाबर म्हणाले की, "पन्हाळा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला पन्हाळ्यातील उरूस साजरा होत आहे. हा उरूस साजरा करत असताना जातीय सलोखा व ऐक्याला बाधा येईल, असे वर्तन होणार नाही. याची नागरिक, भक्त व उरूस कमिटीने दक्षता घ्यावी."