कोल्हापूरकरांनी सय्यद कुटुंबाला दिली नव्या आयुष्याची ईदी!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
रशीद सय्यद आणि त्यांच्या पत्नी रेश्मा सय्यद
रशीद सय्यद आणि त्यांच्या पत्नी रेश्मा सय्यद

 

अशपाक पठाण

६ जानेवारीची ती सकाळ सय्यद कुटुंबासाठी आयुष्यभर लक्षात राहणारी ठरली. कोल्हापूरच्या शाहूनगरमध्ये रशीद सय्यद यांचे छोटेसे वडिलोपार्जित घर आहे. रशीद, त्यांच्या पत्नी रेश्मा सय्यद आणि १० वर्षांचा मुलगा रमजान असे त्यांचे छोटे कुटुंब आहे. रशीद आणि रेश्मा हे दोघेही कसबा बावडा येथील कचरा प्रकल्पावर रोजनदारीने काम करून संसाराचा गाडा ओढत होते. 

दरमहा मिळणाऱ्या प्रत्येकी ९ हजार रुपयांच्या पगारातून मुलाचे शिक्षण आणि औषधपाणी करून त्यांनी अडीच लाख रुपये साठवले होते. ही रक्कम त्यांनी घरातील एका पिशवीत जपून ठेवली होती. सकाळी १० च्या सुमारास शॉर्टसर्किट झाले आणि क्षणात घराला आग लागली. गॅस सिलिंडरच्या स्फोटाने आगीने रौद्ररूप धारण केले. डोळ्यादेखत संसाराची भांडीकुंडी, कपडे, महत्त्वाची कागदपत्रे आणि कष्टातून जमा केलेली अडीच लाखांची रोकड जळून खाक झाली.

या दुर्घटनेनंतर सय्यद कुटुंब पूर्णपणे खचून गेले होते. पुढे काय करायचे, हा प्रश्न त्यांच्या समोर होता. अशा कठीण प्रसंगी कोल्हापूरने माणुसकीचे दर्शन घडवले. ही बातमी परिसरात पसरताच हिंदू आणि मुस्लिम समाजातील अनेक लोक मदतीसाठी धावून आले. सामाजिक संघटनांनी कपडे, अन्नधान्य आणि घरगुती साहित्याची मदत केली. गॅस सिलिंडर स्फोटाचा हा प्रसंग अत्यंत भीषण होता. सर्व काही गमावलेल्या या कुटुंबाचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

या मदतीचा ओघ सुरू असतानाच 'जमियत उलमा ए हिंद'कडून आवश्यक घरगुती भांडी देण्यात आली. 'जमात ए इस्लामी हिंद'ने रोख रक्कम आणि रेशन किट दिले. नगरसेवक सतीश पोवार यांनी १ ट्रॉली वाळू आणि १० पोती सिमेंट दिले. नियाज अख्तर यांनी फेब्रिकेशनचे साहित्य पुरवले. विलास वासकर, उमेश पोवार, अविनाश कांबळे, तोफीक मुल्लानी आणि मुरलीधर जाधव यांनी रोख स्वरूपात मदत केली. रमजान ईद जवळ येत असल्याने, ही ईद सय्यद कुटुंबाने स्वतःच्याच घरात साजरी करावी, असा निर्धार सर्वांनी केला. आणि हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सय्यद यांचे घर पुन्हा उभे केले.
 

प्रसंगाबद्दल बोलताना भावूक स्वरात रशीद सय्यद म्हणतात, "माझे घर जळाले होते, पण कोल्हापूरकरांनी हिंदू असो की मुस्लिम, सर्वांनी मदत करून माझे घर उभे केले. मला माझ्या घरी येऊन ईद साजरी करायची आहे असे सर्वांनी सांगितले. लोकांनी दिलेले हे प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही."

सामाजिक कार्यकर्ते तोफीक मुल्लानी या मदतकार्याविषयी म्हणाले की, "प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या शिकवणीनुसार दुसऱ्याला मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. अडचणीच्या काळात असणाऱ्या कुटुंबाला मदत करावी हा विचार मनात आला. रमजान महिन्यात हे कुटुंब आपल्या घरी जावे यासाठी आम्ही पुढाकार घेतला."

त्याठिकाणचे नगरसेवक सतीश पोवार म्हणाले की, "सय्यद कुटुंब मोलमजुरी करून घर चालवते. दुर्घटनेच्या दिवशी आम्ही कार्यकर्त्यांसह आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे खूप नुकसान झाले होते. या अडचणीच्या काळात जी लागेल ती मदत करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला."

समाज माध्यमांतून या घटनेची माहिती मिळताच 'जमात ए इस्लामी'चे प्रतिनिधीही मदतीसाठी पुढे आले. अशा आपत्तीच्या वेळी ही संघटना नेहमीच मदतीसाठी धावून जाते. कोल्हापूरने पुन्हा एकदा सिद्ध केले की, संकट धर्म पाहून येत नाही आणि मदतही धर्म पाहून केली जात नाही. सर्वधर्मीय बांधवांनी केलेल्या या मदतीमुळे सय्यद कुटुंबाचे स्वप्न साकार झाले असून त्यांचे घर पुन्हा आनंदाने न्हाऊन निघाले आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter