जेएनयूमध्ये विद्यार्थी-पोलीस भिडले! लाँग मार्च दरम्यान अनेक विद्यार्थी ताब्यात, पोलीसही जखमी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
जेएनयूतील विद्यार्थी युनियनने काढलेल्या मोर्चामधील क्षण
जेएनयूतील विद्यार्थी युनियनने काढलेल्या मोर्चामधील क्षण

 

जेएनयू विद्यार्थी युनियनने गुरुवारी काढलेल्या मोर्चादरम्यान पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या झटापटीत दोन्ही बाजूचे लोक जखमी झाले आहेत. निदर्शकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा दावा पोलिसांनी केला असून, पोलिसांनी मात्र अवाजवी बळाचा वापर केल्याचा आरोप ताब्यात घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी केला आहे. आंदोलकांनी लाठ्या आणि बूट फेकले तसेच शारीरिक हल्ला केला, यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले असून काहींना तर चावा घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी हा मोर्चा कॅम्पसबाहेर नेण्याचा प्रयत्न केला असता विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर त्यांची पोलिसांशी चकमक झाली. जेएनयू विद्यार्थी युनियनची (JNUSU) अध्यक्ष अदिती मिश्रा, माजी अध्यक्ष नितीश कुमार आणि इतर अनेक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या निवेदनानुसार, विद्यार्थ्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) कॅम्पसपासून शिक्षण मंत्रालयाच्या कार्यालयापर्यंत 'लाँग मार्च'ची हाक दिली होती.

युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (UGC) नियमांच्या अंमलबजावणीबाबत कुलगुरू शांतिश्री धुलिपुडी पंडित यांनी एका पॉडकास्टमध्ये केलेले विधान, विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे निलंबन आणि प्रस्तावित 'रोहित कायदा' या विषयांवरून सुरू असलेल्या आंदोलनाचा हा मोर्चा एक भाग होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना "अज्ञात ठिकाणी" नेण्यात आल्याचा दावा विद्यापीठाच्या शिक्षक संघटनेने केला आहे. कारवाईदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे नुकसान झाल्याचा आरोपही विद्यार्थी युनियनने केला आहे.

या संघर्षाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, त्यातील एका व्हिडिओत आंदोलकांकडून आंबेडकरांचा फोटो हिसकावून घेतल्याचे दिसत आहे. मात्र, 'पीटीआय'ने या व्हिडिओंच्या सत्यतेची स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही. पोलीस प्रशासनानुसार, विद्यापीठ प्रशासनाने आंदोलक विद्यार्थ्यांना कॅम्पसबाहेर निदर्शन करण्याची परवानगी नसल्याचे आधीच कळवले होते आणि त्यांना विद्यापीठ परिसरातच आंदोलन मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला होता. तरीही, सुमारे ४००-५०० विद्यार्थी कॅम्पसमध्ये जमा झाले आणि त्यांनी मोर्चा सुरू केला. दुपारी साधारण ३.२० च्या सुमारास आंदोलक मुख्य गेटमधून बाहेर पडले आणि मंत्रालयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू लागले.

परिस्थिती चिघळल्यानंतर कॅम्पसबाहेर लावलेले बॅरिकेड्स तोडण्यात आले. निदर्शकांनी बॅनर, लाठ्या आणि बूट फेकले तसेच पोलिसांवर प्रत्यक्ष हल्ला केला. झटापटीत काही पोलीस कर्मचाऱ्यांना चावा घेतल्याने घटनास्थळी तैनात असलेले अनेक अधिकारी जखमी झाले, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस दलाने जेएनयूच्या उत्तर प्रवेशद्वारावर आंदोलकांना रोखले आणि हळूहळू त्यांना पुन्हा विद्यापीठ परिसरात ढकलले. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले असून, पोलिसांनी गैरवर्तन केल्याचे विद्यार्थ्यांचे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक अधिकारी प्रयत्नशील होता, असे या अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले.

जेएनयू शिक्षक संघटनेने (JNUTA) जारी केलेल्या निवेदनात पोलिसांच्या पाशवी बळाच्या वापराचा निषेध केला आहे. यात महिलांसह अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा आरोप करत, ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याच्या अधिकारापासून रोखण्यासाठी ही पोलीस कारवाई केल्याचा आरोप करत सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यामुळे जेएनयू विद्यार्थी युनियनने समर्थकांना संध्याकाळी मुख्य गेटवर जमा होण्याचे आवाहन केले आहे.

विद्यापीठाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "जेएनयूएसयू आंदोलक यूजीसी नियमांच्या अंमलबजावणीची मागणी करत आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या नियमांना स्थगिती दिली असल्याने ही मागणी न्यायालयाचा अवमान करणारी आहे. या नियमांवर कुलगुरू किंवा कुलसचिवांचे कोणतेही अधिकार नाहीत." प्रशासनाच्या मते, कॅम्पसमध्ये तोडफोड आणि हिंसाचार केल्याबद्दल निलंबित केलेल्या विद्यार्थ्यांच्या मुख्य विषयावर बोलण्यास विद्यार्थी युनियनने नकार दिला आहे. 

चौकशीनंतर संबंधित विद्यार्थ्यांना जबाबदार धरून निलंबित करण्यात आले आहे. जेएनयू हे सार्वजनिक विद्यापीठ असल्याने ते सरकार, संसद आणि करदात्यांना उत्तरदायी आहे. हिंसाचार आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीच्या मुद्द्यावरून लक्ष वळवण्यासाठी एका महिला ओबीसी कुलगुरूंवर खोटे आरोप करून त्यांना लक्ष्य करणे खेदजनक असल्याचे विद्यापीठाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.