पाकिस्तानने शुक्रवारी पहाटे अफगाणिस्तानची शहरे काबूल आणि कंदाहारवर हवाई हल्ले केले असल्याची माहिती पाकिस्तानी सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. अफगाण तालिबानच्या प्रवक्त्याने 'X' वर पोस्ट करत सांगितले की, त्यांनी सामायिक सीमेवर पाकिस्तानी सैनिकांविरुद्ध प्रत्युत्तरादाखल नवीन हल्ले सुरू केले आहेत. मात्र ही पोस्ट आता हटवण्यात आली आहे. अफगाण तालिबानने यापूर्वी झालेल्या पाकिस्तानी हल्ल्यांना उत्तर म्हणून ही कारवाई केल्याचे सांगितले.
दोन्ही देशांनी प्राणघातक सीमावादानंतर ऑक्टोबरमध्ये नाजूक युद्धविराम मान्य केला होता, परंतु गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. एएफपीच्या वृत्तानुसार, शुक्रवारी काबूलमधील रहिवाशांना संपूर्ण शहरात मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले.
दोन्ही बाजूंनी अलीकडील चकमकींमध्ये एकमेकांचे मोठे नुकसान केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातील लोकांनी बीबीसीला सांगितले की त्यांनी स्फोटांचे आवाज ऐकले असून त्यांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे. अफगाण तालिबानने गुरुवारी उशिरा सामायिक सीमेवरील लष्करी तळांवर केलेल्या कारवाईत त्यांचे दोन सैनिक मारले गेले असल्याचे पाकिस्तानने यापूर्वी सांगितले होते.
माहिती मंत्री अताउल्ला तरार म्हणाले की, अफगाणिस्तानकडून झालेल्या "विनाकारण गोळीबाराला" प्रत्युत्तर देताना इतर तीन सैनिक जखमी झाले आहेत. अफगाण तालिबानने म्हटले आहे की, त्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ ही "मोठ्या प्रमाणावर" मोहीम सुरू केली आहे. या हल्ल्यात किमान १८ लोक मारले गेल्याचा दावा तालिबानने केला आहे. इस्लामाबादने मात्र केवळ दहशतवादी तळ आणि लपण्याच्या ठिकाणांना लक्ष्य केल्याचे सांगितले.
तालिबानचे लष्करी प्रवक्ते मौलवी वाहिदुल्ला मोहम्मदी यांनी सांगितले की, गुरुवारी स्थानिक वेळेनुसार रात्री २०:०० वाजता (१५:३० GMT) ही "प्रतिकारात्मक कारवाई" सुरू करण्यात आली होती. गटाचे मुख्य प्रवक्ते झबिहुल्ला मुजाहिद यांनी सांगितले की, या मोहिमेत "अनेक" पाकिस्तानी सैनिक मारले गेले असून काहींना पकडण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या प्रवक्त्याने हा दावा फेटाळून लावला आहे. मुजाहिद यांनी १५ लष्करी चौक्या ताब्यात घेतल्याचा केलेला दावाही त्यांनी खोडून काढला. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे प्रवक्ते मुशर्रफ झैदी यांनी पाकिस्तानच्या बाजूला कोणत्याही नुकसानीचा दावा फेटाळला आणि सांगितले की सर्व आक्रमणांना "तात्काळ आणि प्रभावी" प्रत्युत्तर दिले जाईल.
मुजाहिद यांनी 'X' वर लिहिले की, "पाकिस्तानी लष्करी वर्तुळाकडून वारंवार होणारे सीमा उल्लंघन आणि बंडाळीला प्रत्युत्तर म्हणून, सीमेवर पाकिस्तानी लष्करी केंद्रे आणि लष्करी प्रतिष्ठानांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत."
पाकिस्तान सरकारने सांगितले की तालिबानचा "अंदाज चुकला असून त्यांनी खैबर पख्तुनख्वा या उत्तर-पश्चिम प्रांतातील सीमेवर अनेक ठिकाणी विनाकारण गोळीबार केला", ज्याला इस्लामाबादच्या सुरक्षा दलांनी "तात्काळ आणि प्रभावी प्रत्युत्तर" दिले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 'X' वर सामायिक केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "सुरुवातीच्या अहवालांनुसार अफगाण बाजूला मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून अनेक चौक्या आणि उपकरणे नष्ट झाली आहेत. पाकिस्तान आपली प्रादेशिक अखंडता आणि आपल्या नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करेल."
रहिवाशांनी सीमेवर जोरदार गोळीबार झाल्याचे सांगितले. पाकिस्तानचे सीमावर्ती शहर तोरखाम जवळ राहणाऱ्या लोकांना भाग रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे. चकमकींमुळे अधिकाऱ्यांनी हद्दपार केलेल्या अफगाण नागरिकांना सीमेपलीकडे परत पाठवण्याची प्रक्रिया स्थगित केली आहे. तसेच हे सीमा प्रवेशद्वार अफगाण निर्वासितांसाठी बंद करण्यात आले आहे.