द ग्रेट थेफ्ट : अतिरेकी विचारसरणीने ‘असे’ केले इस्लामी संकल्पनांचे विकृतीकरण...

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
'द ग्रेट थेफ्ट: रेसलिंग इस्लाम फ्रॉम द एक्सट्रीमिस्ट्स' पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ
'द ग्रेट थेफ्ट: रेसलिंग इस्लाम फ्रॉम द एक्सट्रीमिस्ट्स' पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ

 

अमीर सुहैल वानी

आजच्या आधुनिक जगात इस्लामचे प्रतिनिधित्व नक्की कोण करते? हा सध्याच्या काळातील मुस्लिम विचारविश्वातील सर्वात ज्वलंत आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. खालिद अबौ अल फदल यांचे 'द ग्रेट थेफ्ट: रेसलिंग इस्लाम फ्रॉम द एक्सट्रीमिस्ट्स' (The Great Theft: Wrestling Islam from the Extremists) हे पुस्तक याच वादात एक अत्यंत प्रभावी आणि बौद्धिक हस्तक्षेप करते.

९/११ च्या हल्ल्यांनंतरच्या जागतिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक लिहिले गेले आहे. विशेष म्हणजे, हे पुस्तक इस्लामची बाजू सावरून धरण्यासाठी लिहिलेले नाही किंवा कोणावर केवळ टीका करण्यासाठीही लिहिलेले नाही.

त्याऐवजी, हे पुस्तक एका खोलवरच्या अंतर्गत संकटाचे निदान करण्याचा एक गंभीर, ऐतिहासिक आणि नैतिक प्रयत्न आहे. लेखकाच्या मते, हे संकट म्हणजे इस्लामच्या दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनांमधील एक नैतिक आणि धार्मिक संघर्ष आहे.

अबौ अल फदल असा युक्तिवाद करतात की, काही सनातनी आणि कट्टरतावादी चळवळींनी इस्लामला अक्षरशः "चोरले" आहे. या चळवळी धार्मिक सत्यावर केवळ आपलाच अधिकार असल्याचे मानतात. त्यांनी इस्लामच्या विशाल आणि विविधतेने नटलेल्या बौद्धिक परंपरेचे रूपांतर एका कठोर, शब्दशः अर्थ घेणाऱ्या आणि अनेकदा निष्ठुर अशा विचारसरणीत केले आहे.

पुस्तकाच्या शीर्षकातील "ग्रेट थेफ्ट" (मोठी चोरी) हा शब्द केवळ इस्लामच्या नावाने होणाऱ्या हिंसाचारापुरता मर्यादित नाही. तर त्याचा अर्थ धर्माचा नैतिक गाभा, कायद्याचा अर्थ लावण्यातील विविधता आणि नम्रतेने अर्थ लावण्याची दीर्घकालीन संस्कृती, या सर्वांवर अतिरेक्यांनी घातलेला डल्ला असा होतो.

या पुस्तकाच्या केंद्रस्थानी लेखकाने दोन महत्त्वाच्या संकल्पनांमध्ये फरक केला आहे: एक म्हणजे "प्युरिटन" (सनातनी/कठोर) इस्लाम आणि दुसरा "मॉडरेट" (मध्यममार्गी/मवाळ) इस्लाम. सनातनी विचारसरणी ही प्रामुख्याने वहाबी आणि काही सलाफी प्रवाहांशी जोडलेली आहे.

ही विचारसरणी असे मानते की ईश्वरी कायदा हा एक बंदिस्त आणि पूर्ण झालेला कोड (Code) आहे. त्यात मानवी तर्काला, ऐतिहासिक संदर्भाला किंवा विविध अर्थांना अजिबात वाव नाही. या चौकटीत नैतिक विचारांपेक्षा आज्ञापालनाला जास्त महत्त्व दिले जाते आणि विरोधाला 'पथभ्रष्टता' मानले जाते.

ही विचारसरणी इतिहासात कशी उदयास आली, विसाव्या शतकात तिला आर्थिक आणि राजकीय पाठबळ कसे मिळाले आणि शिक्षण संस्था व धार्मिक संस्थांच्या माध्यमातून तिचा प्रभाव कसा वाढत गेला, याचा लेखक बारकाईने मागोवा घेतात.

मात्र, त्यांची टीका केवळ सामाजिक अंगाने नाही, तर ती धर्मशास्त्रीय (Theological) सुद्धा आहे. त्यांचे म्हणणे आहे की सनातनीपणा हा इस्लामच्या मूळ शास्त्रीय परंपरेला विकृत करतो. मूळ परंपरा ही शिस्तप्रिय पद्धती, ज्ञानाच्या बाबतीत असलेली नम्रता आणि मानवी समजून घेण्याच्या मर्यादांची जाणीव यावर आधारित होती.

त्यांच्या मते, जुन्या काळातील कायदेतज्ज्ञांनी (Jurists) कधीही आपण अचूक असल्याचा दावा केला नाही. उलट, ते मतभेदांना बौद्धिक जिवंतपणाचे आणि नैतिक गांभीर्याचे लक्षण मानत असत. हे पुस्तक केवळ वरवरची टीका करत नाही, तर जिथे ही तफावत स्पष्टपणे दिसते अशा विशिष्ट क्षेत्रांचेही विश्लेषण करते.

लेखक चर्चा करतात की सनातनी लोक कायद्याकडे कसे पाहतात. ते अनेकदा शरियतला एक कठोर आराखडा मानतात, ज्याचा नैतिक उद्दिष्टांशी काहीही संबंध नसतो. याउलट, लेखक इस्लामिक कायद्याची अशी दृष्टी मांडतात जी नैतिक हेतू, जनकल्याण आणि न्यायाच्या स्थापनेवर आधारित आहे.

लिंगभेदावर (Gender) त्यांचे विचार अत्यंत टोकदार आहेत. जे लोक महिलांना बाजूला सारतात किंवा त्यांच्या सार्वजनिक जीवनातील सहभागावर निर्बंध लादतात, अशा अर्थ लावणाऱ्यांना ते आव्हान देतात. त्यांचे म्हणणे आहे की असे निर्बंध ईश्वरी आदेशापेक्षा पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतिबिंब जास्त आहेत.

तसेच, जिहाद आणि हिंसाचार यांवरील त्यांची चर्चा अतिरेकीपणा आणि धार्मिकता यांना एक मानण्याच्या सोप्या समीकरणाला मोडीत काढते. ते आग्रहाने सांगतात की, जुन्या इस्लामिक कायदेपंडितांनी युद्धावर अनेक बंधने घातली होती. त्यात प्रमाणाबाहेर बळाचा वापर न करणे, नागरिकांचे रक्षण करणे आणि नैतिक जबाबदारी यावर भर दिला होता.

या जुन्या परंपरांकडे पुन्हा पाहून ते दाखवून देतात की, अतिरेकीपणा हा भूतकाळाचा प्रामाणिक वारसा नाही. तर ते इतिहासाचा सोयीस्कर आणि अनेकदा चुकीचा अर्थ काढून केलेले अनुकरण आहे.

या पुस्तकाची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्याचा नैतिक सूर. अबौ अल फदल हे केवळ एक तटस्थ निरीक्षक म्हणून लिहीत नाहीत, तर ते एक श्रद्धाळू म्हणून लिहितात ज्यांना आपल्या परंपरेच्या नैतिक अखंडतेची मनापासून काळजी आहे.

त्यांना एका गोष्टीची खंत वाटते की, जागतिक राजकीय दबावामुळे अनेक मुस्लिमांनी बचावात्मक पवित्रा घेतला आहे. ते एकतर भूतकाळाला अवास्तव मोठे मानतात किंवा टीकेला रागाने उत्तर देतात. या दोन्ही प्रवृत्तींच्या विरोधात जाऊन, ते मुस्लिमांना बौद्धिक प्रामाणिकपणा आणि नैतिक धैर्य दाखवण्याचे आवाहन करतात.

ते मुस्लिमांना विनंती करतात की, त्यांनी आपल्या चिकित्सक विद्वत्तेचा वारसा पुन्हा मिळवावा आणि विचार न करता शरणागती पत्करण्याची मागणी करणाऱ्या हुकूमशाही धार्मिक आवाजांना विरोध करावा. त्याच वेळी, ते पाश्चात्य श्रोत्यांनाही सावध करतात की त्यांनी इस्लामला केवळ त्याच्या काही खळबळजनक घटनांपुरते मर्यादित समजू नये.

त्यामुळे त्यांचे विश्लेषण अनेक स्तरांवर काम करते: मुस्लिमांमधील अंतर्गत सुधारणा, विविध धर्मांमधील समजूतदारपणा आणि जागतिक राजकीय भान. शैलीच्या बाबतीत, हे पुस्तक सखोल अभ्यास आणि सोपी भाषा यांचा समतोल साधते.

काही विभाग कायदेशीर सिद्धांत आणि ऐतिहासिक वादांमध्ये खोलवर जातात, तरीही भाषा मुख्यत्वे स्पष्ट आणि विचारपूर्वक वापरलेली आहे. अबौ अल फदल हे स्वतः एक शास्त्रीय कायदेतज्ज्ञ आणि पाश्चात्य कायद्याचे अभ्यासक असल्याने, ते कायद्याच्या क्लिष्ट संकल्पना सुशिक्षित सामान्य वाचकाला समजतील अशा भाषेत मांडू शकतात.

त्यांचा युक्तिवाद पद्धतशीरपणे उलगडत जातो. तो ऐतिहासिक संदर्भापासून सुरू होऊन, मूल्यात्मक टीकेकडे जातो आणि शेवटी नैतिक नूतनीकरणाच्या आवाहनावर येऊन थांबतो. जर या पुस्तकात काही मर्यादा असेल, तर ती ही असू शकते की ते सुधारणेसाठी तपशीलवार संस्थात्मक आराखडा देण्यापेक्षा समस्येचे निदान करण्यावर जास्त भर देते.

पण कदाचित हा लेखकाचा हेतूच असावा; धोरणे बनवण्यापेक्षा लोकांची नैतिक जाणीव जागृत करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. आपल्यासारख्या समाजात, जिथे धार्मिक अधिकार, बहुलवाद आणि आधुनिकता यावर आजही जोरदार चर्चा होतात, तिथे हे पुस्तक विशेष महत्त्वाचे ठरते.

परंपरा कशा जपल्या जातात, त्यांचा अर्थ कोण लावते आणि सत्ता व धर्मशास्त्र यांचा संबंध कसा येतो, यावर हे पुस्तक आपल्याला आत्मचिंतन करायला लावते. इस्लामला एकतर पूर्णपणे शांततापूर्ण किंवा पूर्णपणे हिंसक म्हणून सादर करण्याऐवजी, अबौ अल फदल त्याच्यातील गुंतागुंत समजून घेण्याचा आग्रह धरतात.

ते दाखवून देतात की इस्लामच्या आत्म्यासाठीचा संघर्ष अजूनही सुरू आहे आणि त्याचा निकाल खुद्द मुस्लिमांच्या बौद्धिक आणि नैतिक निवडींवर अवलंबून आहे. त्या अर्थाने, हे पुस्तक केवळ अतिरेकीपणावर केलेली टीका नाही, तर ती जबाबदारी स्वीकारण्याची विनंती आहे.

खालेद एम. अबौ अल फदल हे स्वतः इस्लामिक कायदा आणि धर्मशास्त्राचे आजच्या काळातील सर्वात प्रमुख विद्वान आहेत. कुवेतमध्ये जन्मलेले आणि पारंपारिक इस्लामिक कायदेपद्धती तसेच पाश्चात्य कायदेपद्धती या दोन्हीत प्रशिक्षित असलेले लेखक, लॉस एंजेलिसच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात कायद्याचे प्रतिष्ठित प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

त्यांचे शैक्षणिक कार्य इस्लामिक कायदा, मानवाधिकार आणि घटनात्मक सिद्धांत या विषयांवर पसरलेले आहे. तसेच ते धार्मिक स्वातंत्र्य आणि नागरी हक्कांशी संबंधित सल्लागार भूमिकांमध्येही सक्रिय राहिले आहेत.

त्यांचे वेगळेपण यात आहे की ते आग्रहाने सांगतात की इस्लामशी एकनिष्ठ राहण्यासाठी नैतिक खोली, बौद्धिक कठोरता आणि ईश्वरासमोर नम्रता असणे आवश्यक आहे. आपल्या लेखनातून ते हुकूमशाहीला—मग ती राजकीय असो वा धार्मिक—आव्हान देतात आणि शरियतच्या नैतिक आणि बहुलवादी समजेचा पुरस्कार करतात.

त्यामुळे, 'द ग्रेट थेफ्ट' हे पुस्तक वाचकांसमोर मांडताना, त्याचे वर्णन केवळ अतिरेकीपणावरील पुस्तक असे करता येणार नाही. तर ज्या परंपरेचा आतून आणि बाहेरून चुकीचा अर्थ लावला गेला आहे, तिला पुन्हा मिळवण्याचा एका विद्वानाने केलेला हा कळकळीचा प्रयत्न आहे, असेच म्हणावे लागेल.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter